यजमानांच्या निधनानंतर स्थिर आणि कृतज्ञताभावात रहाणार्या कोथरूड (पुणे) येथील ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती वर्षा विलास भिडे (वय ६९ वर्षे) !
२६.५.२०२१ या दिवशी पुणे येथील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे प्रा. विलास भिडे (वय ७४ वर्षे) यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी श्रीमती वर्षा भिडे यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील श्रद्धा आणि साधनेचे प्रयत्न यांमुळे स्थिर रहाता आले. साधिकांना प्रा. विलास भिडे यांच्या निधनानंतर श्रीमती भिडे यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
सौ. मनीषा पाठक (६८ टक्के आध्यात्मिक पातळी), पुणे
१. काकू त्यांच्या यजमानांच्या निधनाच्या वेळी स्थिर असणे
‘२६.५.२०२१ या दिवशी सकाळी भिडेकाकांचे निधन झाले. तेव्हा ‘काकू कशा असतील ?’, असे मला वाटले. काकूंना काही वर्षांपासून उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हृदयाशी संबंधित आजार आहेत. खरेतर काकू भावनाशील आहेत; पण या प्रसंगात काकू अत्यंत स्थिर होत्या.
२. काकूंनी त्यांच्या यजमानांच्या निधनानंतर नामजपादी उपाय करत असल्याचे शांतपणे सांगणे
काकांच्या निधनानंतर काही मिनिटांतच काकूंनी मला भ्रमणभाष केला आणि ‘माझा ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप चालू आहे. उदबत्ती लावली आहे’, हे सर्व त्यांनी पुष्कळ शांतपणे सांगितले. त्या सर्वकाही एवढ्या स्थिरतेने सांगत होत्या की, ‘काही मिनिटांपूर्वीच काकांचे निधन झाले आहे’, असे त्यांच्या बोलण्यावरून वाटत नव्हते.
३. काकूंचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीचा कृतज्ञताभाव !
अ. ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी भिडेकाकांना पुढची गती दिली असून त्यांचा पुढचा साधनाप्रवास चांगला होणार आहे’, असा काकूंचा भाव होता आणि ‘प.पू. गुरुदेव त्यांच्या जवळ उपस्थित आहेत’, असे त्यांना जाणवले.
आ. भिडेकाका पुष्कळ वर्षांपासून म्हणायचे, ‘‘रुग्णालयामध्ये मृत्यू येण्यापेक्षा घरी मृत्यू आलेला चांगला; कारण घरी गुरुदेवांचे अस्तित्व आहे.’’ प्रत्यक्षातही तसेच घडले. काका आसंदीवर बसून काकूंशी बोलत असतांना त्यांचे प्राण गेले. हे सांगतांनाही काकूंना पुष्कळ कृतज्ञता वाटत होती.
४. काकूंनी त्यांच्या यजमानांच्या निधनानंतर दुसर्याच दिवशी सेवेला आरंभ करणे
काकांच्या निधनानंतर २४ घंट्यांच्या आत, म्हणजे दुसर्याच दिवशी काकूंनी भ्रमणभाषवर सेवेला आरंभ केला. सनातन संस्थेच्या वतीने प्रसारित होणार्या ‘ऑनलाईन’ सत्संगांच्या ‘लिंक’ जिज्ञासूंना पाठवणे इत्यादी सेवा त्यांनी केल्या अन् सेवेचा आढावाही दिला.
५. काकूंनी ‘ऑनलाईन’ सत्संगात ‘त्यांच्या यजमानांचे आजारपण आणि निधन’, या कठीण काळात अनुभवलेल्या गुरुकृपेविषयी कृतज्ञताभावाने सांगणे अन् ‘मला गुरुदेवांना अपेक्षित असे घडायचेच आहे आणि गुरुपौर्णिमेपर्यंत मी साधनेचे प्रयत्न वाढवणार आहे’, असेही त्यांनी सांगणे
२९.५.२०२१ या दिवशी जिल्ह्यातील ६७ ते ६९ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या साधकांसाठी गुरुपौर्णिमेच्या दृष्टीने पुढील प्रयत्नांची दिशा मिळण्यासाठी सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांचा ‘ऑनलाईन’ सत्संग होता. काकूंनी सत्संगात सहभाग घेतला. ‘काकांचे आजारपण आणि त्यांचे दोनच दिवसांपूर्वी झालेले निधन’, या कठीण काळात अनुभवलेल्या गुरुदेवांच्या कृपेविषयी त्यांनी कृतज्ञताभावाने सांगितले. ‘मला गुरुदेवांना अपेक्षित असे घडायचेच आहे आणि गुरुपौर्णिमेपर्यंत मी साधनेचे प्रयत्न वाढवणार आहे’, असेही त्यांनी सांगितले.
६. प्रत्येक घटनेकडे आध्यात्मिक दृष्टीकोनातून पहाणार्या काकू !
काकांच्या निधनापूर्वी काही दिवस काकू रुग्णाईत होत्या. तेव्हा काकांनी १५ दिवस काकूंची सर्व सेवा केली. तेव्हा काकू म्हणाल्या, ‘‘काहीतरी देवाणघेवाण राहिले असणार; म्हणून तसे घडले असावे.’’ अशा प्रकारे काकू प्रत्येक घटनेकडे आध्यात्मिक दृष्टीकोनातून पहातात.
७. या कठीण स्थितीतही ‘माझे साधनेचे प्रयत्न, नामजप इत्यादी योग्य होत आहे का ? मी कोणते प्रयत्न वाढवू ?,’ असे काकू विचारत होत्या.
८. ‘काकांच्या निधनानंतरचा त्यांचा १० वा आणि १३ वा दिवस अन् त्या संदर्भातील विधी’, यांविषयीही काकू पुष्कळ स्थिरतेने अन् शांतपणे बोलत होत्या.
९. काकूंची मुलगी सौ. शिल्पा गोरे आणि नात कु. ईशा गोरे या दोघीही या प्रसंगात पुष्कळ स्थिर होत्या. ‘हीसुद्धा गुरुदेवांची कृपा आहे’, असे मला वाटले.
१०. भिडेकाकांच्या निधनाची वार्ता ऐकल्यानंतर साधिकेला जाणवलेली सूत्रे
अ. मी सध्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात वास्तव्यास आहे. काकांचे निधन पुणे येथे झाले. काकांच्या निधनाची वार्ता कळल्यावर त्यांचा तेजस्वी तोंडवळा माझ्या डोळ्यांसमोर आला आणि मला शांत वाटले.
आ. काकांना पुष्कळ स्थिरपणे मृत्यू आल्याचे मला जाणवले.
इ. काकांच्या निधनानंतर काकू, त्यांची मुलगी सौ. शिल्पा गोरे आणि मी, अशा आम्ही तिघी जणी काकांविषयी भ्रमणभाषवर बोलत होतो. तेव्हा ‘मी रहात असलेली खोली प्रकाशमान झाली आहे’, असे मला जाणवले.
‘असे आध्यात्मिक स्तरावर जीवन जगणारे भिडेकाका आणि काकू यांचा सहवास लाभून त्यांच्याकडून शिकण्याची संधी मिळाली’, यासाठी मी गुरुचरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
(७.७.२०२१)
सौ. राजश्री खोल्लम, पुणे
१. काकूंचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीचा कृतज्ञताभाव !
१ अ. ‘माझ्या यजमानांच्या सर्व इच्छा प.पू. गुरुदेवांनी पूर्ण केल्या’, असे काकूंनी कृतज्ञताभावाने सांगणे : ‘भिडेकाकांचे निधन झाल्याचे कळल्यावर मी ३ – ४ दिवसांनी भिडेकाकूंना भ्रमणभाष केला होता. त्या वेळी काकू पुष्कळ स्थिरपणे बोलत होत्या. काकांचे निधन त्यांच्या समोरच झाल्याचेही त्यांनी मला सांगितले, तसेच ‘भिडेकाकांच्या सर्व इच्छा प.पू. गुरुदेवांनी पूर्ण केल्या’, असे त्यांनी कृतज्ञताभावाने सांगितले.
१ आ. ‘दळणवळण बंदीच्या काळातही काकांच्या मृत्यूनंतरच्या सर्व गोष्टी गुरुकृपेनेच सहज पार पडल्या’, असे त्यांनी सांगितले.
१ इ. ‘गुरुकृपेने माझ्या यजमानांच्या आजारपणात मला त्यांची सेवा करता आली’, असे सांगून काकूंनी कृतज्ञता व्यक्त करणे : भिडेकाकूंना विविध आजार असल्याने आणि त्यांचे वयही अधिक असल्याने त्यांना शारीरिक मर्यादा आहेत. त्या मला म्हणाल्या, ‘‘मला चार मास काकांची सेवा करता आली. केवळ प.पू. गुरुदेवांनीच मला ती सेवा करण्याची शक्ती दिली; तसेच जे करणे मला शक्य नव्हते, ते मला करावेही लागले नाही. ही गुरुदेवांची किती कृपा आहे ना !’’ (७.७.२०२१)
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे हृदयाचे शस्त्रकर्म टळल्याची श्रीमती वर्षा भिडे यांना आलेली अनुभूती
१. साधिकेला हृदयाशी संबंधित आजार असल्याने हृदयरोग तज्ञांनी ‘ॲन्जिओप्लास्टी’ करावी लागणार असल्याचे तिला सांगणे आणि त्यानंतर तिने सत्संगाला जायला आरंभ केल्यावर औषधांचा चांगला परिणाम होऊन तिचा त्रास न्यून होणे
‘मी वर्ष १९९६ पासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहे. मला हृदयाशी संबंधित आजार असल्याने वर्ष १९९६ मध्ये मी एका नामांकित रुग्णालयात गेले होते. तेव्हा तिथल्या हृदयरोग तज्ञांनी मला सांगितले होते, ‘‘तुम्ही जगात कुठेही जा. तुम्हाला ‘ॲन्जिओप्लास्टी’ (हृदयाचे शस्त्रकर्म) करावी लागणारच आहे.’’ त्यानुसार ३ मासांनी माझी ‘ॲन्जिओप्लास्टी’ करायचे ठरले होते. त्याच कालावधीत श्री. गडकरीकाकांनी (आताच्या पू. रमेश गडकरीकाकांनी) गुरुपोर्णिमेनिमित्त सत्संग चालू केले होते. सत्संगाला जायला लागल्यावर मी घेत असलेल्या औषधांचा माझ्यावर चांगला परिणाम होऊ लागला आणि हळूहळू माझा त्रास न्यून होत गेला. सत्संगात जाण्यापूर्वी मला प्रत्येक पावलाला सुई टोचल्यासारखे त्रास होत असत. नंतर ते त्रास न्यून झाले.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सार्वजनिक (जाहीर) सभेच्या वेळी साधिकेची त्यांच्याशी भेट होणे, त्यांनी तिला नामजपादी उपाय सांगणे, ते केल्यानंतर तिचे त्रास न्यून होत जाणे आणि त्यानंतर आधुनिक वैद्यांनी ‘अँजिओप्लास्टी’ करण्याची आवश्यकता नसल्याचे सांगणे
पू. गडकरीकाकांच्या सत्संगानंतर २ मासांनी पनवेल येथे परात्पर गुरु डॉक्टरांची सार्वजनिक (जाहीर) सभा होती. त्या वेळी सर्व साधक परात्पर गुरुदेवांना शंका विचारत होते. तेव्हा मला वाटले, ‘आपण नवीन आहोत. आपण संतांना काय विचारणार ?’ त्यामुळे ‘त्यांना जवळून बघूया’, एवढेच मला वाटत होते. त्यांना पहायला आम्ही व्यासपिठावर चढलो आणि उतरत असतांनाच परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘काही काळजी करू नका. केवळ रक्तदाबावरील गोळी सोडू नका. बाकी सगळे उपाय आणि नामजप करत रहा.’’ त्यांनी मला नामजपादी उपाय अन् साधना सांगितली. तेव्हा त्यांचा संकल्प झाल्याचे मला लक्षात आले. त्यानंतर माझा त्रास न्यून होत गेला. ‘ॲन्जिओप्लास्टी’ करण्याच्या दृष्टीने शस्त्रकर्म करण्याच्या आधी करायच्या चाचण्या करण्यासाठी मी आधुनिक वैद्यांकडे गेले. तेव्हा चाचणीचा अहवाल पाहून हृदयरोग तज्ञ म्हणाले, ‘‘इतक्यात ‘ॲन्जिओप्लास्टी’ करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही बर्या आहात.’’ तेव्हापासून आजपर्यंत ‘ॲन्जिओप्लास्टी’ किंवा कुठलेही शस्त्रकर्म करावे लागले नाही. केवढी ही गुरुकृपा !’
– श्रीमती वर्षा भिडे, कोथरूड, पुणे. (७.७.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |