साधनेत फळाची अपेक्षा न ठेवण्याचे कारण !
‘गुरूंच्या मार्गदर्शनानुसार साधना करत असतांना शिष्याचा सर्व भार गुरूंनी उचललेला असतो. गुरु त्याला त्याच्या मागच्या जन्मीची साधना, त्याचे प्रारब्ध, देवाणघेवाण हिशोब, साधना करण्याची क्षमता, वाईट शक्तींचा त्रास यांसारख्या विविध घटकांचा विचार करून साधना शिकवतात. हे सर्व घटक त्या साधकासाठी त्याच्या वैयक्तिक कर्जाप्रमाणे असतात. तो करत असलेली साधना, त्याचे हे ‘कर्ज’ फेडण्यासाठी वापरली जाते. यात महत्त्वाचे म्हणजे, त्या साधकाला ‘त्याच्यावर किती कर्ज आहे ?’, हे ज्ञात नसते आणि त्याला ते कळणेही शक्य नसते. हे कर्ज फेडण्यासाठी केवळ ‘गुरूंनी सांगितलेली साधना श्रद्धेने करत जाणे’, हेच त्याचे क्रियमाण कर्म असते. त्यामुळे ‘मी साधना करतो, तरी मला साधनेने अद्याप काही साध्य का झाले नाही ?’, असा विचार करू नये.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
साधना करणार्या कुटुंबांमध्येच साधकांप्रमाणे खरी कुटुंबभावना निर्माण होईल !
‘एकत्र-कुटुंब पद्धतीतील व्यक्ती सात्त्विक असतील, तरच एकत्र राहिल्यामुळे त्यांना आश्रमात राहिल्याप्रमाणे समष्टीचा लाभ होतो; परंतु सध्याच्या काळात असे कुटुंब बघायला मिळणे दुर्लभ झाले आहे. आई, वडील, मुलगा, सून अशा चार व्यक्तींचे छोटे कुटुंब असले, तरी चार जणांची चार मते असतात. सर्वजण साधना करायला लागले की, त्यांच्यात आश्रमातील साधकांप्रमाणे खरी कुटुंबभावना निर्माण होईल.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
वेदनेचे लाभ !
‘वेदना झाल्या की, प्रत्येकालाच त्रास होतो आणि ‘त्या कधी थांबतील’, असे वाटते. प्रत्यक्षात वेदनेमुळे फार लाभही होतो. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
१. एखाद्याच्या पायाचा अस्थिभंग झाला असेल आणि ते विसरून तो चालायला लागला, तर त्याला पुष्कळ वेदना होतात. प्रत्यक्षात वेदना त्याला अस्थिभंगाची जाणीव करून देतात. त्यामुळे तो चालायचा थांबतो.
२. एखाद्याला जठरव्रण (अल्सर) झाला असेल आणि ‘त्याने खायचा नाही’, असा आंबट पदार्थ तो खायला लागला, तर त्याच्या पोटात पुष्कळ दुखते. तेव्हाही वेदना त्याला जठरव्रणाची (अल्सरची) जाणीव करून देतात. त्यामुळे तो आंबट पदार्थ खायचे थांबवतो.
अशा उदाहणांवरून लक्षात येते की, वेदनेमुळे त्रास होण्याप्रमाणे वेदना होऊ नये; म्हणून करावयाची कृती, घ्यायची औषधे इत्यादींची आठवण होते, म्हणजेच आपल्याला एक प्रकारे लाभच होतो. यावरून ‘देवाने घडवलेली प्रत्येक गोष्ट किती लाभदायक आहे’, हे लक्षात येते.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले