बांगलादेशी हिंदूंचे अश्रू !

बांगलादेशमध्ये सातत्याने हिंदु कुटुंबे, हिंदु मुली आणि स्त्रिया, तसेच मंदिरे यांच्यावर सातत्याने आक्रमणे होत आहेत. त्यात ७ ऑगस्ट या दिवशी झालेल्या आक्रमणाने आणखी एकाची भर पडली. हिंदूंची घरे आणि दुकाने धर्मांधांनी लुटली, मंदिरांमधील मूर्ती फोडल्या. धर्मांधांची दंगल म्हटली की, त्यांनी अजून काय काय केले असेल, हे सांगता येत नाही. शेकडो धर्मांधांनी एकत्र येऊन हिंदूंवर केलेले हे आक्रमण नेहमीप्रमाणेच भारत किंवा अमेरिका येथील मानवाधिकार संघटनांना, तसेच भारतातील नसिरूद्दीन शहा, जावेद अख्तर यांसारख्या तद्दन फिल्मी हिंदुद्वेष्ट्यांनाही दिसलेले नाही. धर्मांधांनी हिंदूंवर एवढ्या मोठ्या प्रमाणात आक्रमण करूनही बांगलादेशातील माध्यमांमध्ये याचे वृत्त कालपर्यंत तरी प्रसारित केले गेले नव्हते. भारतातील माध्यमांत हे वृत्त प्रसारित झाले, हा अलीकडच्या काळात प्रसारमाध्यमांमध्ये होत असलेला मोठा पालट आहे.

अल्पसंख्य हिंदूंचे दमन थांबवा !

गत अनेक वर्षे बांगलादेशी धर्मांधांनी चालू ठेवलेल्या हिंदूंच्या वंशविच्छेदास हिंदु बांधवांविषयी एक होऊन कृती न करणारे भारतीय हिंदू आणि आतापर्यंत देशावर सत्ता गाजवणारे सर्वपक्षीय शासनकर्ते उत्तरदायी आहेत. देशावर अधिक काळ काँग्रेसची सत्ता होती. स्वदेशातील हिंदूंचाही द्वेष करणार्‍या नेहरू-गांधी घराण्याकडून विदेशातील हिंदूंविषयी कृती करण्याची अपेक्षा काय करणार म्हणा ! या वर्षी २८ मार्चला पंतप्रधान मोदी यांनी बांगलादेशला भेट दिली. त्या वेळी तेथील इफाजत-ए-इस्लाम या संघटनेच्या धर्मांधांनी त्याला प्रचंड विरोध केला. शेकडो धर्मांधांनी ज्या पद्धतीने मोर्चा काढून हिंदूंवर आणि मंदिरांवर आक्रमण केले, जाळपोळ केली, महामार्ग रोखले, पोलिसांना घायाळ केले, त्याचे ‘व्हिडिओ’ धडकी भरवणारे आहेत. त्या वेळी बांगलादेशी पोलीस हवेत गोळ्या झाडत होते; परंतु शेकडो धर्मांध त्या गोळ्यांना यत्किंचितही जुमानत नव्हते. आताही हिंदूंनी पोलिसांचे साहाय्य मागूनही पोलिसांनी ते केलेले नाही आणि हिंदूंनाही प्रतिकार करू दिला नाही. वर्ष २०२० मध्ये ५२० हिंदू येथील धर्मांधांच्या आक्रमणात घायाळ झाले. हिंदूंच्या हत्या, तेथील हिंदु मुलींचा लैंगिक छळ आदी कारणांमुळे तेथील बहुसंख्य हिंदू पलायन करत आहेत. बांगलादेशच्या निर्मितीपासून तेथील हिंदूंवर होणारे अत्याचार पाहता ‘वर्ष २०५० मध्ये तेथे एकही हिंदू उरणार नाही’, असा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. भारतीय वंशाच्या अमेरिकी नेत्या तुलसी गबार्ड यांनी बांगलादेशमधील हिंदूंच्या अत्याचारांविषयी मध्यंतरी संताप व्यक्त केला होता. वर्ष १९४७ मध्ये ३० टक्के हिंदु असलेल्या पूर्व पाक म्हणजे आताच्या बांगलादेशमध्ये आता केवळ ७ टक्के हिंदू शिल्लक राहिले आहेत. त्यांची संख्या ७० लाखांपर्यंत आहे. यापुढे निदान त्यांचे संरक्षण होणे महत्त्वाचे आहे.

(प्रतिकात्मक छायाचित्र)

बांगलादेशी हिंदूंचा वाली कोण ?

बांगलादेशी हिंदूंच्या हालअपेष्टा जगासमोर आणण्याचा प्रयत्न करणार्‍या आणि तेथील हिंदूंना न्याय देण्याचा प्रयत्न करणारी ‘बांगलादेशी हिंदु मायनॉरिटी वॉच’ यांसारख्या काही हाताच्या बोटावर मोजण्यासारख्या संघटना तिथे हिंदूंसाठी कार्यरत आहेत. तेथील सरकारकडून यासाठी ठोस काहीही प्रयत्न केला जात नाही. वर्ष १९७१ च्या पाकसमवेतच्या युद्धानंतर भारताने बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून दिले. याचे उपकार खरेतर बांगलादेश सरकारने सतत ठेवून बांगलादेशी हिंदूंना संपूर्ण संरक्षण देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. जर त्यांच्याकडून तसे होत नसेल, तर भारताने तसे करण्यास त्यांना भाग पाडले पाहिजे. सध्या आशिया खंडात अर्थातच भारतासमवेत बांगलादेशचा सर्वाधिक व्यापार आहे. भारताकडून बांगलादेशला मोठ्या प्रमाणात वीज पुरवली जात आहे. सागरी संरक्षणासह अन्य अनेक गोष्टींत बांगलादेशसमवेत भारत मिळून काम करत आहे. ही गोष्टही भारत बांगलादेशातील हिंदूंचे संरक्षण हक्क कायम ठेवण्यासाठी दबाव निर्माण करण्यासाठी वापरू शकतो. पंतप्रधान शेख हसिना यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेली आंब्यांची भेट, बांगलादेशी सैन्याचा भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या समारंभामधील सहभाग, मार्चमध्ये झालेल्या बंगालच्या निवडणुकांच्या वेळी पंतप्रधान मोदी यांनी बांगलादेशच्या सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने दिलेली भेट या गोष्टी घडत असल्या, तरी अद्याप तेथील हिंदूंवरील आक्रमणे थांबलेली नाहीत, हे सत्य आहे. मोदी सरकारच्या आंतरराष्ट्रीय विदेशनीतीमध्ये बांगलादेशाशी असलेल्या संबंधांचा एक अध्याय अवश्य आहे; परंतु अजूनही तेथील हिंदूंवरील प्राणघातक आक्रमणे थांबत नसून वाढत असतील, तर त्यामध्ये अजून कुठल्या नीतीचा अवलंब करावा लागेल, हे सरकारला पडताळून पहाण्याची आता वेळ आली आहे. विश्व हिंदु परिषदेने या आक्रमणाविषयी आंतरराष्ट्रीय संघटनेला पत्र लिहिले आहे; परंतु भारतातील हिंदूंनी मोठ्या प्रमाणात सामाजिक माध्यमांतून मागणी करून बांगलादेशी हिंदूंच्या संरक्षणासाठी, त्यांची झालेली हानी भरून काढण्यासाठी आणि आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी भारत सरकारला दबाव टाकण्यास सांगितले पाहिजे. याप्रकारे धर्मबांधवांसाठी संघटित होण्याचा सामाजिक माध्यमाचा दुसरा कुठला चांगला उपयोग असेल ? ‘धर्मांध हिंदूंवर करत असलेली आक्रमणे कायमची बंद होतील’, असे वातावरण निर्माण होईल, अशी शिक्षा या आक्रमणकर्त्यांना होणे अपेक्षित आहे. भारतात हिंदूंचा एवढा प्रभाव निर्माण होणे आवश्यक आहे की, भारतात काय भारताबाहेरील हिंदूंकडेही वाकड्या दृष्टीने पहाणे अन्य धर्मियांना शक्य होणार नाही. ‘धर्मबांधवांच्या रक्षणाकरिता ही स्थिती निर्माण होण्यासाठी भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना झाली पाहिजे’, असे येथील धर्मप्रेमींना वाटले, तर चूक ते काय ?