निष्क्रीय पुरातत्व विभाग !
ऐतिहासिक वास्तू किंवा पुरातन वास्तू यांचे जतन होणे आवश्यक असते; मात्र त्यावर कुणी मालकी हक्क दाखवत असल्यास ते अयोग्य आहे. साडेतीन शक्तीपिठांतील एक पूर्ण पीठ असलेल्या तुळजापूर येथील श्री भवानीदेवीच्या मंदिरासमोरील प्राचीन ‘श्रीविष्णु तीर्थ’ (सध्या ‘मंकावती कुंड’ या नावाने प्रचलित आहे.) येथे अवैधरित्या बांधकाम केल्याच्या प्रकरणी एका राजकीय नेत्यावर फौजदारी गुन्हा नोंद करून प्राचीन तीर्थकुंडाचे संरक्षण करण्याचा आदेश धाराशिवचे जिल्हाधिकारी आणि ‘श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान’चे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी नुकताच दिला आहे. १ सहस्र २४४ चौरस मीटर आकाराच्या श्रीविष्णु तीर्थाची महती ‘स्कंद पुराण’, ‘तुळजाई माहात्म्य’ आणि ‘देवीविजय’ पुराणात आहे. अशा प्रकारे प्राचीन वास्तूवर कुणी वैयक्तिक मालकी हक्क दाखवून कह्यात घेत असल्यास त्याचा इतिहास समोर कसा येणार ? ‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’ने पुरातत्व विभागाची अनुमती न घेता कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिराच्या बांधकामात पालट करून तेथील मनकर्णिका कुंडाच्या ठिकाणी शौचालय बांधले होते. कोल्हापूरप्रमाणे स्थिती झाल्यानंतर प्रशासन आणि पुरातत्व विभाग जागे होणार आहेत का ?
श्रीविष्णु तीर्थ येथील अवैध बांधकामाच्या प्रकरणामध्ये संबंधित व्यक्तीने मंत्र्यांच्या साहाय्याने जिल्हाधिकार्यांच्या आदेशाला स्थगिती आणण्याचा प्रयत्न केला आहे. या पूर्वीही श्री तुळजाभवानीदेवीच्या खजिन्यातील पुरातन नाणी, अलंकार आणि काही मौल्यवान वस्तू गहाळ झालेल्या आहेत. या प्रकरणी केवळ एका व्यक्तीवर गुन्हा नोंद करून तुटपुंजी कारवाई करण्यापलीकडे कोणतीही कारवाई झालेली नाही. आता या प्राचीन कुंडाच्या ठिकाणी बांधकाम चालू झालेले असूनही पुरातत्व विभागाला अद्याप जाग आलेली नाही, तसेच याविषयी पुरातत्व विभाग स्वत:ची भूमिकाही मांडत नाही. पुरातत्व विभागाची निष्क्रीयता आणि पराकोटीचे दुर्लक्ष यांमुळेच कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरील अतिक्रमण
वाढत गेले. अशी चूक या प्राचीन कुंडाच्या संदर्भात होऊ नये, यासाठी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालून त्याचे जतन करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, असेच सामान्य जनतेला वाटते.
– वर्षा कुलकर्णी, सोलापूर