पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटचे विलिनीकरण अन्यायकारक असल्याचा विद्यार्थी संघटनांचा आरोप !
पुणे, ८ ऑगस्ट – येथील रानडे इन्स्टिट्यूट म्हणजे ‘संज्ञापन आणि पत्रकारिता विभाग’ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या ‘माध्यम आणि संज्ञापन विभाग’ या दोन्ही विभागाच्या विलिनीकरणाचा अध्यादेश कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांनी काढला आहे. त्या अध्यादेशाचा विद्यार्थ्यांकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. हा अध्यादेश त्वरित मागे घ्यावा अन्यथा आंदोलन करू, अशी चेतावणी विद्यार्थी संघटनांनी दिली आहे. रानडे इन्स्टिट्यूट येथील अनुदानित अभ्यासक्रम बंद करून विनाअनुदानित विभागात समावेश करणे अन्यायकारक असल्याचे मनविसे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी सांगितले. तर रानडे इन्स्टिट्यूट विद्यापिठाच्या आवारात स्थलांतर करून तो बंद पाडण्याचा घाट घातल्याचा आरोप ‘स्टुडंट हेल्पिंग हँड’चे अध्यक्ष कुलदीप आंबेकर यांनी केला आहे.
विद्यापिठामध्ये पत्रकारितेच्या संबंधित शिक्षण देणारे २ विभाग कार्यरत आहेत. यातील रानडे इन्स्टिट्यूटमध्ये पदवी अभ्यासक्रम असून तो अनुदानित आहे, तर विद्यापिठाच्या आवारात असणारा ‘माध्यम आणि संज्ञापन विभाग’ हा विनाअनुदानित आहे. अनुदानित अभ्यासक्रम बंद करून विद्यापीठ प्रशासन पैसे कमावण्याचा व्यवसाय म्हणून शिक्षणाकडे बघत आहे का ? असा आरोप विद्यार्थी संघटना करत आहेत.