विवाहाच्या अंतर्गत बलात्काराला भारतात शिक्षा नाही ! – केरळ उच्च न्यायालय

थिरूवनंतपूरम् (केरळ) – विवाहाच्या अंतर्गत बलात्काराला भारतात शिक्षा नसली, तरी त्याच्या आधारावर घटस्फोटासाठी निश्चितपणे दावा केला जाऊ शकतो, असे केरळ उच्च न्यायालयाने म्हटले आहे. या वेळी विवाह कायद्यात सुधारणा करण्याची आवश्यकताही न्यायालयाने व्यक्त केली.

१. न्यायालयाने म्हटले की, पत्नीच्या स्वायत्ततेकडे दुर्लक्ष करणारा पतीचा स्वभाव विवाहांतर्गत बलात्कार आहे; मात्र अशा वर्तनाला शिक्षा दिली जाऊ शकत नाही. असे वर्तन शारीरिक आणि मानसिक छळ आहे. विवाहातील जोडीदारांना समान वागणूक दिली पाहिजे. पतीने पत्नीच्या शरिरावर वर्चस्वाचा दावा करू नये.

२. एका प्रकरणात पत्नीने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी धाव घेतली होती. त्यानंतर पत्नीला छळाच्या आधारावर घटस्फोटासाठी अनुमती देण्यात आली होती. या निकालाच्या विरोधात पतीने केरळ उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती; मात्र न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.