पूरग्रस्त नागरिकांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सरसकट सर्वांना हानीभरपाई देण्यात यावी ! – सर्वपक्षीय कृती समितीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
सांगली, ६ ऑगस्ट (वार्ता.) – वर्ष २०२१ मध्ये सांगली जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी महापुराचे पाणी आले आहे, अशा सर्व पूरग्रस्त नागरिकांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सरसकट सर्वांना हानीभरपाई देण्यात यावी. व्यापारी वर्गाचे पंचनामे करतांना आधुनिक वैद्य, मंगल कार्यालय, अभियंता, अधिवक्ता, फेरीवाले, भाजीपाला विक्री करणारे यांना या पंचनाम्यातून वगळण्यात आले आहे, तरी त्यांचाही समावेश हानीभरपाईमध्ये करण्यात यावा, या तसेच अन्य मागण्यांचे निवेदन सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने ६ ऑगस्ट या दिवशी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना देण्यात आले.
या वेळी माजी आमदार नितीन शिंदे, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमर पडळकर, भाजपचे संघटन सरचिटणीस दीपक माने, सतीश साखळकर यांसह अन्य उपस्थित होते.