कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर भाजप आजपासून आरोग्य कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देणारी मोहीम राबवणार

‘राष्ट्रीय आरोग्य कार्यकर्ता मोहिमे’च्या अंतर्गत कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य कार्यकर्त्यांना प्रशिक्षण

पणजी, ६ ऑगस्ट (वार्ता.) – गोव्यातील भाजप ‘राष्ट्रीय आरोग्य कार्यकर्ता मोहिमे’च्या अंतर्गत कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देणार्‍या मोहिमेला ७ ऑगस्टपासून प्रारंभ करणार आहे. भाजपच्या आरोग्य विभागाचे समन्वयक तथा तज्ञ आधुनिक वैद्य शेखर साळकर यांच्या अध्यक्षतेखालील ४ सदस्यीस आधुनिक वैद्यांचा एक गट सिद्ध करण्यात आला आहे. हा गट विविध विभागांमध्ये काम करणार्‍या एकूण ६० डॉक्टरांना प्रशिक्षण देणार आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. या वेळी आधुनिक वैद्य शेखर साळकर यांचीही उपस्थिती होती.

प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे पुढे म्हणाले, ‘‘२० डॉक्टरांच्या पहिल्या गटाला ७ ऑगस्ट या दिवशी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत एकदिवसीय प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षित झालेले हे २० डॉक्टर १५ ऑगस्ट या दिवशी उर्वरित ४० डॉक्टरांना प्रशिक्षण देणार आहेत. यामध्ये कोरोनासंबंधी माहिती, कोरोना प्रतिबंधक लस, योग आणि योग्य आहार यांच्या आधारे रोगप्रतिकारशक्ती कशी वाढवायची ? आदींविषयी माहिती देण्यात येणार आहे. कोरोनाची तिसरी लाट आल्यास भाजपच्या कार्यकर्त्यांना नागरिक आणि संबंधित प्रशासन यांना साहाय्य करता यावे, यासाठी विशेष प्रशिक्षण देणे हा ही मोहीम राबवण्यामागील हेतू आहे. प्रशिक्षण घेतलेले डॉक्टर पुढे ‘केंद्र’ (बूथ) स्तरावर कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देणार आहेत. हे प्रशिक्षित कार्यकर्ते पुढे गावागावांत जाऊन आवश्यक जागृती आणि साहाय्यकार्य करणार आहेत.’’

या वेळी डॉ. शेखर साळकर म्हणाले, ‘‘कोरोना महामारीच्या विरोधातील लढा भाजप खूप गंभीरतेने घेत आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती प्राथमिक स्तरावरच मिळावी आणि मृत्यूदर घटावा, हा ही मोहीम राबवण्यामागील हेतू आहे.’’