परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे अधिवक्ता रामदास केसरकर (वय ६८ वर्षे) आणि ६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. प्रमिला केसरकर (वय ६६ वर्षे) यांच्याशी झालेले भावस्पर्शी संभाषण !
अधिवक्ता रामदास केसरकरकाका मुंबई येथील उच्च न्यायालय आणि ठाणे येथील जिल्हा न्यायालय येथे वकिली व्यवसाय करत होते. साधारणतः २७ वर्षांपूर्वी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अभ्यासवर्गांच्या माध्यमातून त्यांचा सनातन संस्थेशी संपर्क झाला आणि त्यांना मानवी जीवनातील साधनेचे महत्त्व समजले. त्यानंतर त्यांनी आणि त्यांच्या पत्नी सौ. प्रमिला केसरकरकाकू यांनी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधनेला आरंभ केला. मागील १५ वर्षांपासून केसरकरकाका त्यांच्या पत्नीसह सनातन संस्थेच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करत आहेत. साधारणतः ६ वर्षांपूर्वी केसरकरकाकूंना कर्करोग झाल्याचे निदान झाले. तेव्हापासून काकू देहप्रारब्ध सोसत आहेत, तर काका काकूंची सर्व सेवा न थकता आणि न कंटाळता करत आहेत. व्याधीने गांजलेल्यांची सेवा करतांना तरुण वयातील व्यक्तीही कंटाळून जातात; पण काका उतारवयात (वय ६८ वर्षे) रुग्णाईत पत्नीची सेवा आनंदाने करत आहेत. ते पत्नीला आनंद देण्यासाठी धडपडत आहेत. ते कुठलेही गार्हाणे न करता या परिस्थितीला आनंदाने सामोरे जात आहेत.
गुरुमाऊलीच्या छत्रछायेखाली राहिल्यामुळे त्या दोघांनाही हे प्रारब्ध भोगणे सुसह्य होत आहे. सौ. प्रमिला केसरकर यांनी या असाध्य व्याधीशी झुंजत ६६ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे, तर अधिवक्ता केसरकरकाकांनी काकूंची मनोभावे सेवा केल्यामुळे त्यांची साधना होऊन त्यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे. अशा प्रकारे ते दोघेही गुरुकृपेने जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त झाले आहेत.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अधिवक्ता रामदास केसरकरकाका आणि सौ. प्रमिला केसरकरकाकू यांच्याशी भेट झाली. त्या वेळी त्यांच्यामध्ये झालेला भावस्पर्शी संवाद पुढे दिला आहे.
(भाग १)
१. ‘देवाने उतारवयात रुग्णाईत पत्नीची सेवा करवून घेतली’, यासाठी काकांनी कृतज्ञता व्यक्त करणे
परात्पर गुरु डॉ. आठवले : काकांनी (अधिवक्ता केसरकर यांनी) चांगली सेवा केली ना ! त्यांची तीच साधना झाली !
सौ. प्रमिला केसरकर : हो. तेच (केसरकरकाका) सर्व करतात. ते चांगली सेवा करत आहेत.
परात्पर गुरु डॉ. आठवले : तुम्हालाही तसे वाटते ना ?
अधिवक्ता रामदास केसरकर : ‘या वयात देवाने ही सेवा करवून घेतली’, हे महत्त्वाचे ! नाहीतर या वयात ही सेवा करणे कठीण आहे.
२. काकांनी पत्नीची चांगली सेवा केल्यामुळे साधना होऊन त्यांची आध्यात्मिक पातळी ६० टक्क्यांहून अधिक झाल्याचे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगणे
परात्पर गुरु डॉ. आठवले (सौ. केसरकर यांना उद्देशून) : तुम्ही यांची (केसरकरकाकांची) काळजी करू नका. तुमची सेवा केल्याने त्यांची साधना झाली. ते ६० टक्क्यांच्या पुढे चालले आहेत. (त्यांची आध्यात्मिक पातळी ६० टक्क्यांहून अधिक झाली आहे.) तुम्ही दोघेही समवेत पुढे जाणार आहात. आता पुन्हा पृथ्वीवर यायचे कारण नाही. तुम्ही मुलींची काळजी करत नाही ना ?
सौ. प्रमिला केसरकर : नाही. आता करत नाहीच. मला माझ्याच वेदना सहन होत नाहीत. त्यामुळे या आजारपणात मी काळजी करायचे सोडले आहे.
३. आजारी असूनही काकू हसतमुख असल्याचे परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगणे
परात्पर गुरु डॉ. आठवले : तुम्हा दोघांनाही या आजारपणाला तोंड देता आले. (केसरकरकरांना उद्देशून) त्यांच्या (काकूंच्या) तोंडवळ्यावर ‘त्या आजारी आहेत’, असे दिसत नाही. नेहमीप्रमाणेच त्यांचा तोंडवळा हसरा आहे.
सौ. प्रमिला केसरकर : गुरुमाऊली, ही आपलीच कृपा आहे.
४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी काकूंच्या प्रकृतीची विचारपूस करणे
सौ. प्रमिला केसरकर : गुरुदेव, माझ्या तोंडात डाव्या बाजूच्या हिरडीवर मांस वाढले आहे.
अधिवक्ता रामदास केसरकर : त्यामुळे तिचे गाल एकदम फुगलेले दिसतात.
परात्पर गुरु डॉ. आठवले : तुमच्या डाव्या हातावर सूज दिसत नाही. डाव्या हातावर सूज होती का ?
अधिवक्ता रामदास केसरकर : डाव्या हातावरची सूज उतरली. आता डाव्या पायावर सूज आहे.
परात्पर गुरु डॉ. आठवले : पायावर सूज आहे; पण पावलांवर आहे. वरती सूज नाही.
अधिवक्ता रामदास केसरकर : तिचे पाय दुखतात आणि ठणकतात.
५. ‘तुमचे पृथ्वीवरील प्रारब्ध संपले असून आता महर्, जन, तपस् लोक असे करत पुढे पुढे जाऊन साधना आणि सेवा करायची आहे’, असे परात्पर गुरु डॉक्टरांनी काकूंना सांगणे
सौ. प्रमिला केसरकर : सोळा वर्षांपूर्वी पहिल्यांदा आम्ही गोव्याहून ठाण्याला जात असतांना आपण (परात्पर गुरु डॉक्टरांनी) मला ‘तुमचे देहप्रारब्ध ५० टक्के आहे’, असे सांगितले होते. आता किती प्रारब्ध संपले आणि किती शेष आहे ?
परात्पर गुरु डॉ. आठवले : असे काही नाही. आता पुन्हा पृथ्वीवर यायचे नाही. पृथ्वीवरचे प्रारब्ध संपले ! आता काहीच काळजी करायला नको. आता साधना करत महर्, जन, तपस् लोक असे करत पुढे पुढे जायचे. तिथेही सेवा आणि साधना करायची आहे; पण तिथे देहाने साधना करायची नसते. तेथे नामजप करत ध्यान लावून बसायचे. तिकडे एक सेवा असते. आपले जे साधक स्वर्गलोकापर्यंतच पोचले आहेत; पण महर्लाेकात पोचले नाहीत, त्यांना साधना शिकवायची.
परात्पर गुरु डॉ. आठवले : तुमचा हाताने (बोटांनी मोजून) मधे मधे नामजप चालू असतो का ?
सौ. प्रमिला केसरकर : नामजप करत नाही. आतून नामजप चालू असतो.
६. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी काकूंना ‘तुमच्या तळहातावर रेषा नाहीत, म्हणजे तुमचे मन स्वच्छ आहे’, असे सांगणे
परात्पर गुरु डॉ. आठवले : तुमचा हात बघू दे.
सौ. प्रमिला केसरकर : कुठला ? उजवा ?
परात्पर गुरु डॉ. आठवले : उजवा. हातावर काहीच रेषा नाहीत. माझा हात बघा ! किती रेषा आहेत ! दिसल्या ?
सौ. प्रमिला केसरकर : हो.
परात्पर गुरु डॉ. आठवले : तुमचे मन किती स्वच्छ आहे ! मीच साधकांमध्ये अडकलो आहे.
७. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांच्या हातांच्या नखांवर दिसणार्या उभ्या आणि वर्तुळाकार रेषांमागील शास्त्र सांगणे
परात्पर गुरु डॉ. आठवले : तुम्हाला चष्मा लावावा लागतो का ?
सौ. प्रमिला केसरकर : वाचन करतांना चष्मा लावावा लागतो. इतर वेळी जवळचे दिसते. फार लांबचे दिसत नाही.
परात्पर गुरु डॉ. आठवले : माझ्या बोटांच्या नखांवरील उभ्या रेषा दिसत आहेत का ?
सौ. प्रमिला केसरकर : हो, दिसतात.
परात्पर गुरु डॉ. आठवले : प्रत्येकाच्या नखांवर पांढरा भाग असतो. माझ्या नखांवर बघा. पुढे अर्धवर्तुळ दिसले का ?
सौ. प्रमिला केसरकर : हो. दिसले.
परात्पर गुरु डॉ. आठवले : त्याचे शास्त्र असे आहे, ‘माझ्या नखांवर उभ्या सरळ रेषा दिसतात. माझ्यातून शक्ती प्रक्षेपित होत असते. त्यामुळे या रेषा पडल्या आहेत. माझ्या नखांवर वर्तुळाकार रेषा आहेत. माझ्यावर वाईट शक्ती आक्रमण करते, त्या वेळी माझे रक्षण करण्यासाठी जी शक्ती बाहेर पडते, ती अशी वर्तुळाकारात जाते. देव लगेच ‘शास्त्र काय ?’, हे शिकवतो.’
– अधिवक्ता रामदास केसरकर (सनातनचे कायदेविषयक मानद सल्लागार), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.७.२०२१)
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. |
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/500707.html