सातारा शहरातील खड्ड्यामुळे युवकाचा मृत्यू !

अनेक दिवसांपासून पडलेला खड्डा न बुजवणारे प्रशासन जनतेच्या जिवाशी खेळत आहे, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ? प्रशासनाने आतातरी रस्त्यात अन्यत्र कुठे खड्डे नसल्याची निश्चिती करावी.- संपादक 

 

प्रतिकात्मक छायाचित्र

सातारा, ९ ऑगस्ट (वार्ता.) – शहरातील गुरुवार बागेसमोर गत काही दिवसांपासून खड्डा पडला आहे. तो खड्डा दिवसाही वाहनचालकांना दिसत नाही. ६ ऑगस्टच्या रात्री १० वाजता हा खड्डा चुकवण्यासाठी अचानक वळण घेतल्यामुळे टेम्पो आणि दुचाकी यांच्यात धडक झाली. या अपघातामध्ये पिलाणी येथील ३२ वर्षीय युवक विनायक संपतराव साळुंखे यांचा मृत्यू झाला. स्थानिकांनी विनायक यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात भरती केले; मात्र तेथील आधुनिक वैद्यांनी त्यांना मृत घोषित केले. विनायक हे व्यवसायाने छायाचित्रकार होते.