कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘स्तर ३’चे निर्बंध ! – जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांचा आदेश
सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण (आर्.टी.पी.सी.आर्. चाचणीनुसार) अधिक आहे. हे प्रमाण घटवण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी (‘ब्रेक द चेन’ अंतर्गत) ‘स्तर ३’चे निर्बंध लागू करण्याचा आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिला आहे.
या अंतर्गत अत्यावश्यक सेवेशी संबंधित सर्व दुकाने, आस्थापने सर्व दिवशी दुपारी ४ वाजेपर्यंत चालू रहातील. अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने आणि आस्थापने सोमवार ते शुक्रवार या कालावधीत दुपारी ४ वाजेपर्यंत चालू रहातील, तर शनिवार आणि रविवार हे २ दिवस बंद रहातील. मॉल्स, चित्रपटगृहे, नाट्यगृहे आणि अन्य करमणुकीची ठिकाणे बंद रहातील. उपाहारगृहे (रेस्टॉरंट्स), हॉटेल्स, होम स्टे आणि खानावळ सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ वाजेपर्यंत ५० टक्के आसनक्षमतेुनसार चालू रहातील, तर दुपारी ४ वाजल्यानंतर पार्सल सेवा चालू राहील. शनिवार आणि रविवार हे २ दिवस केवळ पार्सल आणि घरपोच सेवा (होम डिलिव्हरी) चालू रहातील. यांसह शासनाने निर्देशित केलेले अन्य सर्व नियम लागू रहातील.