‘संत माळेतील मणी शेवटचा, आज ओघळला एकाएकी !’
सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडून शिवशंकरभाऊ पाटील यांना श्रद्धांजली
नागपूर – शेगाव येथील श्री संत गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या निधनानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. डॉ. मोहन भागवत यांनी शोकसंदेशात म्हटले, ‘‘शिवशंकरभाऊ पाटील यांच्या देहावसानाची वार्ता ऐकून ‘संत माळेतील मणी शेवटचा, आज ओघळला एकाएकी’, या ओळी मनात आल्या आहेत.’’
शोकसंदेशात डॉ. मोहन भागवत पुढे म्हणाले की, पराकोटीची निःस्पृहता आणि मनामध्ये कणव बाळगून शिवशंकरभाऊंनी प्रपंचाची वाटचाल परमार्थाच्या आधारावर करून दाखवली. व्यक्तीगत आणि सार्वजनिक जीवनात कमलपत्रावरील जलबिंदूप्रमाणे निर्लिप्त (आसक्ती नसलेला) वृत्तीने अखंड सेवेचे व्रत चालवले. गुरुजी जन्मशती समितीचे सदस्य असतांना त्यांच्या ‘संतसदृश जीवना’चे दर्शन मला जवळून घेता आले. हे मी माझे व्यक्तिगत सौभाग्य मानतो. एकादशीच्या पवित्र दिवशी त्यांनी चालू केलेल्या पुढच्या प्रवासात शांती आणि प्रकाश यांचा अधिकार त्यांनी मिळवलेला आहे. त्यांच्यासारखेच निरलस वृत्तीने भक्ती आणि सेवा यांचे व्रत अखंड चालू ठेवण्याचे दायित्व आपणा सर्वांवर आले आहे. ते दायित्व उत्तम रितीने पार पाडण्याचे धैर्य आणि शक्ती प्राप्त व्हावी, अशी प्रार्थना परमेश्वराच्या चरणी करत मी शिवशंकरभाऊंच्या पवित्र स्मृतीला माझी व्यक्तिगत तथा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो.