मुंबईत गणेशोत्सव मंडळांच्या अनुमतीसाठी ३ सहस्रांपैकी केवळ १९७ अर्ज प्रविष्ट
मुंबई – ‘मुंबईत ११ सहस्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. त्यापैकी जी मंडळे रस्त्यावर मंडप उभारून गणेशोत्सव साजरा करतात, अशा मंडळांना पालिकेची अनुमती घ्यावी लागते. अशी साधारण तीन सहस्र मंडळे दरवर्षी पालिकेकडे अनुमती मागत असतात. प्रतीवर्षी ही संख्या वाढत असते. यंदा मात्र अनुमती चालू केल्यापासून गेल्या पाऊण मासात केवळ १९७ अर्ज प्रविष्ट झाले आहेत’, अशी माहिती पालिका अधिकार्यांनी दिली.
गेल्या वर्षीच्या अनुमतीच्या आधारे यंदाही गणेशोत्सव मंडळांना अनुमती दिली जाणार आहे. गेल्या वर्षी ज्यांना अनुमती दिली होती, त्यांना पुन्हा पोलीस किंवा वाहतूक विभाग यांच्या अनुमतीसाठी थांबावे लागणार नाही, अशी सोय केलेली असली, तरी त्यासाठी सर्व मंडळांना लेखी हमीपत्र द्यावे लागणार आहे. कोरोनाच्या संसर्गाच्या दृष्टीने हमीपत्रात पालिकेने अनेक अटी घातल्या आहेत. त्यांचेही पालन करावे लागणार आहे.
सार्वजनिक गणेशोत्सवालाही सरकारच्या उदासीनतेचा फटका – भाजपचे नेते आशिष शेलार
मंदिरे बंद आहेत. सार्वजनिक गणेशोत्सवालाही सरकारच्या उदासीनतेचा फटका बसला आहे. प्रतीवर्षी अनुमती घेणार्या ३ सहस्र मंडळांपैकी केवळ १९७ अर्ज प्रविष्ट झाले आहेत. कोकणात जाणार्यांनाही अद्याप स्पष्टता दिलेली नाही, अशी टीका भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केली आहे.