उत्साही, आनंदी, इतरांना साहाय्य करणारे आणि परात्पर गुरु डॉक्टरांप्रती उत्कट भाव असणारे ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे  कै. विलास भिडेकाका !

कै. प्रा. विलास भिडे

कोथरूड, पुणे येथील ६४ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले साधक विलास भिडेकाका (वय ७४ वर्षे) यांचे २६.५.२०२१ या दिवशी निधन झाले. त्यांच्याविषयी कोथरूड, पुणे येथील साधकांना जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

श्री. प्रवीण नाईक

१. अनेक अडचणींच्या प्रसंगांत काकांचे मार्गदर्शन मिळणे

परात्पर गुरुमाऊलींच्या कृपेने मला अनेक वेळा भिडेकाका आणि काकू यांचा सत्संग मिळाला. अडचणींच्या अनेक प्रसंगांमध्ये मला त्यांचा सहवास आणि मार्गदर्शनही लाभले.

२. प्रेमभावाने साधनेतील सहजीवन जगणे

‘साधनेतील सहजीवन कसे असावे ?’, याचे आदर्श उदाहरण म्हणजे भिडेकाका आणि काकू ! काकूंची प्रकृती थोडी नाजूक असल्याने भिडेकाका त्यांची पुष्कळ काळजी घेत. काकूंच्या प्रकृतीची काळजी घेणे, त्यांना प्रत्यक्ष सेवेत सहकार्य करणे आणि घरी आलेल्या प्रत्येक साधकाचे हसतमुखाने अन् आनंदाने स्वागत करणे’, असे अनेक प्रेमभावाचे पैलू काकांच्या दैनंदिन जीवनात नेमाने दिसत.

३. अभ्यासूपणा आणि कृतीशीलता

काकांचा अभ्यासूपणा आणि कृतीशीलता हीसुद्धा वाखाणण्यासारखी होती. उतारवयातही काका प्राध्यापक (गेस्ट लेक्चरर) म्हणून महाविद्यालयात जात असत. एवढेच नव्हे, तर त्यांच्या महाविद्यालयाच्या नवीन शाखेत त्यांच्या विषयाचा नवीन विभाग चालू करण्यासाठी काकांना विचारणा व्हायची आणि हे नवीन दायित्वही काका लीलया पार पाडायचे.

४. परात्पर गुरुदेवांप्रती उत्कट भाव असणे

माझे साधनेचे प्रयत्न चांगले होत नव्हते. त्यामुळे मी एकदा काकांकडे गेलो होतो. तेव्हा काकांनी ‘साधनेला आरंभ केल्यानंतर त्यांनी कसे प्रयत्न केले’, याविषयी सांगितले. ‘ते दुचाकी गाडीने सहसाधकांसमवेत प्रसाराला बाहेरगावी जात असतांना एका मोठ्या अपघातातून परात्पर गुरुदेवांच्या कृपेने कसे वाचले’, याविषयी सांगू लागले. त्या वेळी काका-काकूंचा भाव जागृत झाला होता. तेव्हा काकांचा परात्पर गुरुदेवांप्रती असलेला उत्कट भाव मला जाणवला.

५. गुरुपौर्णिमेच्या अनेक सेवांचे हक्काचे ठिकाण म्हणजे भिडेकाका-काकूंचे घर !

गुरुपौर्णिमेच्या अनेक सेवांचे हक्काचे ठिकाण म्हणजे काका-काकूंचे घर ! त्यांचे घर म्हणजे साहित्य एकत्र करण्याचे, आरती म्हणणार्‍या साधिकांनी सराव करण्याचे, तसेच प्रसारातील साधकांचे जेवण आणि विश्रांती घेण्याचे स्थान झाले होते. अशा अनेक सेवांमुळे काकांकडे पुष्कळ साधकांची ये-जा असायची. काका-काकू दोघेही साधकांना सर्व प्रकारे साहाय्य करायचे.

६. एका मोठ्या वर्तमानपत्राच्या संपादकांना काकांनी तत्त्वनिष्ठ राहून सडेतोड उत्तरे देणे आणि शेवटी संपादकांनी उठून काकांना आदराने नमस्कार करणे

समाजातील अनेक जिज्ञासूंना काकांनी चांगले जोडून ठेवले आहे. जोडून ठेवतांना परात्पर गुरुदेवांनी सांगितलेल्या तत्त्वांना त्यांनी कधीच तिलांजली दिली नाही. एकदा एका मोठ्या वर्तमानपत्राच्या संपादकांना भेटायला जातांना काका माझ्यासमवेत होते. चर्चेत अनेक विषय निघाले. संपादकांच्या सर्व प्रश्नांना काकांनी तत्त्वनिष्ठ राहून सडेतोड उत्तरे दिली. शेवटी जातांना त्या संपादकांनी काकांना उठून नमस्कार केला. ‘तो नमस्कार काकांच्या तत्त्वनिष्ठतेला आणि परात्पर गुरुदेवांनी साधकांवर केलेल्या संस्कारांना आहे’, असे मला जाणवले. (३.६.२०२१)

सौ. राजश्री खोल्लम

१. पहिल्याच भेटीत आपुलकी जाणवणे

काही वर्षांपूर्वी एका साधिकेसह मी भिडे काका-काकूंना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते. तेव्हा त्या दोघांशी बोलतांना ‘आम्ही प्रथमच भेटत आहोत’, असे मला वाटलेच नाही. ‘त्या दोघांचे साधनेचे प्रयत्न चांगले चालू असून दोघांचीही प्रगती होत आहे’, हे परात्पर गुरुदेवांच्या कृपेने माझ्या लक्षात आले.

२. ‘परात्पर गुरुदेव साक्षात् ईश्वर आहेत’, या श्रद्धेने त्यांचे आज्ञापालन करणे

काकांनी अत्यंत कृतज्ञताभावाने परात्पर गुरुदेवांच्या झालेल्या प्रथम भेटीविषयी सांगितले. ओळख नसतांना आणि काही माहिती नसतांनाही परात्पर गुरुदेवांनी अंतर्ज्ञानाने भिडेकाकूंच्या हृदयविकाराच्या आजारपणाविषयी सांगितले होते. गुरुदेव म्हणाले, ‘‘काही काळजी करू नका. उच्च रक्तदाबासाठी असलेली गोळी तेवढी बंद करू नका. बाकी सगळे उपाय आणि नामजप करत रहा.’’ ‘परात्पर गुरुदेव साक्षात् ईश्वर आहेत’, या भावाने काका-काकूंनी श्रद्घेने त्यांनी सांगितल्याप्रमाणे आज्ञापालन केले. परात्पर गुरुदेवांनी तेव्हा सांगितल्याप्रमाणे भिडेकाकूंच्या हृदयाचे शस्त्रकर्म करण्याची वेळ आजपर्यंत आली नाही. ही केवढी गुरुकृपा !’ (३.६.२०२१)

सौ. रश्मी नाईक

१. सेवेतील नवीन संगणकीय प्रणाली शिकून घेणे

सेवांमुळे माझा काकांशी संपर्क व्हायचा. या वयातही काकांनी सेवेची नवीन संगणकीय प्रणाली शिकण्याची इच्छा दर्शवली. सर्व नवीन गोष्टी शिकून घेऊन ते सेवा करायचे. त्यांची सेवा परिपूर्ण आणि बिनचूक असायची.

२. चुकांविषयी तीव्र खंत वाटणे

एकदा गुरुपौर्णिमेच्या सेवेत काकांकडून एक चूक झाली होती. काकांना त्या चुकीची पुष्कळ खंत वाटली. त्यांनी ती चूक १०० टक्के स्वीकारली आणि प्रायश्चित घेण्याची सिद्धता दर्शवली. त्यांच्या प्रत्येक कृतीतून ‘ते आध्यात्मिक स्तरावर विचार करतात’, असे मला जाणवायचे.

३. पत्नीविषयी आदरयुक्त प्रेमभाव असणे

काकांच्या मनात त्यांच्या पत्नीविषयी आदरयुक्त प्रेमभाव होता. ते त्यांची काळजी घ्यायचे आणि सेवेत त्यांना सर्वतोपरी साहाय्य करायचे.

४. जनसंपर्क चांगला असल्याने काकांनी अनेक जणांना साधनेविषयी सांगणे

काकांचा जनसंपर्क चांगला होता. त्यांनी अनेक जणांना जोडून ठेवले होते. त्यांच्या प्रभागातील नगरसेवकही त्यांना वैयक्तिकरित्या ओळखायचे. ते वेळोवेळी सर्वांना साधनेचे महत्त्व सांगायचे आणि ‘ते सर्वजण उपक्रमांत कसे सहभागी होऊ शकतात’, याचा अभ्यास करून त्यांना सहभागी करून घ्यायचे.

अ. काकांमध्ये ‘स्पष्टवक्तेपणा’ हा गुण होता. असे असले, तरी त्यांनी कधी कुणाला दुखावले नाही.

५. ‘परात्पर गुरुदेवांचे वाक्य म्हणजे ब्रह्मवाक्यच आहे’, असा भाव असणे

परात्पर गुरु डॉक्टरांविषयी काकांच्या मनात दृढ श्रद्धा होती. त्यामुळे त्यांना कशाची काळजी नसायची. काकूंना हृदयविकाराचा त्रास आहे. आधुनिक वैद्यांनी त्यांचे ‘शस्त्रकर्म करावे लागेल’, असे सांगितले होते; परंतु ‘काकूंची साधना वाढेल, तसे आपोआप सर्व नीट होईल’, या गुरुदेवांनी सांगितलेल्या वाक्यावर काकांची नितांत श्रद्धा होती. ‘परात्पर गुरुदेवांनी सांगितले, म्हणजे ते ब्रह्मवाक्यच आहे’, असा त्यांचा भाव होता. (३.६.२०२१)

सौ. प्रीती कुलकर्णी

१. नियोजनबद्धता आणि शिस्त

भिडेकाकांची प्रत्येक कृती नियोजनबद्ध असायची. त्यांनी अनेक गोष्टींची स्वतःला शिस्त लावून घेतली होती. त्यात कधीही ते चालढकलपणा करत नसत. काकांचे रहाणे अगदी टापटीप असायचे.

२. घरातील सत्संगाची पूर्वसिद्धता करून ठेवणे

काकांकडे सत्संग असल्यास ते सत्संगाची पूर्वसिद्धता, बैठकव्यवस्था, पाणीव्यवस्था, आध्यात्मिक शुद्धीसाठी लागणारे साहित्य या सगळ्याची सिद्धता करून ठेवत. त्यामुळे तेथे गेल्यावर साधकांना वेगळी सिद्धता करावी लागत नसे.

३. भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवा करणे

काकांकडे अनेक वेळा गुरुपौर्णिमेच्या वेळी एखादी सेवा असायची. ती सेवा ते अगदी मनापासून आणि गुरुदेवांना अपेक्षित अशी करण्याचा प्रयत्न करायचे. दैनंदिन जीवनातील प्रत्येक कृती परिपूर्ण करण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न असायचा. (३.६.२०२१)

सौ. वृंदा सटाणेकर

काकांशी बोलल्यावर मन शांत होणे

काकांशी बोलल्यावर माझे मन शांत व्हायचे. माझ्या वडिलांच्या निधनानंतर मला मोठे वडीलधारे असे कुणी नव्हते. भिडेकाकांशी बोलल्यावर मला वडिलांशी बोलल्याप्रमाणे वाटायचे. ते माझी आपुलकीने आणि प्रेमाने विचारपूस करायचे. (३.६.२०२१)

‘विविध गुणांनी युक्त अशा भिडेकाकांसारख्या साधकाचा सहवास आम्हाला लाभला. त्यासाठी गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !

‘काकांमधील गुण आम्हा सर्वांमध्ये येवोत’, अशी गुरुचरणी मनापासून प्रार्थना !’ – पुणे येथील साधक (३.६.२०२१)