मुंबईत भर रहदारीत वाहन अडवून चारचाकीतील भ्रमणसंगणक चोरला !
गाडीतून किमती वस्तू चोरणारी टोळी कार्यरत !
अशा टोळ्यांना पकडून कठोर शासन केल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत ! – संपादक
ठाणे – ठाणे जिल्ह्यातील काशिमीरा येथे भर रहदारीत चारचाकी अडवून रिक्शाला धडक दिल्याचा खोटा बनाव करून एका टोळक्याने आतील भ्रमणसंगणक (‘लॅपटॉप’) पळवला. राजेंद्र डिचोलकर असे पीडित व्यक्तीचे नाव असून २ ऑगस्टला कामावरून चारचाकीने घरी परतत असतांना सायंकाळी ७.३० वाजता ही घटना घडली. डिचोलकर यांनी या घटनेविषयीची माहिती देणारा व्हिडिओ सामाजिक माध्यमांद्वारे प्रसारित केला आहे. डिचोलकर यांनी याविषयी काशिमीरा पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार प्रविष्ट केली असून पोलिसांकडून अन्वेषण चालू आहे.
राजेंद्र डिचोलकर हे घोडबंदर रोड या मार्गाने चारचाकीने घरी परतत असतांना काशिमीरा येथे वाहनांची कोंडी झाल्याने त्यांना तेथे गाडी थांबवावी लागली. तेवढ्यात दुचाकीवरून २ युवक तेथे आले. त्यांनी डिचोलकर यांच्या गाडीच्या दोन्ही बाजूंनी काचेवर जोरात ठोसे मारायला प्रारंभ करत शिवीगाळ केली. यामुळे डिचोलकर यांनी गाडीची काच खाली घेतली. त्या वेळी युवकांनी त्यांच्या रिक्शाला धडक दिल्याचा बनाव करून डिचोलकर यांना ठार मारण्याची धमकी दिली. डिचोलकर यांना गाडीच्या बाहेर काढून मारहाण केली. यामध्ये डिचोलकर यांचा चष्मा तुटला. या वेळी दोघांनी त्यांना भांडणात गुंतवून ठेवून अन्य दोघांनी त्यांच्या गाडीतील भ्रमणसंगणक आणि जेवणाचा डबा लंपास केला. या वेळी आजूबाजूच्या काही व्यक्तींचे साहाय्य घेऊन डिचोलकर वाहतूक पोलिसांकडे गेले. त्यानंतर ते पुन्हा गाडीच्या ठिकाणी आले, तेव्हा त्यांच्या गाडीतील भ्रमणसंगणक आणि जेवणाचा डबा चोरीला गेला असल्याचे त्यांच्या लक्षात आले. डिचोलकर यांनी हा प्रकार त्यांच्या पोलीस मित्राला सांगितला असता अशा प्रकारच्या चोर्या करणार्या टोळ्या कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.