खारघर येथून आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्कराला अटक !
तस्कराने केलेल्या आक्रमणात २ अधिकारी घायाळ
दळणवळण बंदीच्या काळातही अमली पदार्थ तस्करीचे जाळे कार्यरत असणे हे प्रशासनाचे अपयशच म्हणावे लागेल ! अमली पदार्थ विरोधी पथकाने तस्करीच्या मुळापर्यंत जाऊन संबंधितांवर कठोर कारवाई करायला हवी ! – संपादक
नवी मुंबई – आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्कर स्टीफन सॅम्युअल टोनी याला अमली पदार्थ विरोधी पथकाने खारघर येथून अटक केली आहे. त्याच्याकडून १०२ ग्रॅम कोकेन कह्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई करत असतांना टोनी याने अधिकार्यांवर आक्रमण केल्याने त्यात दोन अधिकारी घायाळ झाले. त्यांच्यावर नवी मुंबईतील शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहेत. शासकीय कामामध्ये अडथळा आणल्याप्रकरणी टोनीविरुद्ध आणखी एक गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
टोनी ‘पॅन इंडिया’मध्ये कोकेनचा पुरवठा करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तो कोलंबियाहून इथिओपियामार्गे मुंबईत कोकेन आणत होता. त्याच्याकडे कोकेन असल्याची माहिती मिळाल्यावर खारघर येथे एका इमारतीतील खोलीत धाड टाकून कारवाई करण्यात आली.