जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मराठी पत्रकार परिषदेकडून साहाय्य
सावंतवाडी – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मराठी पत्रकार परिषदेकडून साहाय्य करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या माध्यमातून तालुक्यातील धवडकी, कलंबिस्त, इन्सुली, शेर्ले, ओटवणे, विलवडे, वाफोली आदी गावांत पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या वेळी १ मास पुरेल एवढे धान्य आणि कपडे १०० कुटुंबांना देण्यात आले.
या वेळी मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष गजानन नाईक, जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदार अधिवक्ता संतोष सावंत, मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख आणि जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य हरिश्चंद्र पवार, जिल्हा पत्रकार संघाचे माजी सचिव अभिमन्यू लोंढे, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण मांजरेकर, तिरुमला तेल आस्थापनाचे डिस्ट्रीब्यूटर तथा भाजपचे दादू कविटकर आदी उपस्थित होते.
कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांत नुकत्याच आलेल्या पुराने अनेकांची घरे, व्यापार पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. अशा कुटुंबियांना उभारी देण्यासाठी परिषदेच्या वतीने पुढाकार घेतला आहे. या उपक्रमाला ‘तिरुमला तेल आस्थापन’ आणि बीड येथील ‘कुटे फाऊंडेशन’ यांच्या सहकार्याने सावंतवाडी, कणकवली, खारेपाटण आदी पूरग्रस्त भागांतील पूरग्रस्तांना साहाय्य करण्यात आले. या वेळी तिरुमला आस्थापनाचे विजय हांडे आणि अभिषेक देऊळकर अन् बीड येथून टेम्पोतून साहित्य आणणारे टेम्पोचालक यांचा गौरव करण्यात आला.