पूरग्रस्तांच्या साहाय्यासाठी प्रशासन ‘ऑनलाईन पोर्टल’ बनवणार ! – जिल्हाधिकारी, सांगली
सांगली, ६ ऑगस्ट – सांगलीतील पूरग्रस्त नागरिक, व्यापारी आणि कारागीर यांना साहाय्य करतांना पंचनाम्यात कोणतीही अडवणूक होणार नाही. लोकांना १०० टक्के साहाय्य पोचण्यासाठी प्रशासन ‘ऑनलाईन पोर्टल’द्वारे प्रयत्न करेल. यंदा पंचनामे करतांना गेल्या वेळी झालेल्या त्रुटी दूर केल्या जातील, असे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले. पूरग्रस्तांच्या मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले. त्या वेळी त्यांनी हे आश्वासन दिले.
जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सांगली महानगरपालिका क्षेत्रामध्ये पूरग्रस्तांचे पंचनामे चालू आहेत. यात एकाच मालमत्तेमध्ये अनेक व्यवसायधारक असतील, तर त्यांपैकी एकाच आस्थापनेचा पंचनामा होऊन त्यास हानी भरपाईस पात्र ठरवले जात आहे. ही गोष्ट अन्यायकारक असून प्रत्येक पूरग्रस्त व्यावसायिकाचा स्वतंत्र पंचनामा व्हावा. या वेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख शंभोराज काटकर, शहरप्रमुख मयूर घोडके आणि महेंद्र चंडाळे, प्रताप पवार, नितीन काळे, भालचंद्र मोकाशी, तसेच अन्य उपस्थित होते.