प्रभावी जनसंपर्कातून अनेक व्यक्तींना साधनेकडे वळवणारे आणि परात्पर गुरु डॉक्टरांवर श्रद्धा असलेले ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे पुणे येथील कै. विलास भिडे (वय ७४ वर्षे) !
१. शिक्षण
‘विलास भिडेकाकांनी ‘बी.एस्.सी.’पर्यंत शिक्षण घेतले आणि नंतर त्यांना ‘युनायटेड किंगडम्’ (इंग्लंड) येथे शिष्यवृत्ती मिळाली. तेथे त्यांनी ‘डिप्लोमा इन इंडस्ट्रीयल सेफ्टी’ याविषयीचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी ‘मॅनेजमेंट ऑफ प्रॉडक्शन’ याविषयीचे शिक्षण घेतले.
२. विविध ठिकाणी काकांनी केलेली नोकरी
अ. त्यांनी रायगड जिल्ह्यातील ‘हिंदुस्थान ऑरगॅनिक केमिकल’ या आस्थापनात ‘प्रॉडक्शन मॅनेजर’ आणि ‘ट्रेनिंग मॅनेजर’ म्हणून काम केले.
आ. पुणे येथील नामांकित ‘फर्ग्युसन महाविद्यालया’त ते एका विभागाचे व्यवस्थापन बघायचे. तेथे ते शिकवतही असत.
इ. ते तिरुपती येथे (सध्याच्या दळणवळण बंदीमुळे) ‘ऑनलाईन’ ‘हायर डिप्लोमा इन इंडस्ट्रीयल सेफ्टी’ हा विषय शिकवायचे.
३. सर्वांशी मिळून मिसळून वागणे
‘कोर्स’मधील शिक्षणाचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना एका ‘इंडस्ट्रीला’ भेट देऊन तेथील व्यवस्थापन दाखवावे लागायचे. एकदा भिडेकाका विद्यार्थी आणि अन्य प्राध्यापक यांना घेऊन ‘हिंदुस्थान ऑरगॅनिक केमिकल’ या आस्थापनात गेले होते. तेव्हा तेथील ‘मॅनेजिंग डायरेक्टर’पासून कामगारांपर्यंत सर्वांनी त्यांचे भरभरून स्वागत केले आणि आस्थापन दाखवण्यासाठी पुष्कळ सहकार्य केले. त्या सर्वांना पुष्कळ आनंद झाला होता. तेव्हा भिडेकाकांनी ते आस्थापन सोडून १० वर्षे झाली होती, तरी ‘सर्वांनी किती प्रेमाने त्यांचे स्वागत केले’, याचे समवेत आलेल्या प्राध्यापकांना पुष्कळ आश्चर्य वाटले. एवढे प्रेम त्यांनी सर्वांना दिले होते. ते सर्वांशी मिळून मिसळून रहात असत.
४. अहं नसणे
काकांना विविध क्षेत्रांतील पुष्कळ अनुभव आणि अभ्यासही होता. एक प्रतिष्ठित आणि पुष्कळ अनुभवी व्यक्ती म्हणून समाजात त्यांची ओळख होती. असे असूनही त्यांना त्यांच्या शिक्षणाचा आणि बुद्धीमत्तेचा अहं नव्हता.
५. संपर्काचे कौशल्य असणे
कुठलेही सूत्र इतरांना चांगल्या पद्धतीने सांगणे, हे काकांचे कौशल्य होते. पूर्वी ते रसायनी येथे तर गेल्या २० वर्षांपासून ते पुणे येथे रहात होते. वर्ष १९९६ पासून काका सनातन संस्थेशी जोडले गेले होते. तेव्हापासून काका-काकूंनी समाजातील अनेक व्यक्ती, जिल्ह्यातील साधक, वाचक, तसेच जिज्ञासू यांना पुष्कळ चांगल्या प्रकारे जोडून ठेवले होते.
६. भिडे काका-काकूंचे नाते आध्यात्मिक स्तरावर असणे
‘काका आणि काकू यांचे आध्यात्मिक स्तरावरचे नाते होते’, असे अनेक उदाहरणांतून लक्षात येते. काकांची आध्यात्मिक पातळी ६४ टक्के होती आणि त्यांची पत्नी श्रीमती वर्षा भिडेकाकू यांची पातळी ६८ टक्के आहे. मागील वर्षी काकांचे साधनेचे प्रयत्न वाढावेत, यासाठी काकू त्यांना नामजप आणि भावजागृतीचे प्रयत्न वाढवण्याची आठवण करून देऊन साहाय्य करायच्या.
७. परात्पर गुरुदेवांवर श्रद्धा असणे
काकांची गुरुदेवांवर पुष्कळ श्रद्धा होती. ‘गुरुदेवांनी आपत्काळाविषयी जे जे सांगितले आहे, ते घडणारच आहे’, यावर त्यांची श्रद्धा होती. याविषयी ते नेहमी बोलायचे आणि त्या दृष्टीने त्यांनी चांगल्या पद्धतीने आपत्कालीन सिद्धताही केली होती.’
– सौ. मनीषा पाठक (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के), पुणे (१९.६.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |