ऐतिहासिक किल्ले शिरगाव (जिल्हा पालघर) येथे गडकोट श्रमदान मोहीम पार पडली !
पालघर (वार्ता.) – येथील ऐतिहासिक शिरगाव किल्ल्याच्या संवर्धनासाठी नुकतीच श्रमदान मोहीम पार पडली. हिंदवी स्वराज्य समूह शिरगाव, गडकोट येथील श्रमदान प्रवास सह्याद्रीचा, पालघर आणि शिवसेवक प्रतिष्ठान वैतरणा या तीन दुर्गसंवर्धन संस्थांच्या वतीने मोहीम राबवण्यात आली. यात ३० दुर्गप्रेमींनी सहभाग घेतला.
सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत सहभागी दुर्गमित्रांनी श्रमदान केले. गेले एक वर्ष किल्ला दळणवळण बंदीमुळे बंद होता. मुसळधार पावसामुळे किल्ल्याच्या अंतर्गत भागात अन् मुख्य तटबंदीस धोकादायक असणारी अनावश्यक झाडे वाढली होती. किल्ल्याच्या आत फिरणे अवघड झाले होते. दुर्गमित्रांनी किल्ल्याच्या अंतर्गत असणारा परिसर स्वच्छ केला.
हिंदवी स्वराज्य समूहाच्या अंतर्गत सातत्याने शिरगाव किल्ले येथे श्रमदान मोहिमेचे आयोजन करण्यात येत असते. परेश गावड आणि स्मित पाटील यांनी यंदा मोहिमेचे नियोजन केले. स्थानिक दुर्गमित्रांनी किल्ल्यातील मुख्य इतिहास साक्षी तटबंदीची स्वच्छता केली. या वेळी सर्व वयोगटातील तरुण-तरुणींनी अत्यंत मेहनतीने आणि दायित्वाने श्रमदान मोहिमेत सहभाग घेतला.
हिंदवी स्वराज्य समूह शिरगावचे तुषार पाटील म्हणाले, ‘‘शिरगाव किल्ल्याच्या संवर्धनासाठी सातत्याने श्रमदान करावे लागणार असून त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मोहिमेत प्रत्येक वयोगटातील व्यक्तींचा वाढता सहभाग हेच आम्ही आमचे यश मानतो. आगामी काळात शिरगाव किल्ल्यावर अधिक नाविन्यपूर्ण उपक्रम नक्कीच पूर्ण होतील.’’
किल्ले वसई मोहिमेचे प्रमुख आणि इतिहास अभ्यासक श्रीदत्त नंदकुमार राऊत म्हणाले, ‘‘शिरगाव किल्ल्याच्या संवर्धनासाठी अत्यंत दायित्वाने आणि सातत्याने कार्यरत असणार्या सर्व दुर्गमित्रांचे मी मनापासून अभिनंदन करतो. हिंदवी स्वराज्य समूह सर्वांना समवेत घेऊन अत्यंत निष्ठेने आणि सातत्याने शिरगाव किल्ल्यासाठी अमूल्य योगदान तत्परतेने देत आहे. यासाठी त्यांचे अभिनंदन !’’