नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी ९ ऑगस्टला ‘मशाल मोर्चा’ !

स्पष्ट भूमिका न घेतल्यास १६ ऑगस्टपासून विमानतळाचे काम बंद पाडण्याची चेतावणी

नवी मुंबई – नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी ९ ऑगस्ट या दिवशी प्रत्येक गावात ‘मशाल मोर्चा’ काढण्यात येणार आहे, अशी माहिती माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

रामशेठ ठाकूर म्हणाले की, नवी मुंबईच्या निर्मितीसाठी लोकनेते दि.बा. पाटील यांचे कार्य समजून न घेता सरकार प्रकल्पग्रस्तांचा आवाज दाबत आहे. याच्या निषेधार्थ लोकनेते दि.बा. पाटील यांच्या जन्मगावापासून ठाणे, रायगड, नवी मुंबई, मुंबईसह विविध जिल्ह्यांतील गावागावात मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे.

१५ ऑगस्टपर्यंत राज्य सरकारने याविषयी भूमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे, अन्यथा १६ ऑगस्टपासून विमानतळाचे काम बंद पाडले जाईल, असा निर्णय नवी मुंबई विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीने घेतला आहे.