कुडाळ आणि मालवण तालुक्यांतील एकूण ६ गावे मूळ तलाठी कार्यक्षेत्रांना जोडण्याची शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांची मागणी
कोकण विभागीय आयुक्तांना प्रस्ताव सादर करण्याचा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा आदेश
कुडाळ – कुडाळ आणि मालवण या तालुक्यांतील तलाठी सजांची (कार्यक्षेत्राची) पुनर्रचना करण्यात आली. या वेळी ६ गावे चुकीच्या तलाठी सजांना जोडली गेली आहेत. कार्यालयीन कामकाजाच्या दृष्टीने भविष्यात लोकांना याचा त्रास होणार आहे. या पुनर्रचनेविषयी संबंधित गावांनी आक्षेप नोंदवले आहेत. त्यानुसार तलाठी सजांमध्ये फेररचना करण्याची मागणी कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. (तलाठी सजांची पुनर्रचना करताना संबंधित गावांना कार्यालयीन कामासाठी त्रास होऊ शकतो, हे संबंधित अधिकार्यांच्या लक्षात का आले नाही ? वेळीच योग्य विचार करून कृती केली असती, तर पुन्हा सर्व प्रक्रिया करण्यात वेळ गेला नसता ! – संपादक)
यामध्ये कुडाळ तालुक्यातील पाट-गांधीनगर हे पाट या मूळ तलाठी सजामध्ये, देऊळवाडी हे मूळ पिंगुळीमध्ये, पावशी-मिटक्याचीवाडी हे पावशीमध्ये, निवजे हे गोठोसमध्ये, भडगाव (खुर्द) हे कडावलमध्ये, तर मालवण तालुक्यातील किर्लोस-आमवणे हे किर्लोसमध्ये समाविष्ट करावे, अशी मागणी आमदार नाईक यांनी महसूलमंत्री थोरात यांच्याकडे केली आहे. त्यानुसार महसूलमंत्री थोरात यांनी कोकण विभागीय आयुक्तांना प्रस्ताव तपासून सादर करण्याचा आदेश दिला आहे.