साधनेचे प्रयत्न तळमळीने करणार्या पुणे येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. अश्विनी ब्रह्मे !
साधनेचे प्रयत्न तळमळीने करणार्या आणि भावपूर्ण सेवा करणार्या सिंहगड रस्ता, पुणे येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. अश्विनी अशोक ब्रह्मे (वय ६३ वर्षे) !
सौ. अश्विनी अशोक ब्रह्मे मागील १९ वर्षांपासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत. त्या प्रसाराची सेवा करतात. त्यांच्याविषयी पुणे येथील साधिकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्यात झालेले पालट पुढे दिले आहेत.
१. व्यवस्थितपणा
‘सौ. ब्रह्मेकाकू आणि मी एकत्र सेवा करतो. काकूंचे अक्षर चांगले आहे. त्यांचे सारणी लिखाण, तसेच साप्ताहिक पडताळणी आढावा व्यवस्थित असतो. त्यांच्या लिखाणाकडे पाहिल्यावर चांगली स्पंदने जाणवतात.’
– सौ. मंगला सहस्रबुद्धे (६६ टक्के आध्यात्मिक पातळी)
२. स्वीकारण्याची वृत्ती
‘आधी काकू परिस्थिती स्वीकारत नसत. सेवेचे दायित्व घ्यायची त्यांना भीती वाटायची. आता त्यांनी ग्रंथांची सेवा स्वीकारली असून त्या दायित्व घेऊन सेवा करतात.’
– सौ. चारूलता पानघाटे (६३ टक्के आध्यात्मिक पातळी) आणि श्रीमती शीतल नेरलेकर (६५ टक्के आध्यात्मिक पातळी)
३. व्यष्टी साधनेचे प्रयत्न
अ. ‘व्यष्टी साधनेच्या आढाव्यात काकू स्वतःच्या मनाची स्थिती मनमोकळेपणाने सांगतात आणि स्वतःची प्रतिमा न जपता प्रांजळपणे आढावा देतात.’
– श्रीमती शीतल नेरलेकर आणि सौ. मंगला सहस्रबुद्धे
आ. ‘काकू अहं-निर्मूलनाचे प्रयत्न, चूक सांगणे, घरी फलकावर चुका लिहिणे, क्षमायाचना करणे आदी सर्व प्रयत्न प्रामाणिकपणे करतात. २ – ३ वर्षांपासून त्यांच्या व्यष्टी साधनेच्या प्रयत्नांत सातत्य आहे.’
– सौ. मनीषा पाठक (६८ टक्के आध्यात्मिक पातळी)
४. सेवेची तळमळ
अ. ‘पाय दुखत असूनही काकू हडपसर येथे ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’च्या प्रसाराला जात होत्या.
आ. केंद्रात ग्रंथ वितरण मोहीम असेल, तर काकूंकडे दायित्व असते. त्या ती सेवा भावपूर्ण आणि परिपूर्णरित्या करतात.’
– सौ. स्नेहल सहस्रबुद्धे (६४ टक्के आध्यात्मिक पातळी)
इ. ‘काकूंच्या पायांत गाठी झाल्या आहेत, तरी त्या प्रसारसेवेला जातात. सेवा परिपूर्ण करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.’ – सौ. राधा सोनवणे
ई. त्यांनी प्रेमभावामुळे अनेक वाचकांना जोडून ठेवले आहे. सर्व वाचकांना सनातनची सात्त्विक उत्पादने, ग्रंथ, सत्संग आदींचा लाभ व्हावा, यासाठी त्यांची धडपड चालू असते.’
– सौ. मनीषा पाठक
उ. ‘त्या प्रत्येक सेवा मनापासून, देवाला शरण जाऊन आणि भावपूर्ण रितीने करण्याचा प्रयत्न करतात.’
– सौ. मंगला सहस्रबुद्धे
५. प.पू. गुरुदेवांप्रती भाव
‘काकूंचे बोलणे आणि कृती यांतून त्यांचा परात्पर गुरु डॉक्टरांप्रती असलेला भाव जाणवतो. आढावा देतांना ‘गुरुदेवांना आढावा देत आहोत’, असा त्यांचा भाव असतो.’
– सौ. राधा सोनवणे
६. काकूंमध्ये जाणवत असलेले पालट
अ. ‘पूर्वी काकूंना साधकांकडून अपेक्षा असायच्या. आता त्या न्यून झाल्या आहेत. काकूंमध्ये शिकण्याची वृत्ती असल्यामुळे अहं अल्प जाणवतो.’
– सौ. राधा सोनवणे
आ. ‘काकूंमधील प्रेमभाव पुष्कळ वाढला असून त्या बोलत असतांना त्यांच्यात स्थिरता आणि शांती जाणवते.’
– सौ. चारूलता पानघाटे
इ. ‘काकूंची अंतर्मुखता वाढली आहे. त्यांच्या बोलण्यातून चुकांची खंत जाणवते. त्या सतत परात्पर गुरुदेवांच्या अनुसंधानात असतात.’
– सौ. मंगला सहस्रबुद्धे
ई. ‘पूर्वी सेवांविषयी सांगतांना काकूंच्या बोलण्यात कर्तेपणा जाणवायचा; परंतु आता बोलतांना ‘गुरुदेवांनी करून घेतले’, असा त्यांचा भाव असतो. त्यांच्या मनात कधी कर्तेपणाचा विचार आला, तर त्याविषयी प्रांजळपणे सांगून त्या क्षमायाचना करतात. पूर्वी कुटुंबियांविषयी त्यांचा कृतज्ञता वाटण्याचा भाग अल्प होता; परंतु आता ‘गुरुदेवांनीच हे कुटुंबीय दिले आहेत’, असा त्यांचा भाव असतो. काकूंचा तोंडवळा आधीपेक्षा हसरा आणि आनंदी दिसतो.’
– सौ. मनीषा पाठक (११.६.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |