विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवून सर्व दोषी अधिकार्यांवर कठोर कारवाई करा ! – महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचे शाहूवाडी तहसीलदार यांना निवेदन
कोल्हापूर, ६ ऑगस्ट (वार्ता.) – विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवून सर्व दोषी अधिकार्यांवर कठोर कारवाई करावी, गडावरील मंदिरे आणि योद्ध्यांची स्मारके यांचा जीर्णोद्धार करावा, पन्हाळा ते विशाळगड हा एकमेवाद्वितीय रणसंग्रामाचा गौरवशाली इतिहास समाजासमोर यावा, यासाठी पावनखिंड रणसंग्रामाचे बाजीप्रभू देशपांडे यांच्या समाधीस्थळ परिसरात ऐतिहासिक भव्य स्मारक येथे उभारण्यात यावे, या तसेच अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी ६ ऑगस्ट या दिवशी जिल्हाधिकारी यांच्या नावे असलेले निवेदन शाहूवाडी तहसीलदार गुरु बिराजदार यांना दिले.
जिल्हाधिकारी यांच्या नावे असलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गडावर चालू असलेले अतिक्रमण पहाता स्थानिक प्रशासन, राज्यशासन, पुरातत्व खाते आदी सर्वजण यांकडे डोळेझाक करत आहे. त्यामुळे यामागे काही काळेबरे आहे का ? यामागे काही कट शिजत आहे का ? याविषयी सामान्य शिवभक्त आणि स्थानिक जनता यांच्या मनात प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रश्नांची उत्तरे हिंदू समाजाला न मिळाल्यास त्याचे रुपांतर शासन विरोधी रोषातही होऊ शकते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचे इस्लामीकरण करण्याचा घाट तर घातला जात नाही ना ? अशी भावना हिंदू समाजाच्या मनात निर्माण होत आहे. हे आम्ही कदापि सहन करणार नाही. त्यामुळे आपण हिंदू समाजाच्या भावनांची नोंद नक्कीच घ्याल, अशी अपेक्षा आहे.
या वेळी येळाणे गावचे सरपंच श्री. मधुकर पाटील, मनसे जिल्हाउपाध्यक्ष श्री. युवराजबाबा काटकर, हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री चारुदत्त पोतदार, रमेश पडवळ, महेश विभुते, चेतन गुजर, दिनेश पडवळ, रुपेश वारंगे, अनिकेत हिरवे, प्रविण कांबळे, महेश गांगण, प्रदीप वीर, शिवजी फिरके, अप्पा कंक, रोहित मोरे, नारायण वेल्हाळ, रोहित पास्ते, राजेश वेल्हाळ, रोहित जांभळे यांसह अनेक हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनात करण्यात आलेल्या अन्य काही मागण्या
१. गडाचे पावित्र्य भंग करणार्या गोष्टींवर (उदा. मद्यपान, मांसविक्री), तसेच आरोग्यास हानी पोचवणार्या सर्वच गोष्टींना गडावर प्रतिबंध करावा.
२. गडाची ग्रामदेवता असणार्या श्री वाघजाईदेवीच्या मंदिरासह सर्व मंदिरांची दुरुस्ती आणि जीर्णोद्धार करण्यात यावा, तसेच गडाची आणि तटबंदीची डागडुजी करण्यात यावी.
३. पन्हाळा ते विशाळगड माथ्यापर्यंत गडावरील सर्व मंदिरे, ऐतिहासिक स्थळे, स्मारके यांची माहिती देणारे फलक लावावेत.