साधकांचा आधारस्तंभ असलेले आणि ‘डोळ्यांसमोर गुरुदेवांचेच रूप नित्य हवे’, या भावाने प्रार्थना करणारे पुणे येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. शिरीष शहा (वय ६० वर्षे) !
पुणे येथील श्री. शिरीष शहा मागील १५ वर्षांपासून साधना करत आहेत. सध्या ते सनातनच्या सात्त्विक उत्पादनांचे ‘मुख्य वितरक’ म्हणून सेवा पहातात. त्यांच्या घरी श्रीरामाचे अतिशय पुरातन मंदिर आहे. त्या मंदिराची ते भावपूर्ण रितीने देखभाल करतात. पुणे येथील साधिकांना जाणवलेली काकांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. व्यवस्थितपणा
‘काकांकडे मोठ्या प्रमाणात उत्पादनांचा साठा असतो. असे असतांनाही त्यांनी त्यांचे घर अतिशय स्वच्छ ठेवले आहे. त्यांनी सामानाची मांडणी सात्त्विक पद्धतीने केली. त्यांच्या घरी गेल्यावर शांत वाटते आणि ‘आपण आश्रमातच आहोत’, असे वाटते.’
– सौ. अर्चना घनवट आणि सौ. वैशाली गुजर
२. व्यष्टी साधनेचा आढावा प्रांजळपणे देणे
‘काका व्यष्टी साधनेची सर्व सूत्रे पूर्ण करतात. काकांच्या बोलण्यात नम्रता आणि भाव असल्याचे जाणवते. ते व्यष्टी आढाव्यात प्रांजळपणाने आणि अंतर्मुखतेने बोलतात.
३. प्रेमभावामुळे इतरांना तत्परतेने साहाय्य करणे
३ अ. अडचणीच्या वेळी काकांचा आधार वाटणे : मी आणि कु. पार्थ (मुलगा) सेवाकेंद्रात रहातो. माझा आध्यात्मिक त्रास वाढला, तर काका लगेच साहाय्याला येतात. मला चिकित्सालयात नेणे, औषधे आणणे, यांसाठी ते साहाय्य करतात. एकदा रात्री माझी गाडी मार्गात बंद पडली. माझा भ्रमणभाषही बंद होता. मी अन्य व्यक्तीचे साहाय्य घेऊन काकांना भ्रमणभाष केला. तेव्हा ते तत्परतेने आले. त्यांनी त्यांची गाडी मला दिली आणि ते माझी गाडी चालवत सेवाकेंद्रापर्यंत आले. काकांचा सर्वांना आधार वाटतो.’
– सौ. अर्चना घनवट
३ आ. स्वतःच्या क्षमतेपलीकडे जाऊन इतरांना साहाय्य करणे : ‘घरी येणार्या प्रत्येक साधकाची काका आपुलकीने चौकशी करतात. जिल्ह्यातील कोणत्याही साधकाला काही अडचण आली, तर प्रथम काकांचेच नाव डोळ्यांसमोर येते. काका पुष्कळ वेळा आपल्या क्षमतेपलीकडे जाऊन इतरांना साहाय्य करतात. ते मुख्य वितरक असल्याने कधी कधी अनेक गोष्टी त्यांना एकट्यालाच कराव्या लागतात. त्या परिस्थितीतही ते इतरांचा विचार प्रथम करतात.’
– सौ. मनीषा पाठक (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के)
४. सेवाभावी वृत्ती
४ अ. आईची सेवा कृतज्ञताभावाने करणे : ‘काका त्यांच्या आईची सेवा अतिशय मनापासून करतात. दिवसभर सेवा करून ते रात्री आईसह घराजवळील राममंदिरात झोपायला जातात. पहाटे उठून पाणी भरणे, घर स्वच्छ करणे, आईला पूजेची सिद्धता करून देणे, औषधे देणे आदी सेवा काका अनेक वर्षांपासून करत आहेत. काका घरातील दायित्व आणि सेवा सहजतेने सांभाळतात. त्या वेळी ‘देवच माझ्याकडून करवून घेतो’, असा त्यांचा भाव असतो.
४ आ. सेवेला नेहमीच तत्पर असणे : काकांना कोणतीही सेवा सांगितली, तरी ते सेवा करायला सिद्ध असतात. त्यांना दिलेल्या सेवांचा पाठपुरावा करावा लागत नाही. केंद्रामध्ये सात्त्विक उत्पादनांचे वितरण कक्ष लावतांना काका पुष्कळ साहाय्य करतात. पहाटेपासून साहित्य नेणे, त्याची मांडणी करणे, अशा प्रकारच्या विविध सेवा ते करतात.
४ इ. काकांचा जनसंपर्क चांगला आहे. काकांनी अनेक विज्ञापनदाते आणि वाचक यांना जोडून ठेवले आहे.’
– सौ. अर्चना घनवट
५. तळमळीने सेवा करणे
‘काका पुष्कळ वर्षांपासून पुणे येथील चतुःश्रुंगी गडावर नवरात्रीच्या ग्रंथ वितरण कक्षावर सेवा करत आहेत. ९ दिवस ते अतिशय तळमळीने सेवा करतात.’
– सौ. मनीषा पाठक
६. सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांची सुबक अन् आकर्षक मांडणी करणे
‘काका ‘नवरात्रोत्सव’ किंवा ‘महाशिवरात्री’ या उत्सवांच्या वेळी पहाटे लवकर कक्षावर येतात. ते सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांची मांडणी अत्यंत आकर्षक पद्धतीने करतात. ती मांडणी पाहूनच भावजागृती होते. अल्प जागेत ते अधिकाधिक ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांची सुबक मांडणी करतात.’
– सौ. राजश्री खोल्लम
७. गुरुदेवांवर अपार श्रद्धा
‘पूर्वी एकदा कामावर जात असतांना काकांचा अपघात होऊन त्यांना गंभीर दुखापत झाली होती. त्या वेळी ‘परात्पर गुरु डॉक्टरांनीच या कठीण प्रसंगातून बाहेर काढले’, असे ते सांगतात. गुरुदेवांविषयी बोलतांना काकांच्या बोलण्यात भाव दाटून येतो. काकांनी प्रार्थना करण्यासाठी हात जोडले की, ते पाहूनच भावजागृती होते. ते अनेक वेळा हात जोडलेल्या स्थितीत असतात. ते म्हणतात, ‘‘आपल्या डोळ्यांसमोर गुरुदेवांचे रूप नित्य यायला हवे.’’
– सौ. अर्चना घनवट
८. कृतज्ञताभाव
‘काकांचा प्रभु श्रीराम आणि राममंदिर यांप्रती कृतज्ञताभाव आहे. राममंदिरात सेवा करतांना त्यांचा हनुमंताप्रमाणे भाव असल्याचे जाणवते.’
– सौ. मनीषा पाठक
९. काकांमध्ये जाणवलेले पालट
अ. ‘काका पूर्वीच्या तुलनेत शांत झाले आहेत. त्यांचा ऐकण्याचा आणि स्वीकारण्याचा भाग वाढला आहे.’
– सौ. अर्चना घनवट आणि सौ. वैशाली गुजर
आ. ‘पूर्वी शहाकाकांना भावजागृतीचे प्रयत्न करणे अवघड वाटायचे; पण आता त्यांचे त्याविषयीचे प्रयत्न वाढले आहेत.’
– सौ. वैशाली गुजर
इ. ‘२ – ३ मासांपूर्वी ‘माझी व्यष्टी साधना होत नाही’, असे काका म्हणायचे. तेव्हा त्यांच्या बोलण्यात अपराधीपणा जाणवायचा. गेल्या काही दिवसांपासून काकांचा व्यष्टी आढावा ऐकतांना ते साधनेचे प्रयत्न तळमळीने करत असल्याचे जाणवते. प्रयत्न अल्प झाल्यास काकांच्या बोलण्यात खंत जाणवते.’
– कु. प्राजक्ता बनकर
ई. पूर्वी काका स्वतःच्या मनाने कृती करायचे. आता ते प्रत्येक कृती विचारून करतात. पूर्वी त्यांच्या बोलण्यात कर्तेपणा जाणवायचा. ‘आता तो न्यून झाला आहे’, असे जाणवते. ‘गुरुदेवांनी सर्व करवून घेतले’, असा त्यांचा विचार असतो.’
– सौ. मनीषा पाठक (जून २०२०)
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. |