समर्पण भाव आणि उत्तम व्यवस्थापन यांमुळे ‘शेगाव संस्थान’चा नावलौकिक विश्वभर करणारे निष्काम कर्मयोगी कै. शिवशंकर पाटील !
शेगाव येथील ‘श्री गजानन महाराज संस्थान’चे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकर पाटील यांचे ४ ऑगस्ट या दिवशी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या जाण्याने शेगावसह महाराष्ट्रातील श्री गजानन महाराज यांचे भक्त, संत, मान्यवर इत्यादींमध्ये शोककळा पसरली. ते ३१ ऑगस्ट १९६२ पासून ते आजपर्यंत संस्थानचे विश्वस्त आणि अध्यक्षपद म्हणून कार्यरत होते. कै. शिवशंकर पाटील यांना प्रसिद्धी, पैसा, सत्ता यांचा हव्यास किंवा अहंभावाचा लवलेशही नव्हता. श्रद्धा, विश्वास आणि भक्ती या त्रिसूत्रीनुसार निरपेक्षपणे अन् सेवाभावी वृत्तीने त्यांनी संत गजानन महाराज यांच्या कार्याला वाहून घेतले होते. आता त्यांच्या कार्याची व्याप्ती आणि आवाका पाहिल्यानंतर संत गजानन महाराज यांचे स्वत:ला केवळ ‘सेवक’ म्हणवून घेऊन समाजकार्य केलेल्या शिवशंकर पाटील यांच्या चरणी नतमस्तक व्हायला होते.
कर्मयोग्याप्रमाणे जीवन व्यतीत केलेल्या शिवशंकर पाटील यांची गुणवैशिष्ट्ये किंवा त्यांच्या कार्याचा विस्तार शब्दांत वर्णन करणे कठीण ! साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी, तसेच शिक्षण नसतांना श्रद्धा अन् सेवाभाव यांच्या जोरावर प्रगती केलेले, ‘शेगावीचा राणा’ म्हणून गौरवलेले शिवशंकर पाटील थोर, सर्वांसाठी आदर्श आणि कौतुकास पात्र आहेत. ‘कलियुगामध्ये असे कर्मयोगी होणे नाही !’, असेच म्हणावे लागेल. शिवशंकर पाटील यांनी वाढवलेल्या कार्याच्या विस्ताराची आणि त्यांच्या गुणवैशिष्ट्यांची थोडक्यात ओळख करून घेऊया.
बालपण
शिवशंकर यांचे वडील श्री गजानन महाराजांच्या मंदिरातील सेवेकरी होते. वडिलांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून शिवशंकर वयाच्या ९ व्या वर्षीच संस्थानच्या सेवेत रुजू झाले. संस्थानमध्ये फरशी बसवण्याचे काम चालू होते, त्या वेळी त्या कामात शिवशंकर गढून गेले. तो त्यांच्या प्रदीर्घ सेवायज्ञाचा प्रारंभ होता. वयाच्या ९ व्या वर्षापासून ते आजपर्यंत म्हणजे ७० वर्षांहून अधिक काळ निरपेक्षपणे आणि निःस्वार्थीपणे कार्यरत आहेत.
शेगाव संस्थानच्या कार्याचा विस्तार
१. श्री गजानन मंदिर, भक्तनिवास, ‘आनंदसागर’ या प्रेक्षणीय स्थळाचा प्रकल्प हे सर्व ६५० एकर जागेत वसलेले आहे.
२. येथे सुमारे २० सहस्र सेवेकरी एका वेळेस विनामोबदला सेवा करतात. शिवशंकर पाटील स्वतःतील सेवाभाव इतक्या प्रभावीपणे सेवाव्रतींना प्रदान करतात की, सेवेकरी कोणतीही सेवा सहजपणे विनातक्रार आणि अत्यंत चांगल्या प्रकारे करतो.
३. येथे २१ व्या शतकाप्रमाणे प्रत्येक गोष्टीचे आधुनिकीकरण केले आहे. सामान नेण्याच्या ‘ट्रॉली’, आग, नैसर्गिक आपत्ती यांवेळी आपत्कालीन दिशादर्शक रस्त्यांची बांधणी, दर्शनाच्या रांगेत उभे असतांना पायाला चटका लागू नये म्हणून दिलेला विशिष्ट रंगाचा लेप, रांगेत प्रत्येक ठिकाणी बसण्याची केलेली व्यवस्था, तसेच ‘मातृरूम’पासून (मातेने बाळाला दूध पाजण्यासाठी केलेली खोलीची व्यवस्था) २४ घंटे उपलब्ध असणारे वैद्यकीय साहाय्य !
४. संस्थानचे आर्थिक आणि इतर व्यवहार, ‘एस्.ए.पी.’ (सॅप) प्रणालीशी वर्ष २००६ पासून जोडलेले आहेत. (‘एस्.ए.पी.’ ही एखादे आस्थापन, उद्योग व्यवस्थापन, लेखाजोखा आणि अन्य दैनंदिन व्यवहार एकत्रितरित्या कुशलतेने, कार्यक्षमतेने आणि अल्प मनुष्यबळात सांभाळण्यासाठी बनवलेली अद्ययावत जर्मन संगणकीय प्रणाली आहे. ही प्रणाली अतिशय मोठ्या आस्थापनांत वापरली जाते.) ‘श्री संत गजानन महाराज संस्थान’ ही अशी संगणकीय प्रणाली वापरणारी जगातील पहिली स्वयंसेवी संघटना आहे. संस्थानचे व्यवहार चोख आणि पारदर्शक असावेत म्हणून शिवशंकर पाटील यांनी ही प्रणाली बसवून घेतली आहे. येथीलच अभियंता महाविद्यालय हे बारा मास संगणकीय प्रणालीची निगा राखते.
५. संस्थानच्या वतीने ४२ हून अधिक उपक्रम राबवले गेले आहेत. आजूबाजूच्या १ सहस्रहून अधिक गावांमध्ये वैद्यकीय सेवा पुरवली जाते.
६. उत्तम उद्योजक निर्माण करण्यासाठी भव्य ‘इनक्युबेशन सेंटर’ उभारले आहे. येथे नवीन उद्योजकास जागेपासून संशोधनाच्या सर्व सोयी दिल्या जातात. संबंधित सर्व व्यय संस्थाच करते. संशोधन पूर्ण झाल्यावर उद्योजकास ‘मार्केटिंग’साठी साहाय्यही केले जाते. तो लवकरात लवकर आत्मनिर्भर होईल, असे पाहिले जाते.
७. संस्थानचे अनेक भक्तनिवास आहेत. येथे शेकडो खोल्या अगदी वातानुकूलित सुविधांसह आहेत. सवलतीच्या किंमतीत तेथे रहाण्याची सुविधा मिळते. शेगाव नगर परिषदेला संस्थानने ७ कोटी ७७ लाख रुपये दिल्यामुळे आज शेगावची नळयोजना चालू झाली आहे. ते कामही शिवशंकरभाऊ यांच्या निर्णयामुळे झाले आहे.
८. ‘श्री गजानन शिक्षण संस्था’ स्थापन करून अभियंता महाविद्यालयाची स्थापना केली आहे.
शिवशंकर पाटील यांची गुणवैशिष्ट्ये !
‘श्री गजानन महाराज संस्थान’ची स्थापना वर्ष १९०८ मध्ये झाली आहे. ‘यात्रा थांबू देऊ नका, पैसा साचू देऊ नका, निस्सीम भावाने सेवा करा’, या तत्त्वावर ‘ट्रस्ट’चा कारभार चालू करण्यात आला. या संस्थानची सूत्रे नंतर शिवशंकर पाटील यांच्या हातात आली. शिवशंकर पाटील यांच्याकडे ना शैक्षणिक पात्रता होती, ना कौटुंबिक वारसा होता. असे असूनही त्यांनी येथील व्यवस्थेत कायापालट केला. ‘एवढे प्रचंड मोठे कार्य हे केवळ सेवाभाव आणि समर्पणाची वृत्ती यांमुळेच साध्य झाले’, असे म्हणावे लागेल. शिवशंकर पाटील यांनी अशक्य वाटणारे कार्य शक्य करून दाखवले. ते पारदर्शी आर्थिक व्यवहार जगणारे विनम्र विश्वस्त होते. हे कार्य करत असतांना त्यांची जाणवलेली ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.
१. संस्थानची वार्षिक उलाढाल शेकडो कोटी रुपयांनी वाढणे : शिवशंकर पाटील यांनी संस्थानच्या कामाची सूत्रे हाती घेतली, त्या वेळी संस्थानची वार्षिक उलाढाल अवघी ४५ लाख रुपयांची होती. आज ही वार्षिक उलाढाल २०० कोटी रुपयांहून अधिक आहे.
२. जागतिक बँकेकडून विकासकामांसाठी घेतलेले अधिकचे पैसे परत करणे : शिवशंकर पाटील यांचे कार्य पाहून जागतिक बँकेने श्री गजानन महाराज संस्थानच्या विकासकामांसाठी ७०० कोटी रुपयांचे कर्ज दिले. विश्वस्त मंडळाने विकास आराखडा सिद्ध केल्यानंतर संस्थानच्या विकासकामांसाठी केवळ ७० कोटी रुपयांची आवश्यकता आहे, असे लक्षात आले. त्यानंतर शिवशंकर पाटील यांनी ७० कोटी रुपये घेतले आणि उर्वरित ६३० कोटी रुपये परत केले.
३. स्वत:च्या घरातून पाणी आणि चहा घेऊन येणे : विश्वस्त झाल्यापासून शिवशंकर पाटील यांनी आजतागायत संस्थानचा चहा किंवा पाणीही घेतलेले नाही. मंदिर परिसरात येतांना ते स्वतःच्या घरातून पाणी आणि चहा घेऊन येतात.
४. वृद्धापकाळातही १२ घंटे कार्य करणे : वयाच्या ८२ व्या वर्षीही १२ घंटे कार्य करणारे शिवशंकर पाटील हे तरुणांनाही लाजवेल असे व्यक्तीमत्त्व होते.
हॉवर्ड विद्यापिठाकडून संस्थानच्या व्यवस्थापनाची नोंद
शिवशंकर पाटील यांच्या कार्याची नोंद अमेरिकेतील हॉवर्ड विद्यापिठाने घेतली आहे. व्यवस्थापनाचा एक आगळावेगळा नमुना म्हणून ‘व्यवस्थापन’ हा विषय शिकवणार्या हॉवर्ड विद्यापिठात शेगावच्या श्री गजानन महाराज संस्थानच्या व्यवस्थापनाचा अभ्यास केला जातो. याचे श्रेय केवळ शिवशंकरभाऊ पाटील यांना जाते.
संस्थानकडून करण्यात आलेले आपत्कालीन साहाय्य
१. वर्ष २०२० मध्ये सांगली आणि कोल्हापूर येथे महापुरामुळे प्रचंड हानी झाली होती. त्या वेळी शिवशंकर पाटील यांनी १ कोटी रुपयांचा धनादेश दिला होता.
२. कोरोना महामारीच्या कालावधीमध्ये त्यांनी अल्पावधीतच शेकडो खाटांचे ‘कोविड सेंटर’ चालू करून रुग्णांना सेवा प्रदान केली.
संस्थानमधील व्यवस्थेची वैशिष्ट्ये
१. संस्थानच्या अखत्यारीत येणार्या प्रत्येक ठिकाणची स्वच्छता कमालीची आहे. संपूर्ण परिसरामध्ये कागदाचा एकही कपटा आणि झाडावरून गळलेले पानही मिळणार नाही.
२. मंदिराच्या लेखा विभागात साधा पांढरा शर्ट, लेंगा आणि टोपी घातलेले अनेक कर्मचारी ‘एस्.ए.पी.’ या संगणकीय प्रणालीवर काम करतांना दिसतात.
३. संस्थानचा पैसा म्हणजे ‘भक्तांचा पैसा’ ही धारणा असल्याने प्रत्येक गोष्टीमध्ये आत्मनिर्भर रहाण्याचा प्रयत्न आहे.
४. येथील सुविधा इतक्या परिपूर्ण आहेत की, कोठेही तक्रार करण्यास वाव नाही. येणार्या भक्तास समाधान मिळते. भक्तांची फसवणूक कोठेही होणार नाही, याची काळजी घेतली जाते.
शेगाव हे खर्या अर्थाने तीर्थक्षेत्र आहे.
‘द्रौपदीची थाळी’ असलेल्या अत्याधुनिक स्वयंपाकगृहाचा आवाका !
१. शेगाव संस्थानमध्ये अत्याधुनिक स्वयंपाकगृह आहे. प्रतिघंटा ४० सहस्र पोळ्या बनवणारे यंत्र आहे. हे यंत्र बंद पडल्यास प्रतिघंटा १० सहस्र पोळ्या बनवणारी २ यंत्रे पर्यायी व्यवस्था म्हणून येथे उपलब्ध आहेत. एका बाजूने कणीक घातली की, दुसर्या बाजूने भाजलेली पोळी बाहेर पडते.
२. एका वेळी १०० किलो भात, ७५ किलो भाजी, ५० किलो डाळ, १०० ‘प्लेट’ शिरा, पोहे, उपमा इत्यादी सर्व करणारी ‘स्टेनलेस स्टील’मध्ये बनवलेली अवाढव्य यंत्रे आहेत.
३. शुद्ध पाणी मिळण्यासाठी प्रचंड मोठे ‘आर. ओ. प्लान्ट’ (पाणी शुद्ध करण्यासाठीचे एक तंत्रज्ञान) उभारले आहेत.
४. उत्तम नियोजन : येथे बनवलेले पदार्थ संस्थान गावातील वेगवेगळी भोजनगृहे, भक्तनिवास, ‘कँटिन’ इत्यादींमध्ये तत्परतेने पोचवतात. येथे येणार्या भक्तांचा अंदाज घेऊन, वेगवेगळ्या ठिकाणांवरून मागणी स्वयंपाकगृहात कळवली जाते आणि त्याप्रमाणे अन्न बनवले जाते. या कामाची व्याप्ती शब्दांत वर्णन करण्यासारखी नाही. ‘द्रौपदीची थाळी’ अव्याहत अन्नदान करत असते’, असेच म्हणावे लागेल. येथील व्यवस्थापन भल्याभल्यांना (म्हणजे व्यवस्थापनातील तज्ञांना) अचंबित करणारे आहे. कोठेही गोंधळ नाही, अन्नाची नासाडी नाही किंवा कुणीही उपाशी रहात नाही.
शिवशंकर पाटील यांच्याविषयी मान्यवरांनी व्यक्त केलेले विचार
१. उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र – श्रद्धा आणि कर्मयोग यांचे मूर्तीमंत रूप काळाने हिरावून नेले आहे. श्री संत गजानन महाराज यांच्या ज्ञान, भक्ती आणि कर्म यांच्या त्रिवेणी शिकवणीवर श्रद्धा ठेवून शिवशंकरभाऊ जगले. कर्मयोगातून शिक्षण आणि आरोग्य क्षेत्र यांतही संस्थांची बांधणी केली. त्याद्वारे गरीब आणि वंचित यांची सेवाही केली. त्यांच्या निःस्वार्थतेचे दाखले हे दंतकथा वाटतील; पण त्या सत्य आहेत. श्री गजानन महाराज संस्थानाच्या कारभाराचे नियोजन आणि व्यवस्थापन हा जगभरातील तज्ञांसाठी अभ्यासाचा विषय राहिला आहे. त्यांच्या निधनाने सेवा कार्यासाठी आयुष्य वेचलेला कर्मयोगी काळाने हिरावून नेले आहे.
२. देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा – शिवशंकरभाऊ पाटील यांच्या निधनाने एक व्रतस्थ सेवेकरी, व्यवस्थापन गुरु आणि निष्काम कर्मयोगी गमावला आहे. ते समर्पण भावाचे मूर्तीमंत उदाहरण होते. शेगाव येथे गेल्यानंतर त्यांची भेट व्हायची. दर वेळी ते आपुलकीने विचारपूस करायचे, शेगाव संस्थानचे प्रश्न सोडवून घ्यायचे. त्यांच्या कार्याला हातभार लावण्याची संधी मला मिळणे, हे माझे भाग्य होते. त्यांच्या निधनाने मी व्यक्तिगत मार्गदर्शकाला मुकलो आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
३. सौ. सुप्रिया सुळे, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस – पक्षाच्या वतीने कोणताही उपक्रम राबवायचा असेल, तर मी शिवशंकरभाऊ यांच्याकडून मार्गदर्शन घेत होते. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा मला पुष्कळ लाभ झाला. ते माझे मार्गदर्शकच होते. व्यवस्थापन शास्त्र केवळ कागदावर नाही, तर प्रत्यक्षात अमलात कसे आणावे, याचे मूर्तीमंत उदाहरण !
४. श्री. अभय बापट, महाराष्ट्र प्रांत प्रमुख, विवेकानंद केंद्र – विश्वस्त या संकल्पनेला सर्वार्थाने जागणारा आणि संस्थानसाठी कोट्यवधी रुपयांच्या देणग्या मिळत असतांनाही संस्थानच्या कामाला आवश्यक तेवढीच रक्कम स्वीकारणारा, संस्थानच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारांचा ताळेबंद पूर्ण झाल्यानंतरच घरी परत जाणारा शिवशंकरभाऊ यांच्यासारखा दुसरा विश्वस्त होणे नाही !
(साभार : संकेतस्थळ)