पाकिस्तानमध्ये मानवी अधिकारांचे हनन आणि जागतिक मौन !
१. भारताच्या प्रवक्त्यांनी संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार आयोगामध्ये पाकिस्तानला सुनावले खडे बोल !
‘भारताच्या प्रवक्त्यांनी संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार आयोगामध्ये पाकिस्तानवर ‘हल्ला’ चढवला. पाकिस्तानकडून मानवाधिकाराचे कसे उल्लंघन करण्यात येते, याची माहिती भारताने नुकतीच संयुक्त राष्ट्रासमोर मांडली. तेथे भारताचे प्रतिनिधित्व करणारे भारतीय अधिकारी म्हणाले की, पाकिस्तान आतंकवाद्यांना साहाय्य करतो आणि तेच आतंकवादी मानवतावादाची सर्वाधिक हानी करतात. आतंकवाद हे पाकिस्तानचे राष्ट्रीय धोरण आहे. एवढेच नव्हे, तर तेथे रहाणारे अल्पसंख्यांक हिंदू, शीख, जैन, बौद्ध आणि ख्रिस्ती अतिशय असुरक्षित आहेत. एकेकाळी पाकिस्तानमध्ये त्यांची लोकसंख्या २५ टक्क्यांहून अधिक होती. आता ती २ टक्क्यांहूनही अल्प झाली आहे. अल्पसंख्यांकांच्या मुली पळवणे, त्यांना त्रास देणे, त्यांची संपत्ती लुटणे अशा अनेक कारवाया तेथे सर्रास चालू आहेत. एवढे होत असतांना जग त्यांच्याविषयी फारसे बोलत नाही. याची भारताने चांगल्या पद्धतीने या वेळी जाणीव करून दिली.
२. अल्पसंख्यांकांवर अत्याचार करण्यापासून पाकिस्तानला थांबवायला हवे !
भारतीय अधिकारी पुढे म्हणाले की, पाकिस्तानमध्ये लाखो अल्पसंख्यांकांवर होणार्या अत्याचारांची विश्वाने नोंद घ्यायला पाहिजे आणि त्यांनी पाकिस्तानला असे करण्यापासून थांबवले पाहिजे. आतंकवाद्यांना साहाय्य करत असल्याने ‘फायनान्शिअल टास्क फोर्स’ पाकिस्तानवर दबाव टाकतो; पण हा दबाव पुरेसा नाही.
३. पाकिस्तानला शेवटची चेतावणी द्यायला हवी !
भारतीय अधिकारी पुढे म्हणाले की, आता पाकिस्तानला शेवटची चेतावणी द्यायला पाहिजे की, जर तुम्ही आतंकवादी आणि त्यांचे समर्थक यांना साहाय्य करणे थांबवले नाही, तर तुम्हाला ‘आतंकवाद्यांना साहाय्य करणारे राष्ट्र’ म्हणून घोषित केले जाईल. त्यामुळे संपूर्ण जग तुमच्यावर आर्थिक बहिष्कार टाकेल.
४. पाकिस्तानवर दबाव टाकणे महत्त्वाचे !
भारतीय सेनेचे लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी नुकतेच सांगितले की, आतंकवाद्यांची प्रशिक्षण शिबिरे, त्यांच्या पायाभूत सुविधा, तसेच दळणवळण आजही जसेच्या तसे आहे. केवळ नियंत्रण रेषेवर काही प्रमाणात हिंसाचार न्यून झाला आहे; पण ते पुरेसे नाही. त्यामुळे पाकिस्तानवर दबाव टाकणे अत्यंत महत्त्वाचे आहे.’
– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे
भारतियांची चीनविरुद्धची मवाळ नीती पालटायला हवी ! – अभिजित अय्यर-मित्रा, संरक्षण आणि विदेशनीती विशेषतज्ञआतापर्यंत चीनचा विस्तार झाला, तो कॅपिटॅलिस्ट (भांडवलशाही) पद्धतीमुळे; परंतु त्यांची वैयक्तिक नीती ही मर्केंटालिस्ट (व्यापारशाही) राहिली आहे. पश्चिमी देश म्हणजे चीनचे मुख्य केंद्र आहेत. आपण चीनचे आर्थिक केंद्र बंद करत आहोत. त्यामुळे चीनचे भारताकडे लक्ष आहे. प्रत्यक्ष नाही; मात्र अप्रत्यक्षरित्या चीन तिसर्या महायुद्धाचे कारण होऊ शकतो. भारतातही असे लोक आहेत की, जे चीनशी जोडलेले आहेत. चीनने भारतावर आक्रमण केल्यास पाकिस्तानही भारतावर आक्रमण करू शकतो; मात्र पाकिस्तानने भारतावर आक्रमण केल्यास चीन कधीच पाकिस्तानच्या साहाय्याला येणार नाही. चीन स्वतःला वाचवण्याचा निश्चित प्रयत्न करेल. ‘चलता है’ अशी भारतियांची मवाळ नीती आता पालटायला हवी. आपण भाषण देण्यामध्ये चांगले असण्यापेक्षा रणनीती चांगली करण्यामध्ये प्रयत्न करायला हवेत. |