नक्षलवादी चळवळीत मोठे पालट; पोलिसांच्या हाती लागलेल्या ४२ पुराव्यांमुळे नक्षलवाद्यांचे गुपित उघडकीस !
|
नागपूर – सध्या नक्षलवाद्यांचा (Naxals Movement) ‘हुतात्मा सप्ताह’ चालू आहे. त्यामुळे नक्षल चळवळीतील अनेक गुपिते पुढे आली आहेत. अरण्यातून छुप्या युद्धाच्या माध्यमातून स्वतःची हिंसक चळवळ चालवणारे माओवादीही आता आपापल्या करमणुकीसाठी ‘डिजिटल’ साधनांचा वापर करत आहेत, असे पोलिसांच्या हाती लागलेल्या ‘४२ पेन ड्राइव्हस्’वरून लक्षात आले आहे. ‘नक्षलवादी आता केवळ ‘एके -४७’ आणि ‘एक्सप्लोसिव्ह’ घेऊन फिरत नाहीत, तर ‘पेन ड्राइव्हस्’ही समवेत असतात, तसेच पोलिसांवर पाळत ठेवण्यासाठी ‘ड्रोन’चा वापर करत आहेत’, अशी माहिती नक्षलविरोधी अभियानाचे उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी दिली.
माओवाद्यांच्याही ‘डिजिटल’ शाळा चालू !
माओवाद्यांमध्येही आता ‘डिजिटल’ शाळा भरू लागल्या आहेत. आता त्यांना छुप्या युद्धासाठी लागणारे प्रशिक्षण भ्रमणसंगणकावर (‘लॅपटॉप’वर) दाखवण्यात येणार्या ‘व्हिडिओ’द्वारे देण्यात येत आहे. प्रतिदिन अरण्यात त्यांचे प्रशिक्षण होत असते; मात्र आता छुप्या युद्धात पोलिसांवर विजय कसा मिळवला जाऊ शकतो ? याचे ‘विशेष व्हिडिओ’ त्यांना दाखवले जात आहेत.
नक्षलवाद्यांचे गावागावांत सामाजिक काम !
नक्षलवादी गावागावांत सामाजिक काम करत आहेत. ठिकठिकाणी शहरी नक्षलवाद किंवा दर्शनी संघटना यांच्या माध्यमातून गावातील लोकांना सामील करून जे कार्यक्रम घेतले जातात, त्याचे ‘व्हिडिओ फिड’ (चलचित्रण दाखवणे) नक्षलवाद्यांना दाखवले जात आहेत. ज्यामुळे चळवळीतील सर्वच घडामोडींविषयी अरण्यातील ‘केडर’ही ‘अपडेट’ राहू शकेल. समवेत संघटना असणार्या ‘चेतना नाट्य मंचा’ची नाच-गाणी, क्रांतिकारी विचारांचे नाट्य आदी सामील केलेले दिसत आहे. यातून करमणुकीच्या माध्यमांसमवेत स्थानिक वेगवेगळी सूत्रे घेऊन स्थानिकांना सरकारच्या विरोधात चीड निर्माण करण्याचा प्रयत्न नक्षलवाद्यांचा असतो. त्यासाठी ते आता तंत्रज्ञानाचा वापर वाढवत आहेत. असे असले, तरी पोलीस स्वतःच्या नक्षलविरोधी अभियानात या सर्व बाजूंचा विचार करून काम करत आहेत. नक्षलवाद्यांनी जरी तंत्रज्ञानाचा वापर करायला प्रारंभ केला, तरी ते लक्षात घेऊन पोलिसांचे नक्षलविरोधी अभियान चालू आहे.