पुनर्विकासात रखडलेले सर्व प्रकल्प झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एस्.आर्.ए.) कह्यात घेणार !

  • गृहनिर्माण विभागाचा निर्णय !

  • गोरगरिबांना घरे मिळणार !

मुंबई – पुनर्विकासात रखडलेले सर्व प्रकल्प झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एस्.आर्.ए.) कह्यात घेणार आहे. याविषयी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी माहिती दिली आहे. ‘जर बांधकाम व्यावसायिक न्यायालयात गेले, तर आम्हीही न्यायालयात जाऊ’, असेही त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, ‘‘बंद झालेले प्रकल्प प्राधिकरण कह्यात घेऊन स्वत: विकास करेल, तसेच गोरगरिबांना घरे मिळतील. शिवशाही पुनर्वसन प्रकल्प (एस्.एस्.पी.एल्.) माध्यमातून फंडाची योजना आखली जाईल. तसेच पुनर्विकसित इमारतींमध्ये गोरगरिबांना घरे दिली जातील.’’

राज्य शासनाने घोषित केलेल्या सुधारित नियमावलीमुळे इमारत आणि दुरुस्ती मंडळाच्या निकृष्ट दर्जाच्या ३० वर्षांखालील पुनर्रचित इमारतींचा पुनर्विकासही आता शक्य होणार आहे.

नव्या विकास नियंत्रण नियमावलीनुसार ३० वर्षे वा त्यापुढील इमारती किंवा सक्षम प्राधिकरणाने धोकादायक ठरवलेल्या इमारतींचा पुनर्विकास करता येणे शक्य होते. शहरातील म्हाडावर पुनर्रचित केलेल्या इमारती या ३० वर्षांखालील आहेत; मात्र त्यांचाही आता पुनर्विकास करता येणार आहे. तशी तरतूद ३३(७) व (९) या सुधारित नियमावलीत करण्यात आली आहे; मात्र या इमारतीला पुनर्विकासाची आवश्यकता असल्याविषयी पालिका आयुक्त वा उच्चस्तरीय समितीने निर्णय देणे नव्या नियमावलीत बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच पंतप्रधान अनुदान योजनेतील इमारतींचाही पुनर्विकास आता शक्य होणार असून ३ इतके चटईक्षेत्रफळ मिळणार आहे.