तळाशील येथे धूप प्रतिबंधक बंधारा बांधणे आणि वाळू उपसा रोखणे, यांसाठी बेमुदत उपोषणकरणार ! – ग्रामस्थांची प्रशासनाला चेतावणी
मालवण – तालुक्यातील तळाशील समुद्रकिनार्यावर धूप प्रतिबंधक बंधारा बांधण्याचे काम तात्काळ चालू करा, तसेच कालावल खाडीच्या तळाशील येथील पात्रातील वाळू उपसा तात्काळ बंद करावा. या मागण्या त्वरित मान्य न झाल्यास १५ ऑगस्टला उपोषण करावे लागेल, अशी चेतावणी तळाशील येथील ग्रामस्थांनी दिली. याविषयीचे निवेदन त्यांनी नायब तहसीलदार जी.एम्. कोकरे यांना दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, तोंडवळी-तळाशील येथील समुद्रकिनार्याची धूप मोठ्या प्रमाणात होत आहे. तळाशील येथील कालावल खाडीपात्रातून होणारा वाळूचा उपसा न थांबल्यास तळाशील किनारी भागात असलेली घरेही भविष्यात वाहून जाण्याचा धोका आहे. या अनुषंगाने प्रशासनाला वेळोवेळी निवेदने देण्यात आली. आतापर्यंत त्याची नोंद घेतली न गेल्याने १५ ऑगस्ट या दिवशी तळाशील समुद्रकिनार्यावर येथील ग्रामस्थ बेमुदत उपोषण करतील. जोपर्यंत बंधार्याचे काम चालू होत नाही अथवा सक्षम अधिकार्याचे काम चालू करण्याविषयीचे पत्र मिळत नाही, तोपर्यंत उपोषण चालूच राहील, अशी चेतावणी या निवेदनाद्वारे देण्यात आली आहे.
(प्रशासन स्वत: काही करत नाही आणि जनतेने काही सूत्रे लक्षात आणून दिली, तर त्यावर कार्यवाही करत नाही, असे चित्र सध्या दिसत आहे. त्यामुळे प्रशासनाला कृतीप्रवण करण्यासाठी जनतेला आमरण उपोषण करण्याची चेतावणी द्यावी लागते, हे प्रशासनाला लज्जास्पद नव्हे का ? – संपादक)