इचलकरंजी नगरपालिकेत अंगावर पेट्रोल ओतून कर्मचार्‍याचा आत्मदहनाचा प्रयत्न !

इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) – येथील नगरपालिकेत सेवानिवृत्त कर्मचार्‍याने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. या वेळी नगरसेवक विठ्ठल चोपडे यांच्यासह चौघांनी तत्परतेने धाव घेत त्याला वाचवले. नगरपालिकेकडून निवृत्तीवेतनासह अन्य रक्कम मिळत नसल्यामुळे कर्मचार्‍याला नैराश्य आले होते. यातून त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले. त्यांना शिवाजीनगर पोलिसांनी कह्यात घेतले आहे.

गेल्या पाच-सहा मासांपूर्वी कर्मचारी सेवानिवृत्त झाले होते; मात्र त्यांना निवृत्तीवेतनासह वैद्यकीय देयकांची रक्कम मिळालेली नाही. त्यातच त्यांना आजारपणासाठी पैशांची आवश्यकता होती. त्यामुळे ते नगरपालिकेत आले आणि त्यांनी दुसर्‍या मजल्यावरील विरोधी पक्ष कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून घेतले. हा प्रकार उपस्थित नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर नगरसेवकांनी त्यांच्याकडील काडेपेटी काढून घेतली आणि त्यांच्यावर पाण्याचा मारा केला. या घटनेनंतर प्रशासन पातळीवर निवृत्तीवेतनासह अन्य रक्कम देण्याविषयीच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत. (कुणीतरी आत्मदहनाचा प्रयत्न केल्यानंतर निवृत्तीवेतनाची समस्या सोडवण्यासाठी प्रशासन गतीमान होणे हे दुर्दैवी ! अशा कामचुकार अधिकार्‍यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे. – संपादक)