राज्यातील ७७ टक्के पीकक्षेत्रावर वातावरण पालटाचा परिणाम !
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ येथील ११ जिल्हे सर्वाधिक आघातप्रवण !
संभाजीनगर – हवामानात पुष्कळ पालट झाला आहे. त्यामुळे दुष्काळ आणि क्षीण झालेली जलसुरक्षा यांमुळे शेतीच्या दृष्टीने मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ येथील एकूण ११ जिल्हे सर्वाधिक आघातप्रवण झाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे या ११ जिल्ह्यांमध्ये राज्याचे ४० टक्के पीकक्षेत्र आहे. त्याच वेळी राज्यातील ३७ टक्के पीकक्षेत्र असलेले १४ जिल्हे मध्यम स्वरूपात आघातप्रवण झाले आहेत. राज्यातील जवळपास ३ चतुर्थांश पीकक्षेत्र हे वातावरणीय पालटामुळे आघातप्रवण झाले आहे, असे एका अभ्यासातून पुढे आले आहे.
वातावरणीय पालटाचा सामाजिक आणि आर्थिक अभ्यास करणार्या ‘भारतीय कृषी संशोधन परिषद’ आणि ‘राष्ट्रीय डेअरी संशोधन परिषदे’ यांच्या वतीने चैतन्य आढाव यांनी या अनुषंगाने अभ्यास पूर्ण केला आहे. उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार जिल्हा हा चक्रीवादळे, पूर, पावसाचे पालटते ‘पॅटर्न’ आणि तीव्र तापमान यांमुळे पिकांसाठी सर्वाधिक आघातप्रवण आहे, तसेच मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड, परभणी अन् हिंगोली, विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती आणि वाशिम हे १० जिल्हे अधिक प्रमाणात आघातप्रवण, वातावरण पालटास अधिक संवेदनशील आहेत’, असे अभ्यासक चैतन्य आढाव यांनी सांगितले.
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील लातूर, धाराशिव आणि विदर्भातील यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया अन् गडचिरोली हे इतर १४ जिल्हेही मध्यम स्वरूपात आघातप्रवण झाले आहेत. मुख्यत्वे करून या जिल्ह्यांतील ज्वारी, तांदूळ, गहू, ऊस, कापूस, नाचणी, काजू, बार्ली आणि बाजरी या पिकांना वातावरणातील संकटांचा सर्वाधिक फटका सहन करावा लागू शकतो, असेही अभ्यासातून पुढे आले आहे.