हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने बांग्लादेशी घुसखोर दांपत्याचा पुणे येथील कारागृहातच मुक्काम !
पुणे, ९ ऑगस्ट – भारतामध्ये अवैधरित्या घुसखोरी केल्याच्या आरोपावरून महंमद आणि माजिदा मंडल या बांगलादेशी दांपत्याला अटक करण्यात आली होती. न्यायालयात त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाले आणि त्यांना २ वर्षे ३ मासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. १६ जून २०२१ ला कारावासाची शिक्षा भोगून ते बाहेर आले. या दोघांना बांगलादेशात पोचवण्यापर्यंतची प्रक्रिया पार पडेपर्यंत फरासखाना पोलीस ठाण्याच्या कह्यात ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. त्यांच्या हस्तांतरणाची प्रक्रिया अजूनही पूर्ण झालेली नाही. त्यामुळे मागील २ मासांपासून ते पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यातच रहात आहेत.
फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे म्हणाले की, त्यांना बांगलादेशात परत जाता यावे, यासाठी आम्ही बांगलादेश दूतावासासमवेत पत्रव्यवहार केला आहे; मात्र त्यांच्याकडून आम्हाला अजून याविषयी कुठलेही उत्तर आले नाही. या दोघांच्या मूळ गावाचा पत्ता आणि काही कागदपत्रे आम्ही मिळवली आहेत. आम्ही सातत्याने बांगलादेश दूतावासाच्या संपर्कात असून न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून लवकरच त्यांना त्यांच्या देशात पाठवले जाईल.