वर्ष २०२१ च्या गुरुपौर्णिमेनिमित्त सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी साधकांना केलेले अनमोल मार्गदर्शन आणि त्यांच्याकडून साधिकेला शिकायला मिळालेले सूत्र
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांना ५४ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
श्रावण शुक्ल पक्ष प्रतिपदा (९.८.२०२१) या दिवशी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक आणि सनातनचे सद्गुरु डॉ. चारुदत्त प्रभाकर पिंगळे यांचा ५४ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांनी साधकांना केलेले साधनेविषयीचे मार्गदर्शन आणि त्यांच्याकडून साधिकेला शिकायला मिळालेले सूत्र पुढे दिले आहे.
‘साक्षात् परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सगुण रूप असलेल्या सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाका यांनी २४.७.२०२१ या दिवशी (गुरुपौर्णिमेच्या दुसर्या दिवशी) ‘व्हिडिओ कॉल’ करून देहली सेवाकेंद्रातील साधकांना अनमोल मार्गदर्शन केले. त्यांचे मार्गदर्शन आणि त्यांच्याकडून शिकायला मिळालेले सूत्र पुढे दिले आहे.
१. सद्गुरु डॉ. चारुदत्त प्रभाकर पिंगळे यांच्या मार्गदर्शनातील सूत्रे
अ. ‘साधकाने ‘गुरुदेव करवून घेतील’, असा भाव ठेवला, तर त्याची कोणतीही समस्या सुटते’, याची अनुभूती त्याला येते.
आ. भगवंताला आध्यात्मिक नेतृत्व अपेक्षित आहे. त्यामुळे साधनेत ‘आध्यात्मिक स्तरावर प्रयत्न करणे आणि सातत्य असणे’ आवश्यक आहे.
इ. गुरुपौर्णिमा तिथीनुसार वर्षातून एकदाच असते; परंतु आपण गुरुकृपायोगानुसार साधना करत आहोत. साधकांनी ‘आपल्यासाठी प्रतिदिन गुरुपौर्णिमाच आहे’, असा भाव ठेवून प्रयत्न करावे. प्रत्येक सत्संगाच्या वेळी वरीलप्रमाणे भाव ठेवला, तर गुरुकृपायोगानुसार आपली गुरुपौर्णिमा क्षणोक्षणी साजरी होऊ शकते.
ई. साधनेत मिळणार्या प्रत्येक संधीचे सोने करायचे आहे. यासाठी आपल्याला प्रत्येक क्षणी भक्तीभावाने प्रयत्न करायचे आहेत.
उ. ‘संत किंवा उत्तरदायी साधक सांगतात, तेच सत्य आहे’, असा भाव ठेवून प्रयत्न केला, तर कोणताही साधक साधनेत मागे पडणार नाही.
ऊ. ‘मनात एक आणि बाहेर दुसरेच’, असे दाखवत राहिलो, तर साधनेला गती मिळत नाही. त्यासाठी मनातून गुरुदेवांना अपेक्षित असलेले प्रयत्न करणे आवश्यक आहे.
२. ‘साधकांप्रती भाव कसा असावा ?’, याविषयी सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्याकडून साधिकेला शिकायला मिळालेले सूत्र
मार्गदर्शनाच्या शेवटी सद्गुरु काका आम्हा सर्व साधकांना म्हणाले, ‘‘तुम्हा सर्वांमध्ये वास करत असलेल्या गुरुतत्त्वाला मी साष्टांग नमस्कार करतो. तुम्हा सर्वांमुळेच माझी साधना होत आहे. माझे तुम्हा सर्वांशी रक्ताचे नाते नसले, तरी गुरुबंधुत्वाचे शाश्वत नाते आहे. येथे आश्रमात आपण सर्व जण सनातन परिवार म्हणून एकत्र रहात आहोत.’’
‘गुरुदेव, आपल्या कृपेने ‘साधकांप्रती कसा भाव असावा ?’, हे सद्गुरु पिंगळेकाकांच्या वाणीतून मला शिकायला मिळाले. ‘माझ्यामध्येही असाच भाव निर्माण होऊ दे’, हीच आपल्या पावन श्री चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना करते.’
– कु. पूनम चौधरी, सनातन सेवाकेंद्र, देहली सेवाकेंद्र (२५.७.२०२१)