समाज, राज्यघटना आणि संसाधने वाचवण्यासाठी ‘जन आझादी’चा लढा पुकारण्याचा संकल्प ! – मेधा पाटकर
पुणे – समाज, राज्यघटना आणि संसाधने वाचवण्यासाठी जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाच्या वतीने देशभर ‘जन आझादी’चा लढा पुकारण्याचा संकल्प केला आहे. ९ ऑगस्ट क्रांतीदिन ते स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवापर्यंत (१५ ऑगस्ट २०२२) या वर्षभरात स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वपूर्ण स्थानी जनजागृतीपर आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती आंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयक नेत्या मेधा पाटकर यांनी दिली. वर्षभर जल्लोष करण्यापेक्षा अधिकार आणि हक्क देणारे खरे स्वातंत्र्य हवे अशी अपेक्षा व्यक्त करतांना त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली.
त्या म्हणाल्या, ‘‘वन, जंगल, भूमी यांवरील आक्रमणे, महिला अत्याचार, बेरोजगारी, आदिवासी आणि दलित यांचे प्रश्न यांकडे त्यांनी लक्ष वेधले. उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण यांचे धोरण देशाला गुलामगिरीकडे नेत आहे. राज्यघटनेमध्ये कंपनीकरणाला स्थान नाही; मात्र सरकारची धोरणे कंपनीकरणाला प्रोत्साहन आहेत.’’