‘राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारा’चे नाव पालटल्यामुळे काँग्रेसकडून पुण्यात आंदोलन करून निषेध !
पुणे, ७ ऑगस्ट – ‘पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी’च्या वतीने ६ ऑगस्ट या दिवशी स्वारगेट येथील देशभक्त केशवराव जेधे चौक येथे केंद्र सरकारने ‘राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारा’चे नाव पालटून ते मेजर ध्यानचंद यांच्या नावाने केल्याने आंदोलन करून निषेध केला. ‘खेलरत्न पुरस्कारा’ला मेजर ध्यानचंद यांचे नाव दिले जावे, यासाठी देशभरातून लोकांनी विनंती केली होती’, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटमध्ये सांगितले आहे. देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार त्यांच्या नावे देणे योग्य असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
या वेळी बोलतांना ‘महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी’चे सरचिटणीस अभय छाजेड म्हणाले की, आज केंद्रातील मोदी सरकारने भारतरत्न स्व. राजीव गांधी यांच्या नावाने दिला जाणारा ‘राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारा’चे नाव पालटून त्याला हॉकीचे जादूगार ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ असे नाव दिले. काँग्रेस पक्षाला ध्यानचंद यांच्या नावाला विरोध नसून नरेंद्र मोदी हे खेळामध्ये राजकारण आणू पहात आहेत, त्याला विरोध आहे.