परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर श्रद्धा असणारे रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमातील श्री. सुरेश नामदेव काशेट्टीवार (वय ६७ वर्षे) !
कष्टाळू, प्रेमळ, परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर श्रद्धा असणारे आणि कुटुंबियांना साधनेसाठी सर्वतोपरी साहाय्य करणारे रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमातील श्री. सुरेश नामदेव काशेट्टीवार (वय ६७ वर्षे) !
आषाढ शुक्ल पक्ष चतुर्दशी (२३.७.२०२१) या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात पूर्णवेळ साधना करणारे श्री. सुरेश काशेट्टीवार यांचा वाढदिवस झाला. त्या निमित्त त्यांची मुलगी, जावई आणि नातू यांच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
सौ. सारिका कृष्णा आय्या (मुलगी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१. कष्टाळू स्वभाव
अ. ‘माझे बाबा वयाच्या ३५ व्या वर्षांपर्यंत लहानशा खेड्यात रहात होते. लहानपणापासूनच त्यांची आर्थिक स्थिती अत्यंत बेताची होती. त्यामुळे शालेय शिक्षण घेतांनाच त्यांनी शेती आणि गायी-म्हशींचे संगोपन करून दुधाचा व्यवसाय केला.
आ. शेत नांगरण्यासाठी एकच बैल असेल, तर बाबा त्याच्या समवेत स्वतः ‘जोखड’ खांद्यावर ठेवून नांगर ओढत असत. (बैलगाडी किंवा नांगर यांना बैल जुंपतांना दोन्ही बैलांच्या मानेला एक लाकूड आडवे बांधतात. त्याला ‘जोखड’ म्हणतात.)
इ. घरखर्च वाढल्याने आईने (सौ. सुचिता काशेट्टीवार यांनी) चालू केलेल्या खाद्यपदार्थ विक्रीच्या गृहोद्योगाला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आई-बाबांनी गृहोद्योगाला अधिक चालना दिली. ते प्रत्येक पदार्थ बनवतांना सर्व वस्तूंची शुद्धी करत, तिथे प.पू. भक्तराज महाराजांच्या आवाजातील भजने लावत आणि काम करतांना नामजपही करत असत. तेव्हा त्यांच्या मनात ‘पदार्थ देवाला आवडण्यासाठी काय करायला हवे ?’, असा विचार असे. गृहोद्योग करतांना २५ वर्षांत त्यांच्याकडून कुठल्याही पदार्थाची चव पालटली नाही. त्यामुळे अनेक जण त्यांचे नेहमी कौतुक करतात. आई-बाबा याचे सर्व श्रेय परात्पर गुरु डॉक्टरांनाच देतात.
२. देवाची आवड
बाबांना पूर्वीपासूनच ‘देवाचे काहीतरी सतत करत रहावे आणि विवाह न करता संन्यासी व्हावे’, असे वाटत असे; परंतु पुढे त्यांनी विवाह करून कौटुंबिक दायित्वही चांगल्या प्रकारे पार पाडले.
३. कुटुंबियांना साधनेत साहाय्य करणे
३ अ. विवाहानंतर मुलीला ‘तू संसार आणि साधना यांसंबंधी अडचणी परात्पर गुरु डॉक्टरांना सूक्ष्मातून सांग’, असे सांगणे अन् तिला धर्माचरण करण्यास प्रवृत्त करणे : बाबांनी माझ्या विवाहानंतर मला निक्षून सांगितले, ‘‘आजपासून तू मला काहीही सांगायचे नाहीस. जे काही सांगायचे, ते परात्पर गुरु डॉक्टरांना (सूक्ष्मातून) सांगायचे; कारण तेच तुझ्या संसारातील सर्व अडचणी दूर करून तुझा सांभाळ करतील.’’ एकदा मी सासरी गेल्यानंतर पंजाबी पोषाख घातला. ही गोष्ट समजल्यावर बाबा मला म्हणाले, ‘‘आपली रहाणी, तसेच वेशभूषा यांतून आपले धर्माचरण दिसून येते. त्यामुळे तू पाचवारी किंवा नऊवारी साडी नेस.’’
३ आ. मुलीच्या कुटुंबियांनी पूर्णवेळ साधना करण्यास आरंभ केल्यानंतर वडिलांना आनंद होणे अन् त्यावरून नातेवाइकांनी उणे-दुणे बोलल्यावर वडिलांनी त्यांना खंबीरपणे उत्तर देणे : आम्ही पूर्णवेळ साधना करण्यास आरंभ केल्यानंतर बाबांना पुष्कळ आनंद झाला. तेव्हा एक नातेवाईक बाबांना म्हणाले, ‘‘तुम्ही मुलीचे आयुष्य तर (साधना करायला लावून) आधीच उद्ध्वस्त केलेत आणि आता नातवाचेही (तिच्या मुलाचेही) आयुष्य उद्ध्वस्त करत आहात.’’ त्या वेळी बाबा त्या नातेवाइकाला खंबीरपणे म्हणाले, ‘‘व्यवसायानिमित्त तुमची मुले विदेशात जाऊन हिंदु संस्कृती विसरतात’, ते तुम्हाला आवडते. माझी मुलगी, जावई आणि नातू ‘साधना म्हणून राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांचे कार्य करतांना जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त होता यावे’, यासाठी सनातनच्या आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करत आहेत, तर त्यांना तुमचा विरोध का ? त्यांच्या या निर्णयाचा मला अभिमानच आहे !’’ त्यानंतर कुठल्याही नातेवाइकाने बाबांना पुन्हा याविषयी विचारले नाही. आता तर त्यांच्यापैकी काही नातेवाईक बाबांना म्हणतात, ‘‘तुम्ही घेतलेला निर्णय चांगला आहे.’’
४. साधनेची तळमळ
४ अ. आश्रमजीवन सहजतेने स्वीकारून पूर्णवेळ साधना करणे : बाबा २ वर्षांपासून (वयाच्या ६५ व्या वर्षापासून) रामनाथी आश्रमात पूर्णवेळ साधना करत आहेत. वृद्धावस्थेत आश्रमजीवनाशी समरस होणे कठीण असते, तरीही त्यांनी आश्रमजीवन सहजतेने स्वीकारले.
४ आ. विश्रांती न घेता नामजप करणे : बाबा नेहमी म्हणतात, ‘‘विश्रांती म्हणजे देवाने आपल्याला नामजपादी उपायांसाठी दिलेला कालावधी आहे.’’ या विचारामुळे ते नामजपादी उपायांच्या व्यतिरिक्त उर्वरित वेळेत सतत सेवा करतात.
५. परात्पर गुरु डॉक्टरांवर अपार श्रद्धा असणे
परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या केवळ आठवणीनेही बाबांचा भाव जागृत होतो. ‘परात्पर गुरु डॉक्टर जे करतील, ते योग्यच असते आणि ते सर्वकाही माझ्या भल्यासाठीच करत आहेत’, अशी त्यांची श्रद्धा आहे. ‘जीवनातील विविध प्रसंगी देवाने किंवा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मला वाचवले आहे’, अशी त्यांची श्रद्धा आहे. हे प्रसंग पुढे दिले आहेत.
अ. आम्ही लहान असतांना बाबा ‘ट्रक’मधून प्रवास करतांना त्यांचा अपघात होऊन ते नदीच्या पात्रातील वाळूत पडले आणि ‘ट्रक’मधील बांबू त्यांच्या अंगावर पडले. तेव्हा पुष्कळ मार लागूनही बाबा त्या अपघातातून वाचले.
आ. २० वर्षांपूर्वी आई-बाबांचा मोठा अपघात झाला होता. त्या ठिकाणी अपघात झालेल्यांपैकी कुणीही आजपर्यंत वाचले नव्हते; पण त्या अपघातात पुष्कळ मार लागूनही देवाने आई-बाबांना वाचवले.
इ. ३ वर्षांपूर्वी बाबांची ‘हर्निया’ (अंतर्गळ, म्हणजे अवयवांना त्यांच्या जागी स्थिर ठेवणारे स्नायू शिथिल झाल्याने अवयव गळणे) आणि पौरुषग्रंथी (प्रोस्टेट) यांविषयीची २ शस्त्रकर्मे झाली. त्या वेळी त्यांना ‘आता आपण जगणार नाही’, असे वाटत होते. तेव्हा बाबांनी सनातनचे संत पू. अशोक पात्रीकरकाका यांना नामजपादी उपाय विचारून ते नियमित पूर्ण केले. त्या वेळी ते परात्पर गुरु डॉक्टरांच्या अनुसंधानात सतत रहायचे. नामजपादी उपाय केल्यानंतर त्यांना बरे वाटले.
जीवनातील अनेक अडचणींविषयी बाबा म्हणतात, ‘‘माझ्याकडून साधना होण्यासाठीच परात्पर गुरु डॉक्टरांनी मला जिवंत ठेवले आहे.’’
६. वडिलांच्या साधनेमुळे घरातील वातावरणात चांगले पालट होणे
६ अ. वडिलांनी केलेल्या फुलांच्या रचना आणि पूजेची मांडणी पाहून भावजागृती होणे अन् घरातील देवतांच्या चित्रांमध्ये चांगले पालट होणे : बाबा आश्रमातून घरी गेल्यानंतर ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ, तसेच अन्य देवतांची चित्रे यांची पूजा करतात. त्या वेळी त्यांनी देवतांना वाहिलेली सर्व फुले बराच वेळ टवटवीत असतात. त्यांनी केलेल्या फुलांच्या रचना आणि पूजेची मांडणी पाहून भावजागृती होते. आमच्या घरी असलेल्या देवतांच्या चित्रांमध्ये आता चांगले पालट झाले आहेत.
६ आ. वडिलांनी घरी असतांना साधनेचे प्रयत्न चांगले केल्यामुळे घरात सकारात्मक स्पंदने जाणवणे : बाबा ‘कोरोना महामारी’च्या काळात १० मास घरी होते. तेव्हा त्यांनी साधनेचे प्रयत्न चांगले केले. त्यामुळे पूर्वीपेक्षा आता घरातील वातावरण पालटले आहे. पूर्वी मी घरी गेल्यावर मला काही प्रमाणात त्रासदायक स्पंदने जाणवत असत; पण काही मासांपूर्वी मी घरी गेल्यावर मला घरामध्ये सकारात्मक स्पंदने जाणवली.’
श्री. कृष्णा आय्या (जावई), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१. मनमोकळेपणा : ‘आमच्या विवाहाच्या संदर्भात भ्रमणभाषवर बोलण्याच्या निमित्ताने माझा सासर्यांशी (बाबांशी) प्रथमच संपर्क झाला. आमची पूर्वी कधीही भेट झाली नसतांनाही त्या वेळी बाबांशी बोलतांना मला त्यांच्यातील ‘मनमोकळेपणा’ हा गुण लक्षात आला.
२. साधकाची आर्थिक स्थिती बेताची असूनही ‘मुलीला साधना करता यावी’, या एकाच हेतूने वडिलांनी साधकाशी विवाह करण्यास मुलीला संमती देणे : मी बाबांना माझी आर्थिक स्थिती बेताची असल्याचे सांगितले होते, तरीही त्यांनी आमच्या विवाहाला लगेच होकार दिला. तेव्हा मी बाबांना म्हणालो, ‘‘सारिकाचे शिक्षण चांगले झाले आहे आणि तुम्ही समाजात प्रतिष्ठितही आहात. त्यामुळे अल्पशिक्षित, तसेच निवास आणि एक वेळचे जेवण यांचा प्रश्न असलेल्या माझ्यासारख्या मुलाला तुमची मुलगी देऊन तुम्ही तिचे आयुष्य वाया घालवू नका.’’ त्यावर बाबांनी मला सांगितले, ‘‘तुमची आर्थिक स्थिती कशीही असली, तरी ‘तुम्ही साधना करता’, हे अधिक महत्त्वाचे आहे. ‘विवाहानंतर सारिकाला साधना करता येणार आहे’, याहून दुसरी कोणतीच गोष्ट माझ्यासाठी महत्त्वाची नाही.’’
त्या वेळी बाबांच्या या उत्तराने मी भारावूनच गेलो. विवाहानंतर बाबांनी आम्हाला पुष्कळ साहाय्य केले आणि संसारात काहीच उणे पडू दिले नाही.
कु. विश्व कृष्णा आय्या (नातू, वय १४ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१. प्रेमभाव
‘नाना (कु. विश्व त्याच्या आजोबांना ‘नाना’ असे म्हणतो.) स्वयंपाक पुष्कळ चांगला बनवतात. मी त्यांच्याकडे गेल्यानंतर ते वेगवेगळे पदार्थ बनवून मला प्रेमाने खाऊ घालतात.
२. कुटुंबियांना साधनेसाठी उद्युक्त करणे
अ. ते आश्रमात असतांनाही घरच्यांची काळजी घेतात. त्यांच्यामुळे त्यांच्या घरातील व्यक्तीही साधना करत आहेत.
आ. मी नानांकडे गेल्यावर ते माझ्याकडूनही साधनेचे प्रयत्न करवून घेतात. मी साधनेचे प्रयत्न करण्यामध्ये आळस केला किंवा सवलत घेतली, तर ते मला लगेच त्या चुकीची जाणीव करून देतात.’
श्री. कृष्णा आय्या (जावई) आणि सौ. सारिका आय्या (मुलगी)
काही मासांमध्ये श्री. सुरेश काशेट्टीवार यांच्यामध्ये झालेले चांगले पालट
१. ‘बाबा पूर्वीच्या तुलनेत पुष्कळ शांत झाले आहेत.
२. ते सतत देवाच्या अनुसंधानात असतात.
३. ते सतत आनंदी दिसतात.
‘हे गुरुमाऊली, ‘बाबांसारखा कृतज्ञताभाव आमच्यामध्ये जागृत करा आणि आमची साधनेची तळमळ वाढवा. आपणच बाबांची आध्यात्मिक प्रगती करवून घ्यावी’, हीच आपल्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे.’ (१२.७.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |