सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रंगकर्मी विविध मागण्यांसाठी ९ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार

क्रांतीदिनी आंदोलन करून तीव्र संताप व्यक्त केला जाणार आहे

सिंधुदुर्ग – कोरोना महामारीच्या काळात कार्यक्रमांवर बंदी घातल्याने सांस्कृतिक वैभव जपणार्‍या आणि विविध कलागुणांचा वारसा समर्थपणे चालवणार्‍या रंगकर्मींची उपासमार होत असून त्यांना विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. याविषयी २९ जुलै या दिवशी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन निर्णय घेण्यासाठी ८ दिवसांचा कालावधी दिला होता; मात्र या निवेदनाची प्रशासनाने नोंद घेतलेली नाही. त्यामुळे ९ ऑगस्ट या क्रांतीदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून तीव्र संताप व्यक्त केला जाणार आहे, अशी माहिती ‘रंगकर्मी आंदोलन सिंधुदुर्ग’ या संघटनेचे श्री. हार्दिक शिंगले यांनी दिली.

श्री. शिंगले म्हणाले की, शासनाने रंगकर्मींकडे पाठ फिरवल्याने आणि सर्वच कार्यक्रमांवर बंदी घातल्याने सिंधुदुर्गसह राज्यातील रंगकर्मी अस्वस्थ झाले आहेत. यामध्ये चित्रपट, मालिका, नाटक, तमाशा, भजन, कीर्तन, भारूड, गोंधळ, पोवाडा, लावणी, दशावतारी, डोंबारी, वाद्य कलाकार आदी विविध कला आणि लोककला सादर करणार्‍या कलाकारांचा समावेश आहे. त्यामुळे कोरोनाची परिस्थिती पूर्ववत् होईपर्यंत रंगकर्मींना प्रतिमास ५ सहस्र रुपये उदरनिर्वाह भत्ता मिळावा, सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय कला अकादमी निर्माण करावी, महाराष्ट्रात विखुरलेल्या रंगकर्मींची शासनाकडे नोंद करावी, ‘माथाडी कामगार महामंडळा’प्रमाणे रंगकर्मींसाठी महामंडळाची स्थापना करावी आदी मागण्या आंदोलनाच्या वेळी करण्यात येणार आहेत.