प्रेमळ, तळमळीने सेवा करणारे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर श्रद्धा असणारे डिचोली (गोवा) येथील कै. मंगेश मांद्रेकर !
प्रेमळ, तळमळीने सेवा करणारे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर श्रद्धा असणारे डिचोली (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. मंगेश मांद्रेकर (वय ७५ वर्षे) !
७.५.२०२१ या दिवशी माझे यजमान मंगेश मांद्रेकर (वय ७५ वर्षे) यांचे निधन झाले. ७.८.२०२१ या दिवशी त्यांच्या निधनाला ३ मास पूर्ण होत आहेत. त्या निमित्त मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये, त्यांच्यात जाणवलेले पालट, त्यांच्या आजारपणात अन् मृत्यूनंतर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. साधिकेला तिच्या यजमानांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
१ अ. प्रेमळ : माझे यजमान प्रेमळ आणि मनमिळाऊ स्वभावाचे होते. ते सगळ्यांशीच प्रेमाने वागायचे. त्यांना कोणाविषयी आकस अथवा वैर नव्हते. त्यांच्या पुष्कळ ओळखी होत्या. लहान-थोर सर्व जण त्यांच्याशी आदरपूर्वक बोलायचे. ते सर्वांचे आवडते ‘तात्या’ होते.
१ आ. आनंदी : आमचे शेजारी, नातेवाईक आणि समाजातील लोक त्यांना म्हणायचे, ‘‘तुमच्या तोंडवळ्यावर कधीच ताणतणाव किंवा दुःख नसते. कधीही पाहिले, तरी तुम्ही आनंदी असता.’’
१ इ. व्यवस्थितपणा : ते घरातल्या सर्व वस्तू जागच्या जागी आणि व्यवस्थित ठेवायचे. ‘घर म्हणजे गुरुदेवांचा आश्रम आहे’, असा त्यांचा भाव होता. त्यांचे सेवेचे साहित्य आणि वैयक्तिक धारिका (फाइल्स) व्यवस्थित ठेवलेल्या असायच्या.
१ ई. समाधानी वृत्ती : यजमानांना कधीही कोणतीही अपेक्षा नव्हती. त्यांच्याकडे जे होते, त्यात ते समाधानी आणि आनंदी असायचे.
१ उ. व्यष्टी साधनेचे गांभीर्य : व्यष्टी साधनेच्या अंतर्गत ‘प्रार्थना आणि नामजप करणे, कृतज्ञता व्यक्त करणे, भाववृद्धी सत्संग ऐकणे, स्तोत्रे म्हणणे, आत्मनिवेदन करणे, परात्पर गुरु डॉक्टरांची मानसपूजा करणे’ इत्यादी सर्व कृती ते गांभीर्याने करत असत.
१ ऊ. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संदेश घरोघरी पोचावा’, अशी तळमळ असणे : जून १९९७ पासून आम्ही सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करू लागलो. वर्ष १९९९ मध्ये दैनिक ‘सनातन प्रभात’ चालू झाल्यावर यजमानांनी दैनिकाचे अनेक वर्गणीदार बनवले. कार्यालयीन व्यक्ती, नातेवाईक आणि सभोवतालचे रहिवासी या सर्वांना भेटून यजमान त्यांना साधनेचे महत्त्व सांगायचे. नंतर यजमान त्यांच्याशी जवळीक निर्माण करायचे आणि त्यांना दैनिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार बनवायचे. त्या वेळी आम्ही उभयतां प्रत्येक रविवारी दैनिकाच्या ५० ते ६० अंकांचे वितरण करायचो, तसेच सणांच्या दिवशी ठिकठिकाणी सनातनचे ग्रंथप्रदर्शन लावायचो. ‘हे अलौकिक ज्ञान समाजात अधिकाधिक लोकांपर्यंत पोचावे. यातून गुरूंचा (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा) संदेश घरोघरी पोचावा’, असे आम्हा उभयतांना वाटायचे.
१ ए. सेवेची तळमळ : हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या कालावधीत यजमान हिंदु राष्ट्र-स्थापनेचे महत्त्व सांगून सर्वांकडून अर्पण घ्यायचे. या सभांच्या वेळी शारीरिक क्षमता नसतांनाही ते ‘नामदिंडी आणि प्रभातफेरी यांत सहभागी होणे’ इत्यादी सेवा तळमळीने अन् प्रामाणिकपणे करायचे. ते सगळ्या सेवा अभ्यासपूर्ण आणि अचूक करायचे.
१ ऐ. ते मला घरकामात पुष्कळ साहाय्य करायचे. ही कामे करतांना ‘मी आश्रमसेवा करत आहे’, असा त्यांचा भाव असायचा.
१ ओ. त्यांनी बागेत आंबा, नारळ इत्यादी फळझाडे, भाज्या, तसेच पारिजातक, नागचाफा, मोगरा, जास्वंद इत्यादी फुलझाडे लावली आहेत. त्या सर्व झाडांची ते चांगली निगा राखायचे.
१ औ. श्रद्धा : १५ वर्षांपूर्वी यजमान परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने एका गंभीर आजारातून वाचले. त्यामुळे ‘मी केवळ गुरुदेवांच्या कृपेमुळेच श्वास घेत आहे’, अशी त्यांची श्रद्धा होती. त्यांची श्री अंबादेवीवरही पुष्कळ श्रद्धा होती.
१ अं. भाव : ‘आपण काहीच करत नसून देवच सर्व करत असतो. देवच आपल्याकडून साधना करवून घेत आहे. त्याच्या कृपेनेच आपण सेवा करू शकत आहोत’, असा त्यांचा भाव होता.
१ क. ‘आपत्काळाच्या दृष्टीने आताच सगळी सिद्धता करून ठेवा’, असे ते मला म्हणायचे. आपत्काळात लागणार्या सर्व वस्तू त्यांनी गोळा करून ठेवल्या होत्या.
२. साधिकेला तिच्या यजमानांमध्ये जाणवलेले पालट
अ. त्यांनी त्यांची व्यष्टी साधना पुष्कळ वाढवली होती.
आ. ते दिवसभर प.पू. भक्तराज महाराज यांची भजने गुणगुणायचे.
इ. ते सतत भावावस्थेत असायचे.
ई. त्यांच्या तोंडवळ्यावर तेज दिसत होते.
३. साधिकेला तिच्या यजमानांच्या आजारपणात जाणवलेली सूत्रे
३ अ. साधिकेच्या यजमानांनी रुग्णाईत असतांनाही सेवेचा विचार करणे : २६.४.२०२१ या दिवशी सकाळी यजमानांना पुष्कळ अस्वस्थ वाटायला लागले; म्हणून आम्ही त्यांना रुग्णालयात नेले. रुग्णालयात उपचार चालू असतांनाही त्यांच्या मनात सेवेचे विचार होते.
३ आ. रुग्णाईत असतांना ते स्थिर होते. ते मला म्हणायचे, ‘‘परात्पर गुरु डॉक्टर माझ्या समवेत आहेत.’’ हाच भाव ठेवून ते आजारपणाला धैर्याने सामोरे गेले.
३ इ. त्यांनी आजारपणातही त्यांना सांगितलेले नामजपादी उपाय श्रद्धेने केले.
३ ई. साधिकेच्या यजमानांची प्रकृती चिंताजनक असल्याने आधुनिक वैद्यांनी साधिकेला तिच्या विदेशातील मुलाला भारतात बोलवायला सांगणे आणि विमानात बसल्यावर मुलाने ‘मी गोव्यात पोचेपर्यंत बाबांना सुखरूप ठेवा’, अशी परात्पर गुरुदेवांना प्रार्थना करणे : रुग्णालयात असतांना यजमानांना हृदयविकाराचा झटका येऊन ते बेशुद्धावस्थेत गेले. त्यांना अतीदक्षता विभागामध्ये ‘व्हेंटिलेटर’वर (कृत्रिम श्वास देण्याच्या यंत्रावर) ठेवले होते. ६.५.२०२१ या दिवशी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने आधुनिक वैद्यांनी मला विदेशात (दक्षिण कोरियात) असलेल्या माझ्या मुलाला भारतात बोलावण्यास सांगितले. विमानात बसल्यावर मुलाने परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना केली, ‘मी गोव्यात पोचेपर्यंत माझ्या बाबांना सुखरूप ठेवा.’
४. बेशुद्धावस्थेत असलेल्या साधिकेच्या यजमानांनी मुलाची हाक ऐकून प्रतिसाद देणे आणि त्यानंतर त्यांचे निधन होणे
माझा मुलगा रुग्णालयात आल्यावर आधुनिक वैद्यांनी आम्हाला सांगितले, ‘‘मांद्रेकरांना हृदयविकाराचा झटका आला आहे. तुम्ही त्यांना मोठ्याने हाक मारा.’’ मी त्यांना पुष्कळ हाका मारल्या; पण त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर माझ्या मुलाने त्यांना हाक मारली आणि तो त्यांना म्हणाला, ‘‘बाबा, डोळे उघडा. तुमचा मुलगा तुमच्या समोर उभा आहे. मला तुमच्याशी बोलायचे आहे.’’ तेव्हा जणू चमत्कारच झाला. यजमानांचा हात किंचित हलला आणि त्यांनी त्यांचा हात वर केला. त्या वेळी मी मुलाला म्हटले, ‘‘तुला बाबांचा आशीर्वाद मिळाला.’’ त्यानंतर त्यांनी शांत चित्ताने देह ठेवला.
५. साधिकेला तिच्या यजमानांच्या मृत्यूनंतर जाणवलेली सूत्रे
५ अ. साधिकेने परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीकृष्ण यांना ‘यजमानांना सद्गती द्या’, अशी प्रार्थना करणे, ‘परात्पर गुरु डॉक्टर यजमानांना आशीर्वाद देत आहेत’, असे तिला सूक्ष्मातून दिसणे अन् त्यानंतर यजमानांच्या तोंडवळ्यावर तेज आणि भाव जाणवणे : मी परात्पर गुरु डॉक्टर आणि श्रीकृष्ण यांना प्रार्थना केली, ‘हे श्रीकृष्णा, हे परात्पर गुरु डॉक्टर, मी यजमानांच्या प्रारब्धात कुठलीच ढवळाढवळ करत नाही. त्यांच्या भोवती तुमच्या नामाचे अभेद्य संरक्षककवच निर्माण करून त्यांचे रक्षण करा आणि त्यांना सद्गती द्या.’ माझे डोळे बंद होते. त्या क्षणी मला प्रकाश दिसला. मला परात्पर गुरु डॉक्टरांचा तोंडवळा स्पष्ट दिसत होता. त्या वेळी त्यांनी पांढरा सदरा परिधान केला होता. मला ‘परात्पर गुरु डॉक्टर यजमानांना आशीर्वाद देत आहेत’, असे दिसले. डोळे उघडून बघते, तर यजमानांच्या तोंडवळ्यावर पुष्कळ तेज आणि भाव जाणवला. ‘ते भावावस्थेत आणि आनंदात आहेत’, असे मला वाटले.
५ आ. त्यांची शेवटची एकच इच्छा होती, ‘मृत्यूसमयी मुलाने जवळ असावे आणि त्यांचे अंतिम संस्कारही त्याच्याच हातून व्हावेत.’ त्यांच्या इच्छेप्रमाणेच घडले. मुलाच्या हातून सगळे विधी झाले.
६. अनुभूती
चौदाव्या दिवशी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी भ्रमणभाष करून साधिकेची विचारपूस करणे आणि त्या वेळी ‘त्यांच्या माध्यमातून साक्षात् श्री महालक्ष्मीदेवी बोलत आहे’, या भावयुक्त विचाराने साधिकेला दुःखाचा विसर पडणे : देवाने मला ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ सांगून या आपत्काळात माझ्या मनाची सिद्धता करवून घेतली. यजमानांच्या मृत्यूनंतर मी स्थिर होते. यजमानांच्या निधनानंतरच्या चौदाव्या दिवशी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी मला भ्रमणभाष केला. त्यांनी आस्थेने माझ्या यजमानांविषयी विचारले. त्यामुळे मी भावविभोर झाले. ‘त्यांच्या माध्यमातून साक्षात् श्री महालक्ष्मीदेवी माझ्याशी बोलत आहे’, या भावयुक्त विचाराने मी माझे दुःखच विसरले, यासाठी त्यांच्या चरणी संपूर्ण शरणागतभावाने कोटीशः कृतज्ञता !
– श्रीमती मनीषा मंगेश मांद्रेकर (पत्नी), डिचोली, गोवा. (२१.६.२०२१)
|