श्री. गिरीश पंडित पाटील पूर्णवेळ साधक होऊन रामनाथी येथील सनातन आश्रमात आल्यावर त्यांना आलेल्या अनुभूती

‘सप्टेंबर २०१९ मध्ये मी सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांनी घेतलेल्या मार्गदर्शन शिबिराला प्रथमच गेलो होतो. सप्टेंबरमध्ये झालेल्या शिबिरामध्ये ‘साधना का करायची ?’, याविषयी मला मार्गदर्शन मिळाले आणि मी नामजप चालू केला. नोव्हेंबर २०१९ मध्ये देवद आश्रमात युवा शिबिर होते. त्यामध्ये सद्गुरु अनुराधाताई आणि पू. जाधवकाकूंनी साधनेचे महत्त्व अन् काळानुसार साधना सांगितली. मला ते सर्व पटले आणि माझ्या मनात पूर्णवेळ साधना करण्याचा विचार आला. त्यानंतर २ आठवड्यांनी मला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेसाठी येण्याची संधी मिळाली.

श्री. गिरीश पंडित पाटील

१. रामनाथी आश्रमात आल्यावर आश्रमातील सर्व साधकांच्या समवेत माझे जन्मोजन्मीचे ऋणानुबंध आहेत आणि मी एका मोठ्या कुटुंबामध्ये आल्यासारखे मला वाटले.

२. नामजप करतांना दैवी कण सापडणे

२९.१२.२०१९ या दिवशी प्रतिदिनप्रमाणे रात्री झोपण्यापूर्वी मी नामजप करतांना मला मुंग्या दिसल्या; म्हणून मी गादी उचलून ‘मुंग्या आहेत का ?’, हे शोधत असतांना माझ्या लक्षात आले, ‘संपूर्ण गादीच्या खाली मोठ्या प्रमाणात दैवी कण आले आहेत.’ मुंग्यांच्या माध्यमातून गुरुदेवांनीच (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) गादी उचलून पहाण्यास सुचवले आणि ही अनुभूती दिली.

३. वाढदिवसाच्या दिवशी ध्यानमंदिरात संध्याकाळच्या आरतीसाठी गेल्यावर गुरुदेवांनी सूक्ष्मातून येऊन आशीर्वाद देणे

३०.९.२०१९ या दिवशी माझा वाढदिवस होता. त्या दिवशी मी सेवा करून आरतीसाठी ध्यानमंदिरात गेलो. सद्गुरूंची ‘ज्योतसे ज्योत जगावो….’ ही आरती चालू असतांना मी प्रार्थना केली, ‘गुरुदेव, मी आजपर्यंत तुम्हाला कधी बघितले नाही. तुम्हीच मला तुमच्या इतक्या जवळ घेऊन आला आहात. मला आज तुमचे दर्शन व्हावे, अशी माझी तीव्र इच्छा आहे. आता तुम्हीच ही आरती माझ्याकडून भावपूर्ण म्हणून घ्या, मला साधना करण्यासाठी आशीर्वाद द्या आणि साधनेतील सर्व बारकावे शिकवा.’ सद्गुरूंच्या आरतीचे अंतिम कडवे चालू होते. तेव्हा मी डोळे बंद करून प्रार्थना करत असतांना ‘पांढरा सदरा घालून गुरुदेव ध्यानमंदिरात आल्याचे दिसले. त्यांना बघून मला पुष्कळ शीतलता जाणवली. माझ्या डाव्या खांद्यावर हात ठेवून ते मला प्रेमाने कुरवाळत आहेत’, असे मला दिसले. त्याक्षणी प्रथम मला भावाश्रू आले आणि शरिराच्या डाव्या बाजूला १ मिनिट रोमांच येत होते. मी अशी भावजागृती कधी अनुभवली नव्हती.

गुरुदेवांनी मला साधनेत आणले. माझ्याकडून सेवा करवून घेतली आणि मला पूर्णवेळ साधक केले. आई-वडिलांच्या मनाची सिद्धताही त्यांनीच करवून घेतली. त्यांनीच मला टप्प्याटप्प्याने साधनेतील सर्वकाही शिकवले. माझा स्वभाव अबोल असून माझी व्यष्टी प्रकृती आहे, तरी गुरुदेव साधनेच्या दृष्टीने माझ्यामध्ये पालट करत आहेत. त्यांनी वैकुंठात राहून सेवा करण्याची संधी दिली. त्यासाठी मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– श्री. गिरीश पंडित पाटील, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.८.२०२०)

  • दैवी कण : सात्त्विक व्यक्ती, स्थान आदी ठिकाणी सोनेरी, रूपेरी आदी अनेक रंगांत दिसणार्‍या या कणांचे ‘भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटर’मध्ये पृथक्करण करण्यात आले. आय.आय.टी. मुंबई येथे केलेल्या चाचणीनुसार या कणांमध्ये कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन हे घटक असल्याचे सिद्ध झाले. या घटकांच्या मूलद्रव्यांच्या प्रमाणावरून शोधलेले त्यांचे ‘फॉर्म्युले’ सध्या अस्तित्वात असलेल्या कोणत्याही कणांच्या ‘फॉर्म्युल्या’शी मिळतीजुळती नाहीत. त्यामुळे हे कण नाविन्यपूर्ण आहेत, हे लक्षात येते. साधक या कणांना ‘दैवी कण’ असे संबोधतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक