पैठण संतपिठाच्या रचनेत पालट केल्यामुळे जाणकारांमधून अप्रसन्नता !
मूळ आराखड्याच्या कार्यवाहीची मागणी
संभाजीनगर – ‘संतपीठ’ या शब्दाचे पुरेसे आकलन करुन न घेता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठातील तो एक केवळ विभाग रहावा’, अशा पद्धतीने जिल्ह्यातील पैठण संतपिठाच्या रचनेत केल्या जाणार्या आखणीला जाणकारांकडून विरोध दर्शवला जात आहे. केवळ वारकरी संप्रदायापुरतेच त्याचे स्वरूप ठेवले जाऊ नये, अशी विनंती सांस्कृतिक विभागास करण्यात आली आहे. विविध धर्मांतील संत-परंपरा आणि त्यांचा तौलनिक अभ्यास यांसह प्रबोधनाच्या परंपरांचा अभ्यास या पिठातून करणे आवश्यक असून त्याला ‘स्वतंत्र पीठ’ म्हणून मान्यता मिळणे आवश्यक होते; मात्र आता संतपिठाची व्याप्ती अल्प करून त्याच्या उभारणीसाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे त्याला शहरातील जाणकार विरोध दर्शवत आहेत.
संतपीठ हे ‘स्वतंत्र आणि स्वायत्त पीठ’ म्हणून होणे आवश्यक !
राज्यशासनाने वर्ष १९८० च्या दशकात पैठण येथे ‘संतपीठ’ करण्याची घोषणा केली होती. हे पीठ सांस्कृतिक केंद्र म्हणून विकसित व्हावे, यासाठी गांधीवादी विचारवंत बाळासाहेब भारदे यांच्या अध्यक्षतेखाली आराखडा सिद्ध करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. संतसाहित्य अभ्यासक यू.एम्. पठाण आणि प्राचार्य राम शेवाळकर हे या आराखडा समितीचे सदस्य होते. त्यांनी पैठण, मुंबई आणि संभाजीनगर येथे बैठका घेऊन संतपिठाचा आराखडा सिद्ध केला होता. त्यानुसार हे ‘स्वतंत्र आणि स्वायत्त पीठ’ म्हणून त्याचा विचार होणे आवश्यक असतांना केवळ सरकारी खानापूर्तीसारखे याचे नियोजन चालू आहे, असा आरोप संतपीठ पाठपुरावा समितीचे सदस्य ज्ञानप्रकाश मोदाणी यांनी केला आहे.
पैठण येथे संतपीठ मोठे सांस्कृतिक केंद्र म्हणून विकसित होऊ शकते !
संत वाङ्मयाचा समग्र अभ्यास, हिंदु धर्म आणि इतर सर्व पंथ यांचा तौलनिक अभ्यास, महाराष्ट्रातील कीर्तन आणि प्रवचन यांची मोठी परंपरा आहे. ही लोकपरंपरा निर्माण होण्याचा काळ, त्याची जडणघडण आणि समकालीन अन्य पंथातील संत यांचाही अभ्यास होणे महत्त्वाचे आहे. गोदावरी तिरी म्हणजे पैठण नगरीत होणारे हे ‘संतपीठ’ मोठे सांस्कृतिक केंद्र म्हणून विकसित होऊ शकते. याच भागातून पैठणी सिद्ध होते, तसेच धरणामुळे विविध वनस्पती आणि पशूपक्षी यांचा विहारही येथे असतो. त्यामुळे या पिठाला पूर्ण स्वायत्तता मिळण्यासाठी तशी त्याची रचना करण्याची आवश्यकता आहे, असे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही पाठवण्यात आले आहे.
संतपिठासाठी राज्यशासनाकडून २२ कोटी रुपयांचा निधी संमत !
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाचा एक भाग म्हणून संतपिठाची होणारी रचना मूळ उद्देशाच्या विपरित आहे’, अशी टीका सध्या होत आहे. संतपिठासाठी राज्यशासनाने २२ कोटी रुपयांचा निधी संमत केला असून गेल्या ४० वर्षांपासून प्रलंबित असणारा हा प्रश्न सोडवला आहे, असा दावा शासनाकडून करण्यात आला आहे. या संतपिठाला ‘संत एकनाथ’ यांचे नाव देण्यात आले असून येथे तबला, पखवाज, गायन आदी अभ्याक्रमही चालू होतील, असे सांगण्यात येत आहे. संतपिठाचा अभ्यासक्रम सिद्ध करण्याचीही प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे.
संतपीठ स्वायत्तच असायला हवे !‘‘मूळ आराखड्याप्रमाणे संतपिठाची स्वायत्त निर्मिती करणे आवश्यक आहे. बाळासाहेब भारदे यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीने दिलेला मूळ आराखडा हा सर्व बाजूंनी विचार करून सिद्ध केला गेला होता; पण त्यात आता पुष्कळ पालट केले जात असल्याने अभ्यासाची पुष्कळ व्याप्ती असणारा हा विषय खुजा तर केला जाणार नाही ना ? अशी शंका येत आहे. त्यामुळे संतपीठ स्वायत्त असायला हवे, यासाठी आग्रही आहोत.’’ – ज्ञानप्रकाश मोदाणी, संतपीठ पाठपुरावा समिती, संभाजीनगर. |