भिवंडी येथील स्वच्छता कर्मचारी आणि पत्रकार यांना ‘रेशन किट’चे वाटप !
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कोकण विभाग आणि आर्.एस्.पी. अधिकारी युनिट ठाणे यांचा उपक्रम !
ठाणे, ७ ऑगस्ट (वार्ता.) – महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कोकण विभाग आणि आर्.एस्.पी. अधिकारी युनिट ठाणे यांच्या सौजन्याने ग्रामपंचायत वळ येथील स्वच्छता कर्मचारी अन् भिवंडी शहर, तसेच ग्रामीण भागातील पत्रकार यांना ‘रेशन किट’चे ४ ऑगस्ट या दिवशी येथील कैलास नगर भागातील दैनिक ‘स्वराज्य तोरण’च्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमात वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष वसंत मुंढे, कार्याध्यक्ष संजय भोकरे, राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे, प्रसिद्धीप्रमुख नवनाथ जाधव, कोकण विभाग अध्यक्ष नितीन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाचे औचित्य साधून सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य आणि वारकरी संप्रदाय यांच्याशी नेहमीच सामाजिक बांधिलकी जपून साहाय्याचा हात देण्यासाठी सदैव पुढाकार घेऊन सहकार्य करणारे व्यक्तिमत्त्व धर्मसेवक सोन्या पाटील, भाजपचे ठाणे जिल्हा व्यापारी आघाडी अध्यक्ष यशवंत सोरे, भोकरी गावचे समाजसेव रामचंद्र देसले, भाजप ठाणे जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष तथा माजी सरपंच श्रीधर पाटील, दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कोकण विभागीय सरचिटणीस किशोर पाटील यांच्या सामाजिक कार्याची नोंद घेऊन त्यांना मान्यवरांच्या हस्ते ‘ग्लोबल पीस भारत सेवारत्न’ हा पुरस्कार आणि सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात आले. महिला पत्रकार यांचा ‘हिरकणी’ पुरस्कार देऊन, तर पत्रकार बांधवांना ‘देवदूत’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमात विशेष सत्कारमूर्ती म्हणून सह्याद्री पतसंस्थेच्या शिवाजीनगर शाखेच्या शाखाधिकारी तथा दैनिक ‘स्वराज्य तोरण’च्या कार्यकारी संपादिका सौ. संगीता किशोर पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र पाटील यांनी, तर आभार प्रदर्शन मुख्य आयोजक किशोर पाटील यांनी केले. कार्यक्रमाला मान्यवर, पत्रकार आणि मोठ्या संख्येने स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते.