गणेशोत्सवापूर्वी वीजवितरण आस्थापनाने देखभाल दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करावीत ! – भाजपची मागणी
कणकवली – कोरोनामुळे अडचणीत असलेल्या थकबाकीदार घरगुती ग्राहकांचा वीजपुरवठा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खंडित करू नये, तसेच गणेशोत्सवापूर्वी दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करावीत. गेले अनेक दिवस मागणी करूनही प्रलंबित असलेली ट्रान्सफॉर्मर आणि वीजवाहिन्या यांवर आलेली झाडे कापणे, नवीन वीजजोडणी, वीजवाहिन्यांचे खांब पालटणे आदी कामे पुढील आठवडाभरात पूर्ण करा, अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्य वीजवितरण आस्थापनाचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांच्याकडे केली.
कणकवली तालुक्यातील विजेच्या समस्यांविषयी भाजपच्या शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंता मोहिते यांची भेट घेतली. या वेळी तालुक्यातील कलमठ, पिसेकामते, ओसरगाव आदी भागांतील वीजपुरवठ्यात येणार्या समस्यांविषयी स्वतंत्र बैठक घ्या आणि प्रश्न तातडीने सोडवा, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
वीजजोडणी खंडित करण्याविषयी कार्यकारी अभियंता मोहिते म्हणाले, ‘‘वीजदेयकांच्या थकबाकीची रक्कम मोठी आहे. आम्हाला वसुलीसाठी ध्येय दिलेले आहे. नोव्हेंबर २०२० पासून काही वीजग्राहकांनी देयके भरलेली नाहीत. त्यामुळे ग्राहकांना टप्प्याटप्याने थकबाकी भरण्याची सोय करण्यात आली असून देयक भरण्याविषयी आवाहन करण्यात येत आहे.’’
पंचायत समिती सभापती मनोज रावराणे, भाजपचे तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.