सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या मृत्यूच्या नोंदींचा घोटाळा !
सातारा – २८ जुलै या दिवशी आलेल्या अहवालामध्ये कोरोनाबाधित मृतांची संख्या ४६ नोंदवली गेली होती. त्यामुळे ‘कोरोनाचा जोर ओसरत आहे’, असे वाटत असतांना अचानक मृतांची संख्या वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले; मात्र याची माहिती घेतली असता प्रत्यक्षात २८ जुलै या दिवशी ३४ बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली असल्याचे समोर आले आणि त्या नोंदी २० ते २६ जुलै या कालावधीतील होत्या. ही संख्या एकत्रित नोंदवल्यामुळे ४६ च्या घरात गेली.
गत २ मासांपासून बाधितांची संख्या ३ अंकी आहे, तर मृत्यूंची संख्या २ अंकी आहे. पूर्वी कोरोनाच्या रुग्णांची पडताळणी करत नव्हते. तो घोटाळा बाहेर आल्यानंतर प्रशासनाने एकाच दिवसात ५ सहस्र रुग्ण कोरोनामुक्त झाल्याचा विक्रम केला होता. नंतर कोरोनाबाधितांची संख्या ८०० च्या आसपास राहिली. २८ जुलै या दिवशी ७०१ बाधित, तर ४६ मृत्यू नोंदवले गेले. जिल्हा माहिती कार्यालयाने ही माहिती दिली असली, तरी प्रशासनाने नोंदवलेली मृतांची संख्या ३४ होती. एकाच दिवशी ४६ मृत्यू झाले, तर त्यांच्या अंत्यविधीसाठी किती धावाधाव करावी लागते, हे प्रशासनाला ठाऊक आहे. तरीही आरोग्य विभाग नोंदी ठेवण्यात चालढकलपणा करत आहे. (असे एकमेकांशी समन्वय नसणारे प्रशासनाचे विभाग किती भोंगळ कारभार करत असतील, याची कल्पना येते. – संपादक)