‘परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांकडून साधनेद्वारे पंढरीची आनंदवारी करून घेत आहेत’, असा भाव ठेवून साधिकेने व्यक्त केलेली भावपूर्ण कृतज्ञता !
१. ईश्वरप्राप्तीसाठी तळमळणार्या जिवांना परात्पर गुरु डॉक्टरांनी आनंद देणे
‘मनुष्य जन्माला आल्यावर ‘मला आनंद कसा मिळेल ? मी सतत आनंदी कसे राहू ?’, यासाठीच प्रयत्नरत असतो. तो दुःख हलके करण्यासाठी विविध आनंदप्राप्तीचे मार्ग शोधत असतो. मायेतील सुख आणि पारमार्थिक आनंद अशा दोन मार्गांनी तो सुख / आनंद शोधत असतो. काहीच साधना न करणारे आणि अल्प साधना करणारे मायेतील सुखाकडे आकर्षित होतात, तर भक्तीमयी जीव पारमार्थिक आनंदाकडे आकर्षित होतात. ‘असेच सहस्रो भक्तीमय आणि आनंदमय जीव परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी आकर्षित झाले आणि त्यांचेच झाले. ‘दुःखावर मात करून सातत्याने मिळणार्या आनंदप्राप्तीचा मार्ग परात्पर गुरु डॉक्टरच आपल्याला दाखवू शकतात’, याची या जिवांना शाश्वती झाली आहे. परात्पर गुरु डॉक्टरांनी ईश्वरप्राप्तीसाठी तळमळणार्या जिवांना महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयात प्रवेश देऊन आनंद प्राप्त करण्याची प्रक्रिया चालू केली.
२. परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितलेले साधनेचे टप्पे आणि त्यातून साधकांनी अनुभवलेला आनंद
२ अ. साधनेचा पहिला टप्पा कुलदेवी आणि दत्त यांचा नामजप सांगणे : ‘आनंदप्राप्तीचा पहिला टप्पा ‘श्री कुलदेवतायै नमः । आणि श्री गुरुदेव दत्त ।’ या नामजपांनी आरंभ झाला. कुलदेवीने प्रसन्न होऊन आपल्या कुळाच्या लेकरांना स्वहस्ते परात्पर गुरु डॉक्टर यांच्या चरणी पुढच्या प्रगतीसाठी स्वाधीन केले. काय वर्णावी ती स्थिती ! पहिल्याच टप्प्यात अंतर्मनाच्या शुद्धीला प्रारंभ झाला. एखादा बांध फुटून पाणी प्रचंड वेगाने वाहू लागते, तसे भावाश्रूंचा बांध फुटून प्रचंड वेगाने नेत्रद्वारातून आनंदाश्रू घळाघळा वाहू लागले. प्राथमिक आनंदाची प्रचीती येथे आली आणि साधक पुढच्या टप्प्याचा आनंद घेण्यास उत्सुक झाले.
२ आ. आनंदप्राप्तीचे महत्त्वपूर्ण टप्पे म्हणजे ‘सत्संग आणि सत्सेवा’ सांगणे : ‘ज्याप्रमाणे गुलाबजाम पाकात बुडवल्यावर मधुर आणि रसरशीत होतात, तसे भगवंताने सत्संग देऊन अन् सत्सेवा सांगून साधकांना आनंदरसात पूर्णतः बुडवले. या घोर कलियुगात साधनेचा गोडवा आणि ईश्वरी महिमा समाजात जाऊन सांगण्याचे परम भाग्य साधकांना लाभले. श्री गुरूंची ही वानरसेना देश-विदेशात श्री गुरुकृपेने वायूवेगाने अध्यात्मप्रसार करू लागली. धर्मसत्संग, नियतकालिके (वृत्तपत्र), प्रथमोपचार प्रशिक्षण, हिंदु राष्ट्र-जागृती सभा, हिंदू अधिवेशन या सर्वांतून आनंदाच्या लाटा साधकांच्या अंतर्मनात उसळू लागल्या. संत आणि सद्गुरु यांच्या माध्यमातून गंगा वाहू लागली. सत्संगामुळे साधकांना नित्य भक्तीस्नान घडू लागले आणि भगवंताची भेट होऊ लागली. इतके सर्व करून नामानिराळा रहाणारा ‘रामनाथीचा पांडुरंग’ (परात्पर गुरु डॉ. आठवले) आम्ही ‘याची देही, याची डोळा’ पाहिला. मनुष्यजन्माचे सार्थक झाल्याने साधक रामनाथी देवाचरणी कृतकृत्य झाले. आता पुढची आनंदावस्था अनुभवण्यास साधक सिद्ध झाला.
३. स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेमुळे मने निर्मळ होऊन तिथे गुरुपादुकांची प्रतिष्ठापना होणे
साधक समाधानी झाले, तरी भगवंताचे समाधान झाले नव्हते. तो आपल्या भोळ्या भक्तांना स्वतःतच सामावून घेण्यास उत्सुक झाला होता. साधकांतील स्वभावदोषांमुळे त्यांना मिळणार्या आनंदात व्यत्यय येत होता; म्हणून परात्पर गुरु डॉक्टरांनी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेचा महामंत्र देऊन साधकांचे हृदयमंदिर पवित्र, शुद्ध आणि निर्मळ करण्यास प्रारंभ केला. त्यामुळे भाडोत्री स्वभावदोषांचे धाबे दणाणले. ते भाड्याचे घर सोडून निघून गेले. अंतरीचे खरे मालक परात्पर गुरु डॉक्टर तिथे विराजमान झाले. नित्य आनंदी-आनंद अनुभवायला मिळू लागला. हृदयमंदिरी गुरुपादुकांची प्रतिष्ठापना झाली. आता प्रत्यक्ष भगवंत भक्तांशी बोलून त्यांना दिशा देऊ लागला. साधकांची भावस्थिती काय वर्णावी ? ‘आता आपले कुळ आणि मूळ सर्व गुरुदेवच आहेत’, या आनंदाने साधकांचे तन, मन आणि धन सर्व श्री गुरुचरणी समर्पित झाले. प्रीतीची फुले उमलली. सजीव आणि निर्जीव या सर्वांत परमात्म्याचे दर्शन घडू लागले. साधकांतील प्रेमभाव वाढला. या आनंदमय प्रवासात चालता चालता ही पंढरीची आनंदवारी श्री गुरुचरणात लीन झाली.
‘हे कृपाळू गुरुमाऊली, वरील लिखाण या अल्प बुद्धीकडून आपणच लिहून घेतले, यासाठी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. शकुंतला बद्दी, खारघर, नवी मुंबई. (२०.७.२०१९)