ऑलिम्पिकवीर प्रवीण जाधव यांच्या कुटुंबावर गावगुंडांच्या धमक्यांमुळे गाव सोडून जाण्याची आली वेळ !
सातारा, ५ ऑगस्ट (वार्ता.) – टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत धनुर्विद्येमध्ये चांगली कामगिरी केलेल्या प्रवीण जाधव यांच्या कुटुंबियांना फलटण तालुक्यातील सरडे गाव सोडून जाण्याची वेळ आली आहे. घरबांधणीच्या कारणावरून गावातीलच काही गुंड जाधव कुटुंबियांना दमदाटी करत धमकावत आहेत. प्रवीणमुळे सातारा जिल्ह्यासह सरडे हे गाव देशपातळीवर झळकले; मात्र गावात होणारी अवहेलना आणि भीती यांमुळे जाधव कुटुंबियांनी सातारा जिल्ह्यातून बारामती येथे स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रवीण यांचे आजी, आजोबा शेती महामंडळामध्ये कामाला होते. नोकरी गेल्यानंतर महामंडळाकडून आज ना उद्या रहाण्यासाठी घर मिळेल, या आशेवर जाधव कुटुंब महामंडळाच्या जागेत पाल (झोपडी उभारणे) ठोकून रहात होते. महामंडळाच्या तत्कालीन अधिकार्यांना तोंडी विचारून हे पाल ठोकण्यात आले होते. प्रवीणचे आई, वडील दोघेही शेतात काम करतात. प्रवीण खेळामध्ये चपळ असल्यामुळे स्थानिक शिक्षकांनी प्रवीण यांना हेरल्याने ते ऑलिम्पिकपर्यंत पोचू शकले. प्रवीण सैन्य दलामध्ये भरती झाल्यानंतर त्यांच्या वडिलांनी २ खोल्यांचे बांधकाम केले. पुढे या घराजवळ बंगलावजा पक्के घर बांधण्यासाठी पाया खोदण्यात आला; मात्र गावगुंडांनी ‘शेताकडे जाण्यास रस्ता नाही’, असे कारण पुढे करत जाधव कुटुंबियांना धमकावण्यास प्रारंभ केला. पोलिसांनी मध्यस्ती करून हा वाद मिटवला होता; मात्र तो पुन्हा उफाळून आला. सततच्या धमक्या आणि दमदाटीच्या प्रकारामुळे जाधव कुटुंबियांनी सातारा जिल्हा सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
विधान परिषदेचे सभापती आणि आमदार यांच्याकडून प्रश्न सोडवण्याचे आश्वासन
विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर म्हणाले, ‘‘कुणालाही गाव सोडून जाण्याची वेळ येणार नाही. आम्ही स्वत: या प्रश्नात लक्ष घातलेले आहे. गावपातळीवर हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील. प्रवीणने आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करावे. आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत.
आमदार शशिकांत शिंदे म्हणाले की, प्रतिकूल परिस्थितीमध्ये संघर्ष करून जिल्हा आणि देश यांचे नाव जगात गाजवले, त्यांच्यावर अशी वेळ येत असेल, तर चांगले नाही. याविषी वस्तूस्थिती जाणून घेऊन पालकमंत्री आणि जिल्हा प्रशासन यांच्याशी बोलून योग्य तोडगा काढण्यात येईल.