संभाजीनगर येथे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोरोनामुक्त वातावरणातच होणार ! – प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील, अध्यक्ष, साहित्य महामंडळ
संभाजीनगर – ‘नाशिक येथील ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोरोनामुक्त वातावरणातच होईल’, असा निर्णय ३ ऑगस्ट या दिवशी साहित्य महामंडळ आणि संमेलन स्वागत मंडळाच्या चर्चेत एकमताने घेण्यात आला आहे, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील पुढे म्हणाले की, कोरोनाचा प्रभाव अल्प झाल्यावर साहित्य संमेलन घेऊ; मात्र आजच संमेलनाचा दिनांक सांगणे अशक्य आहे. संमेलन फार पुढे जाणार नाही, याची दक्षता स्वागतमंडळ आणि लोकहितवादी मंडळ घेईल. त्या संदर्भात स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करून साहित्य संमेलन लवकर कसे घेता येईल, याचा आम्ही प्रयत्न करू.
‘ऑनलाईन’ संमेलन घेणे स्वागतमंडळाच्या विचाराधीन नाही. साहित्य संमेलनात वाचकांना पुस्तक खरेदी आणि प्रकाशक विक्रेत्यांना पुस्तक विक्रीचा लाभ घेता यावा, तसेच लेखक-वाचक यांच्या गाठीभेटी व्हाव्यात, अशी साहित्य महामंडळ आणि स्वागतमंडळ यांची निर्विवाद भूमिका आहे. त्यादृष्टीने हे संमेलन नेहमीप्रमाणेच व्हावे, असा साहित्य महामंडळाप्रमाणेच स्वागतमंडळाचाही प्रयत्न आहे, असे त्यांनी सांगितले.