‘अखंड हिंदु राष्ट्र’ हाच ध्यास असलेले ‘अखिल भारतीय हिंदु महासभे’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष सातारा येथील अधिवक्ता गोविंद गांधी !
अधिवक्ता गोविंद गांधी युवा असल्यापासून हिंदु महासभेचे कार्य करत आहेत. ५० हून अधिक वर्षे त्यांनी हिंदु महासभेच्या माध्यमातून अखिल महाराष्ट्रात हिंदु जागृती आणि हिंदूसंघटनाचे मोठे कार्य केले. १५ वर्षांहून अधिक काळ त्यांनी हिंदु महासभेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष म्हणून कार्य पाहिले. वर्ष २०२० मध्ये त्यांची हिंदु महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची ‘अखंड हिंदु राष्ट्रा’ची विचारसरणी त्यांच्या नसानसांत भिनली होती. विक्रमराव सावरकर, हिमानी सावरकर यांच्या समवेत हिंदु महासभेचे काम करतांना अधिवक्ता गोविंद गांधी यांनी शेकडो कार्यकर्ते निर्माण केले आणि त्यांना हिंदु राष्ट्राचे पाईक बनवले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे ‘अखंड हिंदु राष्ट्र’ हे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी अविरत हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी धडपड केली. श्वासोच्छ्वासी ‘अखंड हिंदु राष्ट्र’ हाच त्यांचा ध्यास होता.
विविध गुणांचा समुच्चय असलेले अधिवक्ता गोविंद गांधी !
अधिवक्ता गोविंद गांधी अत्यंत शांत, संयमी आणि स्थिर होते. कसोटीच्या प्रसंगातही न डगमगता प्रसंगावधान राखत धैर्याने तोंड देणे, हे त्यांचे वैशिष्ट्य होते. आपल्याहून लहान असणार्यांनाही ते आदराने प्रतिसाद देत असत. अत्यंत नम्र आणि विनयशील स्वभावामुळे ते सर्व हिंदुत्वनिष्ठांना अल्पावधीतच आपलेसे करून घेत असत. हिंदुत्वनिष्ठांचा आणि कार्यकर्त्यांचा वाढदिवस, संघटनांचा आणि दैनिकांचा वर्धापनदिन, क्रांतीकारक, संत, राष्ट्रपुरुष आदींची जयंती आदी कार्यक्रम सर्वांना घेऊनच साजरे करत असत. राग आणि लोभ यांच्या पलीकडे गेलेल्या अधिवक्ता गोविंद गांधी यांच्यामध्ये निरपेक्ष प्रेम, इतरांविषयी आदर आदी विविध गुणांचा समुच्चय होता. त्यांची भगवंताप्रती निस्सिम भक्ती होती.
साधू, संत, महंत, वेदमूर्ती आदींच्या सहवासाची आवड असणारे अधिवक्ता गोविंद गांधी !
अधिवक्ता गोविंद गांधी यांना अध्यात्माची पुष्कळ आवड होती. धर्मकार्यासाठी सतत भ्रमंती करत असतांना देशातील साधू, संत, महंत, वेदमूर्ती आदींच्या भेटी घेणे, कार्यासाठी त्यांचे आशीर्वाद घेणे आदी गोष्टी ते सतत करत असत. सातारा जिल्ह्यात कोणतेही संत आले की, त्यांना अधिवक्ता गोविंद गांधी यांच्या घरी निमंत्रित केले जात होते. संतही अधिवक्ता गोविंद गांधी यांचा भाव पाहून त्यांच्या घरी येत असत. अधिवक्ता गोविंद गांधी हेसुद्धा कोणताही मोठेपणा न बाळगता, साधेपणाने पण आनंदाने संतसेवा करत असत. केवळ देशातीलच नव्हे, तर विदेशातील संतांचीही स्वतःच्या घरी निवासाची व्यवस्था करत असत. घरात कितीही अडचणी असल्या, तरी त्यांच्या तोंडवळ्यावर ताण कधीच दिसत नसे. ते सतत आनंदीच असत.
– श्री. राहुल कोल्हापुरे, सातारा
सनातन आणि अधिवक्ता गोविंद गांधी यांच्यातील जिव्हाळा !परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्याविषयी भाव !वर्ष २००० मध्ये परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (सनातन संस्थेचे संस्थापक) आणि अधिवक्ता गोविंद गांधी हे केर्ले येथील प.पू. शामराव महाराज केर्लेकर यांच्या आश्रमामध्ये सेवेसाठी एकत्र होते. अनुमाने १ वर्ष त्यांच्या सतत गाठीभेटी होत होत्या. ‘हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी अविरतपणे झटणारे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हे भगवंतच आहेत’, असा अधिवक्ता गोविंद गांधी यांचा भाव होता. परात्पर गुरु डॉक्टर आठवले वर्ष २००० मध्ये अधिवक्ता गोविंद गांधी यांच्या वाढदिवसाला उपस्थित होते. अधिवक्ता गोविंद गांधी करत असलेले हिंदु राष्ट्राचे कार्य पाहून परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनीही त्यांच्याविषयी आदर व्यक्त केला होता. सनातनच्या कार्याला खंबीर आणि कृतीशील पाठिंबा !सनातन संस्थेच्या कठीण काळात अधिवक्ता गोविंद गांधी यांनी ‘हिंदु महासभा तुमच्या पाठीशी ठामपणे उभी आहे’, असे सांगून भक्कम पाठिंबा दिला होता. तसेच पोलीस, प्रशासन, आमदार, खासदार, मंत्री आदींना निवेदन देण्यासाठी अधिवक्ता गोविंद गांधी हे सनातनच्या साधकांसमवेत प्रत्येक ठिकाणी उपस्थित असत. ज्येष्ठ नागरिक असूनही युवकांना लाजवेल अशा पद्धतीने कार्यरत असत. कामानिमित्त बाहेर असतांना दिवसभर मिळेल ते खाऊन; नाही मिळाले, तर उपाशी राहून त्यांनी जिल्ह्यातील हिंदुत्वनिष्ठांचे संघटन केले आणि त्यांचे सनातनच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहाण्याविषयी प्रबोधन केले होते. दैनिक ‘सनातन प्रभात’ घरोघरी पोचावे, अशी तळमळ असलेले अधिवक्ता गोविंदजी गांधी !अधिवक्ता गोविंद गांधी नेहमी म्हणत असत, ‘‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी दैनिक ‘सनातन प्रभात’ अविरतपणे कार्यरत आहे. धर्मांतर, लव्ह जिहाद, गोहत्या, मूर्तीभंजन, लॅण्ड जिहाद, फिल्म जिहाद, साधू, संत, महंत आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या हत्या, जम्मू-काश्मीर, बंगाल आदी ठिकाणी होणार्या हिंदूंच्या हत्या, हिंदु देवतांची विटंबना आदी हिंदु धर्मावर होणारे दैनंदिन आघात केवळ दैनिक ‘सनातन प्रभात’मध्येच वाचायला मिळतात. अन्य कोणतीच वृत्तपत्रे अशा प्रकारे परखडपणे वृत्त प्रसिद्ध करण्याचे धाडस करत नाहीत. सर्व वृत्तपत्रांची पत्रकारिता ही ‘पोटार्थी पत्रकारिता’ आहे; पण ‘सनातन प्रभात’चे तसे नाही. ‘सनातन प्रभात’ हे वाचकांना काय आवडते, ते देत नाही, तर वाचकांना काय आवश्यक आहे, ते देते. घरोघरी ‘सनातन प्रभात’चे वाचक निर्माण झाले पाहिजेत आणि निश्चित होतील; कारण आता ‘हिंदु राष्ट्रा’ची पहाट दूर नाही.’’ – श्री. राहुल कोल्हापुरे, सातारा |