कोरोनावरील २ डोस घेतलेल्यांना १५ ऑगस्टपासून लोकलने प्रवास करण्यास अनुमती ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री
मुंबई – १५ ऑगस्टपासून मुंबईत सर्वसामान्यांना लोकलमधून प्रवास करता येणार आहे. पहिल्या टप्प्यात ज्या नागरिकांना कोरोनावरील २ डोस घेऊन १४ दिवस पूर्ण झाले आहेत, अशा नागरिकांना लोकलमधून प्रवास करता येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. ८ ऑगस्ट या दिवशी जनतेशी ‘ऑनलाईन’ संवाद साधतांना उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली. प्रार्थनास्थळे, रेस्टॉरंट, मॉल उघडण्याविषयीचा निर्णय लवकरच घोषित करण्यात येईल, असेही या वेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितले. या संवादामध्ये मुख्यमंत्र्यांनी राज्यातील कोरोनाची स्थिती, निर्बंध शिथिल करणे आणि पूरग्रस्तांसाठी करावयाचे साहाय्य यांवर भाष्य केले.
या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले,
१. लोकलमधून प्रवास करण्यासाठी नागरिकांना पास उपलब्ध होणार आहे. यासाठी ‘ॲप’ सिद्ध करण्यात आले आहे. या ‘ॲप’मध्ये कोरोनावरील किती डोस आणि कधी घेतला याची माहिती भरावयाची आहे. त्यानंतर त्या नागरिकाला भ्रमणभाषवर पास उपलब्ध होईल. ज्यांच्याकडे भ्रमणभाष नाही त्या नागरिकांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालयात पास उपलब्ध होईल.
२. ‘टास्क फोर्स’ची बैठक ९ ऑगस्ट या दिवशी होणार आहे. या बैठकीमध्ये राज्यातील कोरोनास्थितीचा आढावा घेऊन प्रार्थनास्थळे, रेस्टॉरंट, मॉल आदी उघडण्याविषयी निर्णय घेण्यात येईल.
३. पुणे, नगर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि बीड या जिल्ह्यांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या अधिक आहे. या जिल्ह्यांमध्ये काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
४. नैसर्गिक आपत्तीविषयी राज्यात कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक आहेत. त्यासाठी धोकादायक वस्त्यांचे पुनर्वसन आणि ज्या गावांत पाणी शिरते तेथे पुराचे व्यवस्थापन अशा दूरगामी योजना आखाव्या लागतील.