नम्र, प्रेमळ आणि प्रत्येक सेवा ‘सत्यं शिवं सुंदरम् ।’, अशी करणारे हडपसर (पुणे) येथील कै. राजेंद्र पद्मन !
हडपसर (पुणे) येथील राजेंद्र पद्मन यांचे ५.४.२०२१ या दिवशी निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ६० वर्षे होते. त्यांच्या समवेत सेवा करतांना साधकांना त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत. (भाग १)
१. सौ. रीमा नान्नीकर, हडपसर, पुणे.
१ अ. प्रेमळ
‘राजेंद्र पद्मनकाका अतिशय नम्र होते. ते भ्रमणभाषवरही प्रेमाने बोलायचे. मला आणि येथील अन्य साधकांना ते पितृवत् होते. वर्ष २०२० मध्ये हडपसर येथे झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या वेळी काका सर्वांना अतिशय प्रेमाने महाप्रसादाला बोलवायचे. ते सर्वांना फार प्रेमाने महाप्रसाद वाढायचे. ‘कुणाला काही न्यून पडू नये’, याची ते काळजी घ्यायचे. ‘साधक थकून येतात’, असा विचार करून ते ‘त्यांच्यासाठी कधी ताक किंवा कोशिंबीर करूया का ?’, असे विचारायचे. साधकांविषयी त्यांच्या मनात पुष्कळ प्रेमभाव होता. ‘साधकांना वेळेत महाप्रसाद मिळायला हवा’, यासाठी ते स्वतःची सेवा सोडून भोजनव्यवस्थेतील सेवेत साहाय्य करायचे.
१ आ. व्यष्टी साधनेचे गांभीर्य
हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या कालावधीत त्यांच्याकडे अनेक सेवा असूनही ते वेळ मिळेल, तेव्हा नामजपादी उपाय कटाक्षाने करायचे. अनेक वेळा शारीरिक किंवा आध्यात्मिक त्रास होत असूनही व्यष्टी साधना पूर्ण करण्याकडे त्यांचा कल असायचा. त्यात येणार्या अडचणी ते मोकळेपणाने सांगायचे. स्वतःकडून झालेल्या चुका आणि ‘आपण कुठे न्यून पडलो ?’, हेही ते प्रांजळपणाने मांडायचे.
१ इ. सेवेची तीव्र तळमळ
१ इ १. मिळालेली कुठलीही सेवा कृतज्ञतेच्या भावाने करणे : त्यांना कुठलीही सेवा सांगितली, तरी कृतज्ञता वाटायची. ते कुठल्याही सेवेला ‘नाही’ न म्हणता सकारात्मक राहून सेवा स्वीकारायचे आणि ती सेवा विचारून घेऊन करायचे. त्यामुळे हडपसर येथील सेवेसाठी मला नेहमी त्यांचा आधार वाटायचा. ‘तातडीचे निरोप देणे, अहवालाची सेवा, जिज्ञासूंना संपर्क’, अशा सर्व सेवा ते मनापासून आणि आनंदाने करायचे.
१ इ २. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून सेवा करणे : हडपसर येथे झालेल्या पहिल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेला पद्मनकाका आणि काकू अंथरुणाला खिळून असलेल्या त्यांच्या (पद्मनकाकांच्या) रुग्णाईत आईचे सगळे करून भोजनव्यवस्थेच्या सेवेला यायचे. अनेक अडचणींवर मात करून काका-काकू दोघेही तळमळीने सेवा करायचे.
१ इ ३. ‘सत्यं शिवं सुंदरम् ।’, अशी सेवा करणारे कै. पद्मनकाका ! : पद्मनकाकांना सांगितलेली कुठलीही सेवा ते परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करायचे. त्यांची सेवा ‘सत्यं शिवं सुंदरम् ।’, अशी असायची. त्यांनी समाजासाठी घेतल्या जाणार्या भाववृद्धी सत्संगांच्या नोंदी केलेले लिखाण, त्यांतील अक्षर, आखणी सगळेच शिकण्यासारखे असायचे. त्यांनी लिहिलेल्या वहीकडे बघूनही भाव जागृत व्हायचा.
१ इ ४. रुग्णाईत असतांनाही सेवा करण्याची सिद्धता असणे : ते घरी रुग्णाईत असतांना त्यांना ‘सेवा न्यून करूया का ?’, असे विचारल्यावरही त्यांनी ‘नको’, असे सांगितले होते. त्याही स्थितीत त्यांची सेवा करायची सिद्धता होती.
१ ई. भाव
कुठलीही सेवा झाल्यानंतर ‘गुरुदेवांमुळे झाली’, असे ते मनापासून म्हणायचे.’ (एप्रिल २०२१)
२. श्री. अनिल नाकील, हडपसर, पुणे.
२ अ. सेवेची तीव्र तळमळ
१. ‘पद्मनकाकांना हडपसर येथील पहिल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या वेळी काही अडचणींमुळे सेवेसाठी पूर्णवेळ देता आला नाही; म्हणून त्यांनी दुसर्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेला पूर्णवेळ देऊन सेवेचे दायित्व घेतले. तेव्हा ‘त्यांची दृष्टी केवळ सेवेकडेच असायची’, असे वाटायचे.
२. वेळ पडल्यास उत्तरदायी साधकांनी अन्य सेवेविषयी विचारले, तरी ते त्या सेवेला जायला सिद्ध असायचे. तेव्हा ‘आता मी दिवसभर सेवा केली आहे, आता जायला नको’, असा विचारही त्यांच्या मनात यायचा नाही.
२ आ. प्रार्थना
राजेंद्र पद्मन यांच्या मृत्यूची वार्ता ऐकली, तेव्हा त्यांची मूर्ती माझ्या डोळ्यांसमोर उभी राहिली आणि त्यांचे अनेक गुण मला आठवायला लागले. मला केवळ २ वर्षेच सेवेनिमित्त त्यांचा सहवास लाभला होता. या कालावधीत मला त्यांच्यातील अनेक गुण शिकायला मिळाले. माझ्याकडून अंतर्मनातून गुरुमाऊलीला प्रार्थना झाली, ‘गुरुमाऊली, या साधक जिवाला आपल्या चरणांजवळ घ्या.’ (एप्रिल २०२१)
३. सौ. छाया राऊत, हडपसर, पुणे.
३ अ. कर्तेपणा गुरुचरणी अर्पण करणे
कधी त्यांचे कौतुक केले, तर ते लगेच ‘प्रत्येक कृती आणि प्रयत्न गुरुदेव करवून घेत आहेत’, असे म्हणायचे.
३ आ. सेवा तळमळीने आणि परिपूर्ण करणे
१. पद्मनकाका हडपसर येथील प्रसार आढावा द्यायचे आणि तो परिपूर्ण, भावपूर्ण अन् अचूक असायचा.
२. हडपसर येथे फेब्रुवारी २०२० मध्ये हिंदु राष्ट्र-जागृती सभा असतांना पद्मनकाकांकडे वेळ शिल्लक असेल, तर ते प्रसारातही सेवेला यायचे. तेव्हा काकांच्या तोंडवळ्यावर कधीही थकवा जाणवायचा नाही. तेव्हा ‘काकांची लवकर प्रगती होईल’, असे वाटले होते.
३ इ. अनुभूती
पद्मनकाकांची गुणवैशिष्ट्ये लिहितांना माझा भाव जागृत होत होता.’ (एप्रिल २०२१)
४. श्रीमती पद्मा मोकाशे, हडपसर, पुणे.
४ अ. सेवा मनापासून आणि भावपूर्ण करणे
‘देवाने मला पद्मनकाकांसह दत्तजयंतीला प्रदर्शनकक्ष आणि हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या वेळी सभागृहातील स्वच्छता आदी सेवा करण्याची संधी दिली. ते अंतःकरणापासून सेवा करण्याचा प्रयत्न करायचे. ‘गुरुमाऊली आपल्याकडे बघत आहे’, असा त्यांचा भाव असायचा.
४ आ. अनुसंधानात असणे
वर्ष २०२० मध्ये आकाशकंदिलाची सेवा करतांना सेवा पूर्ण होईपर्यंत ते शांत आणि स्थिर होते. त्या वेळी त्यांना पाहून ‘पद्मनकाकांचे देवाशी अनुसंधान चालू आहे’, असे मला वाटले.’ (एप्रिल २०२१)
५. सौ. राजश्री खोल्लम, पुणे
५ अ. प्रांजळ
‘व्यष्टी साधनेचा आढावा देतांना ते स्वतःच्या चुका सांगून ‘त्या चुका कुठले स्वभावदोष किंवा अहं यांमुळे झाल्या ?’, हेही सांगायचे.
५ आ. कुठलीही सेवा सुबक आणि सुंदर करणे
पद्मनकाका पूर्वी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या बांधणीसाठी लागणार्या २०० कागदी पिशव्या बनवायचे. त्या त्यांनी भावपूर्ण बनवलेल्या असायच्या आणि त्यांचे पॅकिंगही सुबक केलेले असायचे. ते बघूनच भाव जागृत व्हायचा.’ (एप्रिल २०२१)
६. सौ. जानकी युवराज पवळे, चंदननगर, पुणे.
६ अ. सेवेची तळमळ
१. ‘पद्मनकाका चंदननगर येथे रहायला आल्यानंतर ते प्रत्येक शनिवारी ग्रंथप्रदर्शनाच्या ठिकाणी नियमित सेवेला येऊ लागले. नंतर हळूहळू पद्मनकाका-काकू ग्रंथप्रदर्शन लावायचे. ते दोघेही ती सेवा फार मनापासून करायचे. येथील सेवेसाठी मला त्यांचा आधार वाटायचा.
२. पद्मनकाका वाघोली येथे थोडे दिवस रहाण्यासाठी आले होते. तिथे साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे काही वर्गणीदार दूर अंतरावर आहेत, तरीही पद्मनकाका त्यांना अंक नेऊन द्यायचे.
६ आ. संतांप्रतीचा भाव
आठवड्यातून २ वेळा सद्गुरु स्वातीताई (सद्गुरु (कु.) स्वाती खाडये) पहाटे ‘ऑनलाईन’ नामजप घेतात. त्यात सद्गुरु स्वातीताई ‘नामजप करतांना देहाची शुद्धी होत असून रक्त, मास आणि पेशी हे सर्व चैतन्यमय होत आहे’, अशी प्रार्थना घेतात. ‘त्या प्रार्थनेच्या माध्यमातून सद्गुरु स्वातीताईंनी संकल्प केला आहे’, असा पद्मनकाकांचा भाव होता. नंतर ते व्यष्टी साधनेच्या आढाव्यात ‘आज नामजप सत्संगातील प्रार्थनेनंतर माझे सर्व शारीरिक त्रास आणि विचार न्यून झाले’, असे सांगायचे. त्यातून त्यांचा सद्गुरूंप्रतीचा भाव जाणवायचा.
६ इ. काकांमध्ये जाणवलेले पालट
१. दळणवळण बंदीच्या काळात पद्मनकाकांमधील व्यष्टी साधनेची ओढ वाढली होती. त्यांना स्वतःला पालटण्याची पुष्कळ तळमळ लागली होती. ते मनापासून व्यष्टी साधना आणि समष्टी सेवा करण्याचा प्रयत्न करायचे.
२. पूर्वी त्यांचा तोंडवळा गंभीर आणि त्रस्त दिसायचा. आता त्यांच्या तोंडवळ्यात पालट होऊन तोंडवळा हसरा दिसू लागला होता.’ (एप्रिल २०२१)
७. श्री. युवराज पवळे, चंदननगर, पुणे.
७ अ. सेवेची तळमळ
‘हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या प्रसाराच्या वेळी ‘आपण गावागावांत जाऊन प्रसार करू,’ असे ते म्हणायचे.’ (एप्रिल २०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |